नरेंद्र मोदी यांची राहुल गांधी यांच्यावर टीका: तुमच्या वडिलांचं आयुष्य 'एक नंबरचे भ्रष्ट' म्हणूनच संपलं #5मोठ्याबातम्या

नरेंद्र मोदी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नरेंद्र मोदी

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया:

1. तुमच्या वडिलांचं आयुष्य तर 'एक नंबरचे भ्रष्ट' म्हणूनच संपलं

तुमच्या वडिलांचं आयुष्य तर 'एक नंबरचे भ्रष्टाचारी' अशा ओळखीसकटच संपलं, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केली.

"तुमच्या वडिलांच्या दरबारातील लोक त्यांनी मिस्टर क्लीन म्हणत. पण त्यांचं आयुष्य शेवटी एक नंबरचे भ्रष्टाचारी अशा ओळखीसह संपलं," असा मोदी उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत म्हणाले.

"माझ्या प्रतिमेचे हनन करून या लोकांना अस्थिर सरकार स्थापन करायचं आहे," असंही मोदी यांनी यावेळेस सांगितलं. एनडीटीव्हीने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

तसेच इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. बारामतीमधूनसुद्धा आपला पराभव होईल असे वाटल्याने शरद पवार EVMवर टीका करत आहेत. "इव्हीएमवर शंका घेणं त्यांना शोभत नाही. बारामतीमध्ये पराभव झाला तर EVMमध्ये गडबड आहे इतकेच नाही तर हिंसा होईल असं त्यांनी म्हटलं याकडे देशानं आणि निवडणूक आयोगानं लक्ष द्यायला हवं," असं ते म्हणाले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राहुल गांधी

शनिवारी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली. सर्जिकल स्ट्राईक हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले नसून भारतीय सैन्याने केलेले आहेत.

"भारतीय सैन्याची 70 वर्षांची कामगिरी पाहिल्यास त्यांना नेहमीच यश मिळाल्याचं दिसतं. पण सैन्याच्या कामगिरीवरून राजकारण करणं चुकीचं आहे," अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. या निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव होणारच असा दावाही त्यांनी केला.

मसूद अझहरची सूटका भाजपाच्या काळातच झाली होती, असंही त्यांनी सांगितलं. लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

2. राफेलप्रकरणी फेरविचाराची गरज नाही- केंद्र सरकार

राफेल करारासंबंधात 14 डिसेंबर रोजी दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या स्पष्ट आणि ठोस निष्कर्षांचा फेरविचार व्हावा, अशी कोणतीही त्रुटी सकृतदर्शनी दिसत नाही, असा दावा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला.

राफेलप्रकरणी देण्यात आलेल्या निकालाचा फेरविचार व्हावा, अशी विनंती करणारी याचिका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि अॅड. प्रशांत भूषण यांनी दाखल केली आहे.

रफाल कराराची निर्णय प्रक्रिया, किंमत आणि भारताच्या भागीदाराची निवड, या तिन्ही बाजूंनी न्यायालयाने निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, असं केंद्राने म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्सने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

3. माफी मागा नाहीतर घरात घुसून मारू- जावेद अख्तर यांना धमकी

बुरख्यावर बंदी घालायची असेल तर त्याबरोबरच घुंघटप्रथेवरही बंदी घालावी, कारण दोन्ही समुदायांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी ते आवश्यक असल्याचं गीतकार आणि पटकथालेखक जावेद अख्तर म्हणाले होते. जावेद अख्तर यांच्या या विधानावर राजस्थानच्या करणी सेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जावेद अख्तर

जावेद अख्तर यांनी माफी मागावी नाहीतर घरात घुसून मारू, अशी धमकी महाराष्ट्र करणी सेनेने जावेद अख्तर यांना दिली. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख जीवन सिंह सोलंकी यांनी "तीन दिवसांत माफी मागा, नाहीतर तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारू," अशी धमकी जावेद अख्तर यांना दिली आहे.

लोकमतने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

4. मी विधानसभा लढवणार - रोहित पवार

"व्यावसायिक कामामुळे समाजात माझा जनसंपर्क निर्माण झाला आहे. सामान्य जनतेशी माझी नाळ जोडली गेली आहे. मी विधानसभेची निवडणूक लढवणार असून माझा मतदारसंघ कोणता असेल हे पक्षाचे नेते ठरवतील," असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

सकाळने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Image copyright FACEBOOK/ROHIT RAJENDRA PAWAR
प्रतिमा मथळा रोहित पवार

"गेल्या काही महिन्यांपासून रोहित पवार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. मी पवार साहेबांच्या विचाराने काम करतो. त्यामुळे जामखेडमधून आपल्याच विचाराचा आमदार निवडून आला पाहिजे. या भागातील शेती, महिला आणि तरूण यांचे प्रश्न तिथला आमदार नक्की सोडवेल," असंही त्यांनी सांगितलं.

5. दहशतवादी केरळ-काश्मीरला जाऊन आले होते- श्रीलंकेचे सेनाप्रमुख

श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवणारे दहशतवादी काश्मीर आणि केरळला जाऊन आले होते, अशी माहिती श्रीलंकेचे लष्करप्रमुख महेश सेनानायके यांनी दिली आहे.

या हल्ल्याविषयी भारतीय गुप्तचर संस्थांनी श्रीलंकेला माहिती दिली होती, त्यानंतर श्रीलंकेकडून प्रथमच हे दहशतवादी भारतात येऊन गेले होते, असं मान्य करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र टाइम्सने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा महेश सेनानायके

21 एप्रिलरोजी झालेल्या 9 हल्यांमध्ये 253 लोकांचे प्राण गेले होते. इस्लामिक स्टेटने हा हल्ला केल्याचं कबूल केलं असलं तरी हा हल्ला स्थानिक नॅशनल 'तौहित जमात' संघटनेने केला असल्याचं श्रीलंका सरकारने म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)