लोकसभा निवडणूक: नरेंद्र मोदी, राहुल गांधी, मायावती - 9 नेते आणि त्यांची वादग्रस्त विधानं

जवळजवळ सर्वच आघाड्यांच्या नेत्यांची वक्तव्यं वादग्रस्त ठरली आहेत. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जवळजवळ सर्वच आघाड्यांच्या नेत्यांची वक्तव्यं वादग्रस्त ठरली आहेत.

निवडणुकांचा मोसम म्हटलं की शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले, आरोप-प्रत्यारोप होतच असतात. त्यातूनच मग काही नेत्यांची जीभ घसरतेच.

मतदानाचे चार टप्पे आटोपून गेले आहेत पण राजकीय पक्षांचे, एकमेकांवर कुरघोडी करून निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न काही कमी होताना दिसत नाहीयेत. कधी त्यातून विनोदनिर्मिती होत असली तरी वाद. आणि यातूनही कधी मतं मिळतात तर कधी विरोधकांकडे वळतात. म्हणजे राजकारण हा सर्व डोक्याचा आणि जिभेचा खेळ आहे.

2019च्या लोकसभा निवडणुकीतील आतापर्यंत विविध राजकीय नेत्यांनी केलेल्या अशाच काही वक्तव्यांवर एक नजर टाकूया.

1. 'तुमचा बाप नंबर 1चा भ्रष्टाचारी म्हणूनच मेला'

Image copyright EPA/JAGADEESH NV

"तुमच्या वडिलांना इतर देशांनी जरी क्लीन चिट दिली असतली तरी त्याचं आयुष्य भ्रष्टाचारी म्हणून संपलं," असं पंतप्रधान मोदी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना उद्देशून म्हणाले. शनिवारी उत्तर प्रदेशात एका सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

यालाच प्रत्युत्तर म्हणून रविवारी राहुल गांधी यांनी मोदींना 'प्रेम आणि मिठी'चा संदेश दिला आहे.

Image copyright TWITTER

"मोदीजी, ही लढाई संपली आहे. तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहेत. तुम्ही स्वतःबद्दलचे विचार माझ्या वडिलांवर लादू नका. त्याने तुमचं संरक्षण होणार नाही.

खूप सारं प्रेम आणि एक कडक मिठी," असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

2. मला मत नाही दिलं तर पाहा... - मनेका गंधी

Image copyright Getty Images

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री तसंच सध्या सुलतानपूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार मनेका गांधी यांनी प्रचारादरम्यान मुस्लिमांना धमकीवजा इशारा दिला आहे.

जर मला साथ दिली नाही तर तुम्ही माझ्याकडे काही कामासाठी आलात तर मला जरा विचार करावा लागेल, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

''मैं जीत रही हूं. लोगों की मदद और प्यार से मैं जीत रही हूं. लेकिन अगर मेरी जीत मुसलमानों के बिना होगी, तो मुझे बहुत अच्छा नहीं लगेगा. क्योंकि इतना मैं बता देती हूं कि दिल खट्टा हो जाता है. फिर जब मुसलमान आता है काम के लिए तो मैं सोचती हूं कि रहने दो, क्या फ़र्क पड़ता है," असं त्या म्हणाल्या होत्या.

या प्रकरणी सुल्तानपूरचे जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्यानंतर गांधी यांनी नंतर स्पष्टीकरण दिलं की आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे.

3. आझम खान आणि जयाप्रदा

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान त्यांच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. यावेळी त्यांनी सपातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जया प्रदा यांना लक्ष्य केलं.

Image copyright Getty Images/Facebook

"जया प्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मला तयांचा खरा चेहरा ओळखायला 17 वर्षं लागली. पण त्या खाकी अंडरवेअर घालतात, हे ओळखायला मला फक्त 17 दिवस लागले," असं ते म्हणाले होते.

या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली आणि महिला हक्क आयोगातर्फे त्यांना नोटीस बजावण्यात आली.

"मला शक्य झालं तर मी जिल्हाधिकाऱ्यांना जोडे घासायला लावेन," असं बोलूनही त्यांनी एका वादाला तोंड फोडलं.

4. साध्वींचा 'शाप' आणि जनतेचा संताप

या निवडणुकीत सर्वांत जास्त चर्चेत राहिलं ते भोपाळच्या भाजप उमेदवार प्रज्ञासिंह यांचं वक्तव्य. मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात दहशतवादाचा आरोप असलेल्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी माजी ATS प्रमुख हेमंत करकरेंविषयी "मी शाप दिल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला," असं वक्तव्य केलं होतं.

Image copyright Twitter

या वक्तव्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उठली. एवढंच नव्हे तर भाजपनेही त्यांच्या या विधानापासून फारकत घेतली. त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी माफी मागत आपलं वक्तव्य मागे घेतलं.

5.मायावतींचं 'ते' वक्तव्य

Image copyright AFP

उत्तर प्रदेशच्या देवबंदमध्ये भाषण करताना बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी मुस्लिमांना एक विशिष्ट पक्षाला मत न देण्याचं आवाहन केलं. "तुम्ही सपा-बसपाच्या महागठबंधनला मतदान करा आणि काँग्रेसला मुस्लिम मतांमध्ये फूट पाडू देऊ नका," असं त्या म्हणाल्या होत्या.

त्यानंतर मायावतींवर दोन दिवस प्रचारबंदी आणण्यात आली. तेव्हा आयोग घटनाबाह्य पद्धतीने वागत आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

6. 'चौकीदार चोर है'

Image copyright EPA

काँग्रेस पक्षाचा तर संपूर्ण प्रचार या एका घोषणेभोवती फिरतोय. राहुल गांधींच्या प्रत्येक सभेत ही घोषणा दिली जाते. मात्र "आता तर रफाल प्रकरणात सुप्रीम कोर्टानेही 'चौकीदार चोर है' या वक्तव्यावर शिक्कामोर्तब केलं," असं गांधी म्हणाले होते.

त्यांच्या या वक्तव्यानंतर राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात जाऊन या वक्तव्याबद्दल माफी मागावी लागली. आपण भावनेच्या भरात बोलून गेलो, पण आपल्याला तसं म्हणायचं नव्हतं, असं त्यांनी नंतर स्पष्टीकरण दिलं होतं.

7. 'जिन्ना काँग्रेसचाच भाग होते'

Image copyright Getty Images

पूर्वाश्रमीचे भाजपचे खासदार आणि सध्या असलेले काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी 'मोहम्मद अली जिन्ना हे काँग्रेसचाच भाग होते,' असं वक्तव्य केलं होतं. त्यांनी जिना यांच्या स्वातंत्र्य युद्धातील योगदानाची स्तुतीही केली, त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

त्यावर "मी चुकून जिन्नांचं नाव घेतलं, मला मौलाना आझाद म्हणायचं होतं," असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं.

8. राहुल गांधीना 'आईची शिवी'

भारतीय जनता पक्षाचे हिमाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सत्पाल सिंह सत्ती यांनी राहुल गांधींना भरसभेत चक्क 'आईची शिवी' दिली होती, त्यावरूनही मोठा वादंग झाला.

"राहुल गांधी जामिनावर बाहेर आहेत, त्यांची आई जामिनावर बाहेर आहे, त्यांचे भाऊजी जामिनावर बाहेर आहेत आणि तरी ते पंतप्रधानांना चोर म्हणतात. एका पंजाब्याने मला हे तुम्हाला कळवायला सांगितलंय. जर तू म्हणतोय की मोदी चोर आहेत तर तू XXXXX आहे," असं सत्ती एका व्हीडिओमध्ये बोलताना दिसतात.

त्यावर स्पष्टीकरण देताना, "मी एक फेसबुक पोस्ट वाचत होतो. त्यात या शिवीचा उल्लेख होता आणि ती चुकून देण्यात आली," अशी सारवासारव त्यांनी केली होती.

मात्र त्यांच्यावर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली होती तर हिमाचल प्रदेशच्या पोलिसांनी त्यांच्यावर FIR दाखल केला होता.

9. संजय राऊत आणि आचारसंहिता

असं कुठलंही वक्तव्यं करण्याच्या आणि नंतर ते मागे घेण्याच्या मागे भीती असते ती आचारसंहितेची. मात्र शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी थेट आचारसंहितेलाच आव्हान दिलं होतं.

14 एप्रिलला दिलेल्या एका भाषणात ते म्हणाले होते, "कायदा गेला चुलीत, आम्हीही पाहून घेऊन आचारसंहितेचं. मनातलं ओठावर आलं नाही तर आमची घुसमट होते."

या सर्व वक्तव्यांची निवडणूक आयोगाने वेळोवेळी दखल घेतली असून अनेक नेत्यांवर दोन ते तीन दिवस प्रचारबंदी आणली. नेत्यांची जीभ घसरण्याचे प्रकार जुने नाहीत. मात्र सध्याच्या डिजिटल युगात अशा प्रकारे जीभ घसरली तर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचलंत का?

नारायण राणे यांच्या आत्मचरित्रात कुणाकुणाची 'पोलखोल'?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)