जेव्हा दिग्विजय सिंग यांचा एका संन्यासिनीने पराभव केला होता

उमा भारती, दिग्विजय सिंग, साध्वी Image copyright Getty Images

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्या कुंडलीत साध्वी आणि संन्यासिनींशी संघर्ष दिसतोय. तसं नसतं तर भोपाळ मतदारसंघात अचानक प्रज्ञा सिंह ठाकूर त्यांच्यापुढे दत्त म्हणून उभ्या ठाकल्या नसत्या.

गेल्या ३५ वर्षांत भोपाळच्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या नावाने ठणठण गोपाळ आहे. अशावेळी 'लाथ मारीन तिथं पाणी काढीन' अशी जणू दिग्विजय सिंग यांनी भीष्म प्रतिज्ञाच केली आणि कोणत्याही मतदारसंघातून उभं राहण्याची तयारी दाखवली.

तेव्हा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी 'भोपाळ'ची सूचना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना ती पर्वणीच वाटली.

त्यांनी दहशतवादाचा आरोप झेलत असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना तिथून उतरवून सध्याच्या निवडणुकीतील सर्वांत चित्ताकर्षक लढाईला तोंड फोडलं आहे.

संघ आणि भाजपच्या नावाने नेहेमी बोटे मोडणाऱ्या 73 वर्षांच्या दिग्विजय यांना आस्मान दाखवण्याची ही संधी मोदी-शाह कशा प्रकारे हाताळणार ते 23 मेला मतमोजणीनंतर दिसणार आहे.

याआधी दिग्विजय सिंग कुण्या कुडमुड्या गुरूचे चेले नाहीत. त्यांनी आपल्या गुरूला-अर्जुन सिंगना देखील 'सरळ' करायचे सोडले नव्हते. मग इतरांची काय कथा!

16 वर्षांपूर्वीची गोष्ट

दिग्विजय यांच्या जवळजवळ 45 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना झटका एकदाच बसला आणि तो 2003 साली. आणि तो झटका एका संन्यासिनीमुळेच बसला होता. त्यानंतर त्यांना मध्यप्रदेशच्या राजकारणावर पूर्वीचा वचक कधीच बसवत आला नाही. गेले ते गेले.

डिसेंबर 2003 हा त्यांच्या आयुष्यातला काळाकुट्ट महिना. 10 वर्षें मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी राहण्याचा विक्रम करणारा पहिलाच काँग्रेस नेता अशी त्यांची इतिहासात नोंद झाली आणि त्या महिन्यातल्या विधानसभा निवडणुकीत त्यांची सत्ता गेली. राज्याच्या राजकारणातली त्यांची सद्दी संपली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उमा भारती आणि दिग्विजय सिंग.

त्यांना उमा भारती यांनी आस्मान दाखवलं. जहाल संन्यासीन म्हणून उमा त्यावेळी प्रसिद्ध होत्या. बाबरी मशीद पाडण्याच्या प्रकरणात लालकृष्ण अडवाणींबरोबर उमा भारतींवरही खटला भरण्यात आला.

दिग्विजय सिंगांना टक्कर देण्यासाठी अडवाणींनी उमा भारतींना पुढं केलं आणि भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केलं.

त्याकाळी वाजपेयी सरकारमध्ये त्या राज्यमंत्री होत्या. तत्कालीन मानुष्य बळ विकास मंत्री मुरली मनोहर जोशी यांच्या मंत्रालयात त्या कनिष्ठ मंत्री होत्या. सध्या लोकसभा अध्यक्ष असलेल्या सुमित्रा महाजन देखील त्या सरकारमध्ये राज्यमंत्री होत्या.

उमा यांची निवड झाल्यावर भाजपाची निवडणूक मोहीम उभी राहायला वेळ लागला नाही. दिग्विजय सिंग यांच्या कारभारामुळे, खरंतर गैरकारभारामुळे, काँग्रेसविरुद्ध वातावरण तापत होतं आणि त्याला जणू भाजपने वाट काढून दिली.

दिग्विजय विरोधी वातावरण तापायला कारणंही तशीच होती. बिजली-सडक-पाणी (बसप) हा मुद्दा एवढा गंभीर बनला की कधी एकदाची निवडणूक होते आहे आणि दिग्विजयना कधी एकदा हाटवतो, असं अनेक त्रस्त नागरिकांना वाटत होतं.

'तुम्ही वेडेखुळे आहात?'

वीज, पाणी आणि रस्ते या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने दिग्विजय विरुद्ध आगडोंब उसळला होता. भोपाळमध्ये देखील नियमित रूपाने लोड शेडिंग सुरू होतं.

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचा प्रतिनिधी या नात्याने ती निवडणूक कव्हर करायला मला दिल्लीहून पाठवण्यात आलं होतं.

भोपाळहून सागरला जाण्यासाठी मी एक टॅक्सी बुक केली तेव्हा भोपाळ ऑफिस मध्ये गहजब माजला. "अहो, तुम्ही वेडेखुळे आहात काय? गाडीने कशाला जात आहात. तुम्ही जाताय खरे, पण तुम्ही तिथे धड पोहोचणार काय? कारण वाटेत रस्ता नावाची चीजच नाही! फक्त खड्डे आहेत," असं माझे सहकारी काळजीच्या स्वरात म्हणाले.

Image copyright Getty Images

भोपाळमधल्या इतर काही पत्रकारांनी देखील सबुरीचा सल्ला दिल्यामुळे मला छत्तरपूरला जाणारी ट्रेन पकडण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही.

उमा भारतींच्या पायाला भिंगरी

"दिग्गीराजा को तो बिजली खा जायेगी!" हे पालुपद तेव्हा घरी-बाजारी ऐकू यायचं. उमा भारतींमुळे दिग्विजय विरोधाला एक चेहरा मिळाला.

त्या मागास अशा बडा मल्हेरा या मतदारसंघातून उभ्या राहिल्या होत्या. 'बुंदेलखंडची रणरागिणी' अशा पद्धतीने त्यांचं प्रोजेक्शन भाजपनं केलं.

बुंदेलखंड म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा इलाखा. झाशी हे शहर उत्तर प्रदेशात असले तरी बुंदेलखंड विभागातील सर्वांत मोठं शहर आहे. बुंदेलखंड मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात विभागला आहे. दोन्हीकडचा भाग तितकाच मागासलेला.

सोशल इंजिनिअरिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपने उमा भारती यांना पुढे करून बॅकवर्ड कार्ड खेळलं. उमा या लोध समाजतील आहेत.

मध्यप्रदेशातल्या 7.5 कोटी लोकसंख्येच्या 4.2 कोटी लोक हे विविध मागासवर्गीय समाजातील आहेत. म्हणजे लोकसंख्येच्या 57 टक्के. या कार्डला काटण्यासाठी काँग्रेसकडे काहीच तोड नव्हती.

आपण पुन्हा सत्तेवर आलो तर मागासवर्गीय समाजांसाठी अतिरिक्त आरक्षण देऊ, अशी घोषणा उच्चवर्णीय ठाकूर समाजातील दिग्विजय सिंह यांनी केली. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. याचा परिणाम असा झाला की उच्चवर्णीयांतील एक वर्ग काँग्रेसवर नाराज झाला.

मध्यप्रदेशचा भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार बनणे हा उमा भारतींच्या आयुष्यातील सोनेरी क्षण होता आणि त्यांनी झंझावाती प्रचाराने त्याचं सोनं केलं.

Image copyright Facebook/Digvijay Singh

प्रचारात शेवटी त्यांचा घसाच बसला आणि बोलणे थांबलं! पण त्या पायाला भिंगरी लागल्यासारख्या फिरल्या. निवडणुकीच्या वेळेला आपल्या नेत्याला लोकांना बघावं वाटतं. मूक राहूनच त्या खूप बोलून गेल्या.

त्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस देखील उतरली होती. त्याकाळी प्रचाराला शरद पवार खूप फिरले. जेव्हा ते मध्यप्रदेशमध्ये प्रचाराला जात, तेव्हा म्हणे दिग्विजय हमखास फोने करायचे. हवा कशी आहे ते विचारायचे. हवा फिरल्याचं पवारांच्या ध्यानी आलं होतं. प्रत्यक्षात निकाल लागले तेव्हा काँग्रेसची गाडी 38 वर थांबली होती.

मतमोजणीच्या दिवशी पहिल्या दोन तासांतच हवेची दिशा कळली आणि तेव्हाच दिग्विजय यांनी आपला पराभव मान्य केला.

उमांना स्वप्नातही भाजपच्या १७३ जागा येतील असं वाटलं नसावं, पण अडवाणींनी मात्र पक्षाचा दणदणीत विजय अपेक्षिला होता आणि तसंच घडलं.

परिक्रमावासी विरुद्ध साध्वी

मध्यप्रदेशच्या राजकारणात एकेकाळी चाणक्य म्हणून समजले जाणारे दिग्विजय 16 वर्षांनंतर आता परत एका मोठ्या आव्हानाला तोंड देत आहेत.

त्यावर त्यांचं पुढील राजकारण अवलंबून आहे. मोदी-शाहांनी खेळलेली नवी खेळी वादग्रस्त असली तरी ती त्यांच्या जहाल राजकारणाला पूरक आहे.

Image copyright Getty Images

उमेदवार झाल्यावर प्रज्ञा सिंह ठाकुरांनी एकामागून एक जी वादग्रस्त विधानं केली आहेत त्यामुळे आपण 'माकडाच्या हाती कोलीत' तर दिले नाही ना, अशी शंका सत्ताधारी वर्तुळत येऊ लागली आहे. या सगळ्या विधानांचा त्यांना फायदा होतो की तोटा ते २३ मेला दिसणार आहे.

साध्वी आणि संन्यासिनी दिग्विजय यांना कधी धार्जिण्या राहिलेल्या नसल्या तरी त्यांनी अलीकडेच खडतर अशी 3300 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा करून स्वतःची नवीन प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

या परिक्रमेत साधू संतांचे पाय धरणाऱ्या दिग्विजय सिंगांसमोर भाजपने आता भगवे मायाजाल उभे केले आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला कुणी हरवू शकतो का? घोडामैदान जवळच आहे.

(लेखातील विचार लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)