अलवर: नवऱ्यासमोर सामूहिक बलात्कार, व्हीडिओ व्हायरल

राजस्थान

राजस्थानच्या अलवरजवळ एक दलित दांपत्याची वाट अडवून, त्यांना निर्जन स्थळी नेऊन आणि महिलेवर कथितरित्या सामूहिक बलात्कार झाला आहे.

घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्याबाबत दलित संघटनांनी अलवरच्या थानागाजीमध्ये निदर्शनं केली आहेत.

पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे. चार लोकांचा शोध घेतला जात आहे. हलगर्जीपणा केल्याचा आरोप ठेवत ठाणेदार सरदार सिंह यांना निलंबित करण्यात आलं आहे.

लोकसभा निवडणूक असल्यामुळे हे प्रकरण दाबून ठेवल्याचा दावा दलित संघटनांनी केला आहे.

ही घटना 26 एप्रिलची आहे. या कृत्यात सहभागी असणाऱ्या लोकांनी व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पीडित दांपत्याने तोंड उघडण्याची हिंमत केली नाही.

पोलिसांची कारवाई

या घटनेमुळे संतप्त झाल्यामुळे थानागाजी भागात मंगळवारी लोकांनी निदर्शनं केली आणि राष्ट्रीय महामार्ग रोखला. यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आणि एका आरोपीला अटक केली आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक कपिल गर्ग यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की घटनेत सहभागी असलेल्या पाच लोकांवर FIR नोंदवण्यात आली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चौदा पथकं तयार करण्यात आली आहे.

Image copyright Mahesh Verma/BBC

"या प्रकरणात दिरंगाई झाली तर त्याचीही चौकशी आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल," असंही ते पुढे म्हणाले.

पोलिसांनी ही घटना अतिशय गांभीर्याने घेतल्याचंही ते पुढे म्हणाले. पीडित महिलेची वैद्यकीय आणि न्यायवैद्यक चाचणी घेण्यात येत आहे.

निदर्शनात सामील असलेल्या अलवर जिल्ह्यातील दलित कार्यकर्ता चरण सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की ही घटना 26 एप्रिलची आहे. पीडित महिला आपल्या पतीबरोबर मोटरसायकलवर जात होती. तेव्हा त्यांना पाच लोकांनी घेरलं आणि एक निर्जन स्थळी जाऊन नवऱ्यासमोरच पीडितेशी दुष्कर्म केलं.

पीडित परिवार

दलित संघटनेचा आरोप आहे की घटनेचा व्हीडिओ तयार करत राहिले आणि नवऱ्याला बेदम मारहाण केली. या संघटनेच्या मते पीडितेने मदतीची याचना केली. मात्र आरोपींनी त्याची दखल घेतली नाही.

निदर्शन करण्यात आघाडीवर असलेल्या आयोजकांपैकी सम्यक समाज संघाचे रामस्वरूप त्या पीडित परिवाराला भेटून आले आहेत.

या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब कोलमडून पडलं आहे असं ते म्हणाले. आमचं आयुष्यच व्यर्थ झालं असं पीडित म्हणत आहेत.

Image copyright Mahesh Verma
प्रतिमा मथळा दलित संघटनांची निदर्शनं

"तुम्ही पीडितांच्या अवस्थेचा विचार करू शकत नाही. ते शोकसागरात बुडाले आहेत." ते पुढे म्हणाले.

डेमोक्रॅटिक इंडिया या बिगर सरकारी संस्थेचे महेश वर्माही या निदर्शनात सहभागी होते.

वर्मा म्हणाले की जेव्हा आरोपींच्या धमक्यांनी वैतागून दोन मे ला पीडितांनी कारवाईची मागणी केली. त्यानंतर गुन्हा नोंदवला मात्र कोणालाही अटक झाली नाही.

दलितांवर अत्याचार

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे प्रकरण दाबल्याचा आरोप महेश वर्मांनी केला आहे.

थानागाजी भागात लोक रस्त्यावर उतरले तेव्हा भाजपचे खासदार किरोडी लाल मीणाही तिथे पोहोचले आणि त्यांनी आरोपींविरोधात कडक कारवाईची मागणी केली.

दलित अधिकार केंद्राचे पी.एल. मीमरोठ सांगतात, "दलितांच्या विरोधात अत्याचाराच्या प्रकरणात राजस्थान देश कधी दुसऱ्या क्रमांकावर तर कधी तिसऱ्या क्रमांकावर असतो. अनेक प्रकरणं तर समोरही येत नाही. दलित अधिकार केंद्राने त्यांची टीम घटनास्थळावर पाठवणार असल्याचं सांगितलं आहे."

दलित कार्यकर्ता रामस्वरूप बौद्ध म्हणतात "मागच्या वर्षी अलवरच्या भिलवाडी जिल्ह्यात होळीच्या दिवशी एका दलिताची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली होती."

या घटनांनी दलित समाज पुरता हादरला आहे. त्याच्या विरोधात दलित संघटना बुधवारी अलवरला निदर्शनं करणार आहे.

ज्या पोलिसांनी कारवाई करण्यात हलगर्जीपणा केला त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी करणार असल्याचं सांगितलं.

पोलिसांच्या मते या घटनेत इंद्राज गुर्जर यांनाही अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय छोटे लाल, महेश गुर्जर, हंसराज आणि अशोक यांच्या नावावर गुन्ह्याची नोंद केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)