शरद पवार: घड्याळाचं बटण दाबलं की कमळाला मत गेलं #5मोठ्याबातम्या

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा शरद पवार (फाईल फोटो)

1) घड्याळाचं बटण दाबलं की कमळाला मत गेलं - शरद पवार

"निवडणुकीच्या काळात EVMमध्ये बिघाड झाल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. गुजरात आणि हैदराबाद येथील काही EVMची तपासणी केली असता घड्याळाचं बटन दाबलं तर कमळाला मत गेल्याचं मी स्वतः डोळ्यांनी पाहिलंय. त्यामुळे EVMबाबत मला चिंता वाटते," असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जन्मदिनाच्या निमित्त ते साताऱ्यात एका पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

"सगळ्याच EVM मध्ये असं असेल असं मी म्हणत नाही. मात्र मी हे पाहिलेलं आहे, म्हणून मी काळजी व्यक्त केली," असं पवार म्हणाले. "यासाठी आम्ही कोर्टात गेलो, मात्र दुर्दैवानं कोर्टाने आमचं म्हणणं ऐकलं नाही. आम्ही 50 टक्के VVPAT मशीनमधील चिठ्ठ्या मोजण्याची मागणी केली होती," असं पवार म्हटल्याचंही या बातमी म्हटलं आहे.

2) नाशिकमध्ये 40हून अधिक मोरांचा पाण्यावाचून मृत्यू

अन्न, पाणी न मिळाल्याने 40 हून अधिक मोरांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना चांदवडच्या (नाशिक) दहीवड-दीघवड गावात घडली आहे. News18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

मोरांच्या संवर्धनासाठी गावकऱ्यांनी पाण्याचे साठे तयार केले होते. परंतु वनविभाग दुर्लक्ष केल्यानेच मोरांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

उष्माघात, कुत्र्यांचे हल्ले यात काही मोरांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त दहिवड आणि दीघवत परिसरात काही पोल्ट्री फार्म असून ते मेलेल्या कोंबड्या जंगलात फेकून देतात. या कोंबड्याचे मांस खाल्ल्यामुळे काही मोराना विषबाधा झाली असल्याचंही या बातमी म्हटलं आहे.

3) तेज बहादूर यांची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

BSFचे माजी जवान आणि वाराणसीतले समाजवादी पक्षाचे लोकसभेचे उमेदवार तेज बहादुर यादव यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. निवडणूक आयोगाच्या कामात हस्तक्षेप करणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितलं. सकाळनं ही बातमी दिली आहे.

तेज बहादूर यादव यांच्या याचिकेत दम नाही, त्यामुळे तिची दखल घेतली जाऊ शकत नाही, असं कोर्टानं म्हटलं आहे.

दरम्यान, आम्ही निवडणुकीला आव्हान देत नाही आहोत. तेज बहादूर यांची उमेदवारी बेकायदेशीररीत्या रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे 19 मेची निवडणूक लढण्याची परवानगी त्यांना देण्यात यावी," असं तेज बहादूर यांचे वकील प्रशांत भूषण यांनी म्हटलं आहे.

वाराणसीमध्ये 19 मेला मतदान होणार आहे, जिथून पंतप्रधान मोदी स्वतः उभे आहेत.

4) मोदी सरकारच्या सल्लागारानेच वाजवली अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा

मोदी सरकारमधील आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य रथिन रॉय यांनी अर्थव्यवस्था संकटात असून देशावर मंदीचे सावट असल्याचा दावा केला आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांनी देखील अर्थव्यवस्था संकटात असल्याचं म्हटलं आहे.

भारताची अर्थव्यवस्था संकटात आहे. ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे आपल्या अर्थव्यवस्थेची वाटचाल सुरू आहे. त्यामुळं आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असल्याची भीती रॉय यांनी व्यक्ती केली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मोदी सरकारमधील आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य रथिन रॉय

याआधी मार्च 2019च्या त्रैमासिक आर्थिक अहवालात देखील 2018-19मध्ये अर्थव्यवस्थेची गती काही प्रमाणात मंदावल्याचं सांगण्यात आलं होतं, असंही या बातमीत म्हटलं आहे.

5) महसूल विभागात सर्वांत जास्त लाचखोरी

राज्यातला महसूल विभाग लाचखोरीत आघाडी आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये 74 प्रकरणांमध्ये 102 महसूल कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकले आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

आतापर्यंत 306 लाच प्रकरणांची नोंद झाली असून सुमारे 80 लाख रुपयांची लाच मागण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताज्या अहवालनुसार 1 जानेवारी ते 7 मेपर्यंत लाच प्रकरणी 306 सापळे लावले होते. त्यात 416 अधिकारी, कर्मचारी अडकले आहेत.

राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नांदेड असे आठ विभाग आहेत. सरकारी कर्मचारी लाच घेत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) शहानिशा करून संबंधितावर कारवाई करते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)