किंग्ज युनायटेडने अशी जिंकली वर्ल्ड ऑफ डान्स स्पर्धा

डान्स Image copyright Facebook/@Kingsunitedofficial

लॉस एंजेलिसमध्ये वर्ल्ड ऑफ डान्स स्पर्धेच्या निकालाचा क्षण. अखेरचे दोनच संघ बाकी. कोण विजेता कोण उपविजेता? उत्कंठा शिगेला पोहोचली होती.

जेनिफर लोपेझ, डेरेक हॉग आणि नी यो हे दिग्गज कलाकार जज म्हणून समोर बसेलेले. एकामागोमाग एक तिघांनी गुण जाहीर केले. नाव नाही, फक्त गुण.

शंभर पैकी शंभर, शंभर पैकी शंभर आणि शंभर पैकी शंभर…

त्या क्षणी सुरेश मुकुंदचं मन पंधरा वर्ष मागे गेलं. वसई-विरारच्या गल्लीबोळांतून सुरू झालेला प्रवास, तिथून इथवरच्या मार्गावरचं प्रत्येक यश आणि अपयश त्याला डोळ्यांसमोर दिसत होतं.

"आम्ही पहिल्यांदा एकत्र आलो, तो काळ मला आठवला. तेव्हा आमच्यापैकी काही जण जुने, फाटके कपडे घालून राहात. काही जणांकडे धड शूज नव्हते, ते चपला घालूनच स्टेजवर नाचत होते. कुणाकडे तेव्हा फारसे पैसे नसायचे. तिथून इथवरचा, या क्षणापर्यंतचा प्रवास जेव्हा वर्ल्ड चॅम्पियन म्हणून आमच्या नावाची घोषणा होण्याची चिन्हं होती… माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी तो क्षण भावनिक होता. स्टेजवर सगळ्यांच्याच डोळ्यांतून अश्रू वाहात होते. आम्हाला माहीत होतं, कुणाचं नाव जाहीर झालं तरी आमचं आयुष्य बदलणार होतं, आम्ही 'ग्लोबल' होणार होतो. जगभरात लोक आम्हाला ओळखू लागतील."

आणि तसंच घडलं. विजेते म्हणून सुरेशच्या टीमचं 'किंग्स युनायटेड'चं नाव जाहीर झालं. चौदा जणांच्या या टीमनं जजेसची तारीफ, चाहत्यांचं प्रेम आणि 10 लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीसही जिंकलं.

Image copyright Facebook/@Kingsunitedofficial

सोशल मीडियावरून ही बातमी म्हणता म्हणता भारतात पोहोचली आणि बॉलिवूडच्या सेलिब्रिटीजनीही या डान्स ग्रुपवर कौतुकाचा वर्षाव सुरू केला. अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, ए. आर. रहमान, हृतिक रोशन, वरूण धवन आणि रेमो डिसूझा. सर्वांनीच किंग्सच्या कामगिरीला, त्यातही फायनलमधल्या त्यांच्या अदाकारीला भरभरून दाद दिली.

रिअॅलिटीचे किंग्स

दहा-बारा वर्षांपूर्वी सुरेश मुकुंद आणि व्हर्नान मॉन्टेरोनं एकत्र येऊन क्टिशियस क्रू या डान्स ग्रुपची स्थापना केली होती आणि रिअॅलिटी टीव्ही शोज जिंकून आपला दबदबा निर्माण केला होता.

2009 साली बुगी-वुगी ही स्पर्धा जिंकल्यावर हा ग्रुप पहिल्यांदा चर्चेत आले होते. मग 2010 साली 'एन्टरटेनमेन्ट के लिए कुछ भी करेगा'चं विजेतेपद आणि इंडियाज गॉट टॅलेण्टमध्ये तिसरं स्थान, 2011 साली इंडियाज गॉट टॅलेन्टमध्ये विजेतेपद. सुरेश मुकुंदच्या कामगिरीचा आलेख असा चढता राहिला आहे. फिक्टिशियसमधून वेगळं झाल्यावर सुरेशनं किंग्स युनायटेडची निर्मिती झाली.

"लोक एखादी स्पर्धा जिंकून खूश होतात, पैसे कमावण्यावर भर देतात, छोटे-मोठे परफॉर्मन्स देऊन समाधान मानतात. मग कधी अंधारात हरवून जातात. पण आम्ही आधीपासूनच ठरवलं होतं, मोठं स्वप्न पाहायचं. आमच्यातले सगळेच सामान्य परिस्थितीशी झगडत होते. नंबर वन बनायचं असा विचार नव्हता, तसं यश लगेच मिळत नाही. पण आम्हाला सर्वोत्तम कामगिरी बजावायची होती, जगाला दाखवायचं होतं की आम्ही कोण आहोत."

Image copyright Facebook/@Kingsunitedofficial

किंग्स युनायटेडनं ते स्वप्न पूर्ण केलं आहे. 2012 साली वर्ल्ड हिप हॉप डान्स चॅम्पियनशिपमध्ये आठवं स्थान आणि 2015 साली वर्ल्ड हिप हॉप डान्सचं कांस्यपदक आणि आता अमेरिकेतील एनबीसीच्या वर्ल्ड ऑफ डान्स या विजेतेपदाची भर पडली आहे.

हिप-हॉपला बॉलिवूडचा तडका

किंग्स युनायटेडचा परफॉरमन्स म्हणजे हिप-हॉपमधला ब्रेक डान्स, थक्क करणाऱ्या अॅक्रोबॅटिक्स कसरती आणि या सगळ्याला बॉलिवुडचा तडका अशी जमून आलेली भेळच असते.

"पाश्चिमात्य शैलीची अशी नृत्यं करताना बहुतेक जण ती शैली जशीच्या तशी साकारण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही हिप-हॉप करतानाही भारत, भारतीय संस्कृती, भारतीय नृत्यं, बॉलिवूडवर लक्ष केंद्रीत केलं. लोकांना ते आवडतं. आम्ही सादर केलेलं नृत्य हे त्यामुळंच एक परिपूर्ण एन्टरटेन्मेंट पॅकेज बनतं." असं किंग्स युनायटेडचा मॅनेजर शिजिन रमेश सांगतो.

वसईच्या गल्लीबोळांतून बॉलिवूडची वाट

सुरेश सांगतो, "ग्रुपचा असा एखादाच चेहरा नसतो. आजही लोक आम्हाला चेहऱ्यानं ओळखत नसतील, पण आमच्या ग्रुपचं नाव एवढं उंच न्यायचं आहे, की सगळ्या जगात ते पोहोचेल. हीच इच्छा आम्हाला प्रेरणा देत आली आहे. आम्हा सगळ्यांच्या मनात एक आग आहे, पॅशन आहे, वेडेपणा आहे."

Image copyright Facebook/@Kingsunitedofficial
प्रतिमा मथळा सुरेश मुकुंद

हा वेडेपणाच बॉलिवुडचे नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझांना इतका आवडला, की त्यांनी 2015 साली या ग्रुपवर एनिबडी कॅन डान्स - पार्ट टू (ABCD2) हा चित्रपटच बनवला. त्यात वरूण धवननं साकारलेलं पात्र सुरेशवर आधारीत होतं.

"छोट्या गल्लीतले डान्सर्सही खूप मोठं काही करू शकतात, हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं." अशा जिद्दीनं भारावलेला सुरेश एकटाच नाही. वसई-विरार-नालासोपारा या परिसरात डान्सची अशी चळवळच गेल्या दोन दशकांत उभी राहिली आहे.

"एकमेकांचं पाहून सगळे डान्स करू लागले. फक्त आम्हीच नाही, तर इथे अनेक ग्रुप्स आहेत आणि प्रत्येकालाच काहीतरी करून दाखवायचं असतं. आमच्या स्टुडियोबाहेर गल्लीत रस्त्यावरच कधी तुम्हाला कुणी ब्रेक डान्स करताना दिसतील. ज्याच्याकडे दुसरा कुठला दुसरा पर्याय नाही, त्यालाही डान्सची वाट सापडते. गरिबी आणि असहाय्यताही खूप काही शिकवून जाते."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)