IPL Final – CSK vs MI: आज रंगणार चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स हा 'एल-क्लासिको' मुकाबला

शनिवारची आळसावलेली संध्याकाळ. हैदराबादच्या विमानतळावर प्रवाशांची संथ लगबग सुरू होती. सूर्य अस्ताला जात होता. तेवढ्यात 'CSK टीम' असं लिहिलेली बस विमानतळावर दाखल झाली नि विमानतळावरच्या प्रवाशांना धोनीची टीम येणार, याची कुणकुण लागली.

अवघ्या काही मिनिटांतच सुरक्षाव्यवस्थेच्या कडेकोट पहाऱ्यात धोनी सेना अवतरली आणि निद्रिस्त विमानतळ परिसरात चैतन्य फुलले. धोनीला पाहताच बघता बघता मोबाईल कॅमेऱ्यांचा क्लिकक्लिकाट सुरू झाला. बसच्या शेवटच्या सीटवर बसलेल्या धोनीची एक छबी टिपण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली. बस निघण्याच्या सुमारास धोनीने हात हलवून चाहत्यांना एक ठेवणीतलं स्माईल दिली आणि बाहेर 'माही माही'चा गजर निनादला.

Image copyright Twitter / Getty Images

आज रविवारी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात IPLच्या बाराव्या हंगामातील जेतेपदाचा अंतिम मुकाबला रंगणार आहे.

वर्ल्डकप आणि देशातील सार्वत्रिक निवडणुका यामुळे यंदाची IPL स्पर्धा होणार की नाही, झाली तर परदेशात आयोजित होणार का, स्पर्धेचं स्वरूप बदलणार, ही स्पर्धा पुढे ढकलली जाणार का, अशा असंख्य प्रश्नांच्या वेढ्यांना पुरून उरत इंडियन प्रीमिअर लीगचा बाराव्या हंगामाचा नारळ 23 मार्च रोजी चेन्नईत फुटला.

सालाबादप्रमाणे दीड महिन्याच्या अवकाशात निवडणुकांच्या बरोबरीने IPL पुढे सरकत गेलं.

दीड महिना, 59 सामन्यांनंतर रविवारी हैदराबादमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स जेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. अंतिम लढतीच्या निमित्ताने महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्यातील द्वंद्वाची आणखी एक झलक चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे.

हिटमन रोहित शर्माच्या सेनेने क्वॉलिफायर 1च्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सलाच नमवत अंतिम फेरी गाठली होती. या पराभवातून सावरत चेन्नईने क्वॉलिफायर-2च्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सला चीतपट करत आठव्यांदा IPL स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

त्यामुळे 'हिटमॅन' रोहित आणि 'थला' धोनी यांच्यातील लढत चाहत्यांना दर्जेदार क्रिकेटची मेजवानी आहे.

मुंबई आणि चेन्नई यांच्यातील मुकाबल्याला 'एल क्लासिको' असं म्हटलं जातं. फुटबॉल विश्वात बार्सिलोना आणि रिअल माद्रिद या क्लब्सदरम्यानच्या लढतीला 'एल क्लासिको' म्हटलं जातं. शेरास सव्वाशेर खेळाडू, जिंकण्यासाठीची विलक्षण अशी विजिगीषु वृत्ती, कामगिरीतलं सातत्य, दर्जेदार खेळ, कट्टर व्यावसायिकता या निकषांसाठी क्लासिक अर्थात बावनकशी अनुभवाची पर्वणी म्हणून या लढतीला हे नाव पडलं.

मुंबई विरुद्ध चेन्नई लढतीला 'एल क्लासिको' बिरुदावली मिळणं दोन्ही संघांच्या अव्वल दर्जाच्या खेळाचं प्रतीक आहे.

यंदाच्या हंगामात चेन्नई आणि मुंबई तीनवेळा समोरासमोर आले आहेत आणि तिन्हीवेळा मुंबईनेच बाजी मारली आहे. क्वॉलिफायर-1च्या लढतीत चेन्नईलाच नमवत मुंबईने दिमाखात अंतिम फेरी गाठली होती.

एकूण IPLचा रेकॉर्ड बघितला तर मुंबई-चेन्नई 27 सामने झाले आहेत. यामध्ये मुंबईचं पारडं 16-11 असं जड आहे.

IPL स्पर्धेच्या फायनलमध्ये मुंबई-चेन्नई तीनवेळा एकमेकांसमोर होते. यामध्ये मुंबईकडे पारडं 2-1 असं झुकलेलं आहे.

चेन्नईने आतापर्यंत 2010, 2011 आणि 2018मध्ये IPLच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे तर मुंबईने 2013, 2015 आणि 2017मध्ये जेतेपदावर मोहोर उमटवली आहे.

Image copyright Getty Images

मुंबईकडे हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम इथे अंतिम लढत खेळून जिंकण्याचा अनुभव आहे. दोन वर्षांपूर्वी अटीतटीच्या लढतीत पुण्याला एका धावेने हरवत मुंबईने जेतेपद पटकावलं होतं.

डॅडी आर्मी जोशात

ट्वेन्टी-20 हा वेगवान प्रकार म्हणून ओळखला जातो. या फॉरमॅटसाठी युवा खेळाडू साजेसे ठरतात हा समज धोनीच्या डॅडी आर्मीने चुकीचा ठरवला. तिशी ओलांडलेल्या खेळाडूंचा संघ म्हणून या संघाला 'Daddy Army' म्हटलं जातं.

चेन्नई संघाचं सरासरी वय 32 आहे. रनआऊट आणि धावा वाचवताना धोनीच्या संघाची दमछाक होऊ शकते.

दुखापतीचं ग्रहण

हंगामाच्या सुरुवातीलाच वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी दुखापतग्रस्त झाल्याने संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झालं. डेव्हिड विलीने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यानंतर चेन्नईच्या वेगवान आक्रमणातली धार बोथट झाली.

साखळी लढतीत केदार जाधवला झालेल्या दुखापतीमुळे चेन्नईला आणखी एक धक्का बसला. मात्र उपलब्ध मनुष्यबळाचा सुरेख उपयोग करून घेत त्यांनी अंतिम फेरी गाठली.

फिरकीची किमया

हरभजन सिंग आणि इम्रान ताहीर या अनुभवी दुकलीनं प्रतिस्पर्धी फलंदाजांना जेरीस आणलं आहे. प्रदीर्घ अनुभव पणाला लावत या दोघांनी 40 विकेट्स मिळवत चेन्नईच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे. हंगामातील शेवटच्या लढतीत दमदार कामगिरी करत संघाला जेतेपद मिळवून देण्याचा दोघांचा निर्धार आहे.

Image copyright Getty Images

चहरची कमाल

लुंगी एन्गिडी आणि डेव्हिड विली या अनुभवी गोलंदाजांच्या अनुपस्थितीत दीपक चहरने प्रमुख वेगवान गोलंदाजाच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे. पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करत दीपकने धावा रोखणं आणि विकेट्स मिळवणं या दोन्ही आघाड्या सांभाळल्या आहेत.

फलंदाजीची ताकद

दशकभराहून अधिक काळ खेळण्याचा अनुभव असलेले शेन वॉटसन आणि फॅफ डू प्लेसी हे सलामीवीर चेन्नईची ताकद आहेत. वॉटसनला सूर गवसला तर तो एकहाती मॅच फिरवू शकतो.

डू प्लेसी परिस्थितीनुरूप खेळतो. यंदाच्या हंगामात त्याने सातत्याने धावा केल्या आहेत.

IPL स्पर्धेत चार हजार धावांचा टप्पा गाठलेला सुरेश रैना यंदा फॉर्मात नाहीये परंतु शेवटच्या लढतीत ठसा उमटवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. वर्ल्डकपसाठी निवड न झालेल्या अंबाती रायुडूसाठी हा हंगाम चांगला ठरलेला नाही. मात्र अनेकवर्ष मुंबई संघाचा भाग असलेला रायुडू त्यांच्याविरुद्ध निर्णायक ठरू शकतो.

जगातील बेस्ट फिनिशर म्हणून प्रसिद्ध धोनीवर अंतिम लढतीत मोठी जबाबदारी आहे. डोक्यावर बर्फ ठेवून खेळणारा धोनी मुंबईसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

रोहित-क्विंटनची दमदार सलामी

रोहित शर्मा यंदाच्या हंगामात ओपनिंग पोझिशनमध्ये खेळला आहे. रोहितने अनेक उपयुक्त खेळी केल्या आहेत, मात्र एका मोठ्या खेळीची त्याच्याकडून अपेक्षा आहे. शेवटच्या लढतीत धोनी ब्रिगेडला दणका देण्याचा रोहितचा प्रयत्न असेल.

दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉकने लौकिकाला जागत क्विंटलभर धावांची रसद पुरवली आहे. कमी वेळात अधिकाअधिक धावा करण्याचं त्याचं कसब चेन्नईसाठी अडचणीचं ठरू शकतं.

सूर्यकुमार-इशानवर मधल्या फळीची भिस्त

मधली फळी हा मुंबईसाठी काळजीचा मुद्दा होता. मात्र क्वॉलिफायरच्या लढतीत सूर्यकुमारने संयमी खेळी करत संघाला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला होता.

संघात आतबाहेर होणाऱ्या इशान किशनने सूर्यकुमारला चांगली साथ देत आपली उपयुक्तता सिद्ध केली होती. चेन्नईच्या फिरकी माऱ्याला निष्प्रभ करण्यादृष्टीने या युवा जोडगोळीकडून मुंबईला अपेक्षा आहेत.

पंड्या ब्रदर्सची चलती

हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या या बंधूंनी बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी केली आहे. करण जोहरच्या कार्यक्रमात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी हार्दिकवर कारवाई झाली होती. त्यातून सावरत हार्दिकने तडाखेबंद पुनरागमन केलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कृणाल आणि हार्दिक पांड्या

यंदाच्या हंगामात हार्दिकची बॅट सातत्याने तळपली आहे. 34चेंडूत त्याने साकारलेली 91 धावांची खेळी चाहत्यांच्या लक्षात आहे. धावा रोखतानाच मोक्याच्या क्षणी विकेट मिळवत हार्दिकने अष्टपैलुत्व सिद्ध केलं आहे. हार्दिकच्या बरोबरीने कृणाल तिन्ही आघाड्या यशस्वीपणे सांभाळतो आहे. त्याची फिरकी भल्याभल्या फलंदाजांना अडचणीत टाकते आहे.

पोलार्डचा तडाखा बसणार?

आयपीएलच्या सर्व हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणारा पोलार्ड हुकूमी एक्का आहे. प्रचंड ताकदीसह पल्लेदार षटकार खेचणारा पोलार्ड चेन्नईसाठी चिंतेची बाब आहे. पोलार्डला कामगिरीत सातत्य राखता आलेलं नाही मात्र अंतिम लढतीत मजबूत तडाखा देण्याची क्षमता आणि अनुभव पोलार्डकडे आहे.

गोलंदाजीत पारडं जड

घोटीव यॉर्कर, फसवे स्लोअरवन, बॅक ऑफ द हँड अशा अस्त्रांसह फलंदाजांना बुचकळ्यात टाकण्यात लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह निष्णात आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा लसिथ मलिंगा

डावात कोणत्याही टप्प्यावर विकेट मिळवून देणं आणि धावांना ब्रेक लावणं या कौशल्यांमुळे मलिंगा-बुमराह जोडी हिट आहे. युवा फिरकीपटू राहुल चहरने यंदाच्या हंगामात सर्वांना प्रभावित केलं आहे. चेन्नई संघाकडून खेळणाऱ्या दीपक चहरचा राहुल हा भाऊ. राहुलने मोठ्या फलंदाजांना बाद करत स्वत:ची छाप सोडली आहे. मिचेल मक्लेघान हा अनुभवी खेळाडू मुंबईच्या ताफ्यात आहे. पिचनुसार मुंबई जयंत यादव, मकरंद मार्कंडेय तसंच बरिंदर स्राण यांच्यापैकी एकाला संधी देऊ शकते.

संघमुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), इल्विन लुईस, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, युवराज सिंग, मिचेल मक्लेघान, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, मकरंद मार्कंडेय, जयंत यादव, बरिंदर स्राण, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, बेन कटिंग, ब्युआन हेन्ड्रिंक्स, पंकज जैस्वाल, सिद्धेश लाड, रसीख सलाम, अनुकूल रॉय, आदित्य तरे.

चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंग धोनी, शेन वॉटसन, फॅफ डू प्लेसिस, अंबाती रायुडू, सुरेश रैना, मुरली विजय, शार्दूल ठाकूर, हरभजन सिंग, इम्रान ताहीर, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, केएम आसिफ, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, स्कॉट कुलेजिन, मोनू कुमार, मिचेल सँटनर, करण शर्मा, मोहित शर्मा, ध्रुव शोरे.

वेळ- रात्री 7.30 पासून

मुंबईला तयारीला पुरेसा वेळ

मुंबईने मंगळवारी क्वालिफायरची लढत जिंकून फायनलमध्ये प्रवेश केल्याने त्यांना फायनलच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. दुसरीकडे चेन्नईने शुक्रवारी दिल्लीला नमवत अंतिम फेरी गाठली. शनिवारी संध्याकाळी चेन्नईचा संघ हैदराबादला पोहोचला. यामुळे धोनीच्या संघाला तयारीसाठी अगदी मर्यादित वेळ मिळणार आहे.

खेळपट्टीचे रागरंग

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर यंदाच्या हंगामात खेळपट्टीने वेगवेगळा नूर दाखवला आहे. धावा आणि विकेट्स म्हणजेच पर्यायाने सुरुवातीला फलंदाजी किंवा धावांचा पाठलाग अशा दोन्ही आघाड्यांवर संघांना यश मिळालं आहे. अंतिम लढत साडेसातला सुरू होणार असल्याने दवाचा मुद्दा कळीचा ठरू शकतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)