अलवर गॅंगरेप: नवऱ्यासमोर बलात्कार झाला त्या दिवशी नेमकं काय घडलं?

पीडित

9 मे 2019... राजस्थानच्या अलवर शहरालगतचं एक खेडं. दिवस पुढे सरकतो तसा सूर्यही आग ओकू लागतो.

गावातल्या घरासमोर डोक्याला पांढऱ्या पगडी बांधलेल्या पुरुषांची गर्दी जमली आहे. काही गाड्या आणि पोलीसही आहेत. एक लहान मुलगा पळापळ करत सर्वांना पाणी देतोय. अंगणात 10-15 बायका आहेत. यातल्या अनेकजणींनी घुंघट घेतलाय आणि चिलम ओढत आहेत.

"नाही, तुम्ही आत जाऊ शकत नाही... आत कुणीच जाणार नाही. आम्ही थकलोय आता. नेते राजकारण करत आहेत तर मीडियावाले काहीही लिहित आहेत. इथेच थांबा प्लीज. पाणी दे रे इकडे." पत्रकारांना आवरताना एक तरुण संतापला आहे.

हे 18 वर्षांच्या त्या मुलीचं घर आहे जिच्या नवऱ्यासमोरच पाच तरुणांनी तिच्यावर कथित बलात्कार केला. त्याचा व्हीडिओ काढून तो सोशल मीडियावर पोस्ट केला.

दलित घरातल्या मुलीवर हा अत्याचार झाला 29 एप्रिलला. मात्र, त्यानंतर आठवडा उलटला तरी पोलीस आणि प्रशासनाला जाग आली नव्हती.

मे महिन्याचा दुसरा आठवडा उजाडेपर्यंत हे प्रकरण स्थानिक मीडियामधून राष्ट्रीय मीडिया आणि सत्ताधाऱ्यांपर्यंत पोचलं. या सगळ्याचा सर्वाधिक परिणाम पीडितेचं कुटुंब आणि तिच्या घरावर झाल्याचं दिसत होतं. तिचे कुटुंबीय नेते मंडळी, माध्यमातील मंडळी आणि सहानुभूती दाखवण्यासाठी आलेल्यांची व्यवस्था करता करता थकले होते.

पीडितेची भेट

अनेक तास वाट बघितल्यानंतर आणि पीडितेच्या कुटुंबासाठी साध्या वेशात तैनात एका पोलिसाला विनवण्या केल्यानंतर आम्ही पीडिता आणि तिच्या पतीला भेटलो.

अंकिता (नाव बदललेलं आहे) फार फार तर 17-18 वर्षांची दिसत होती.

"हिला अठरा वर्षं पूर्ण झाली आहेत. एकोणिसावं सुरू आहे," अरुण (पीडितेच्या पतीचं बदलेलं नाव) सांगत होते.

"आम्ही चेहरा धूसर केला आहे," अरुण यांच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून आम्ही त्याला विश्वासात घेत सांगितलं.

प्रतिमा मथळा कुटुंबातील एक महिला

"मॅडम, तरीही सेफ्टीसाठी फडकं ठेवतो. काल एका चॅनलवाल्याने सांगितलं की चेहरा धूसर करू. मात्र, तरीही माझा चेहरा स्पष्ट दिसत होता." हे ऐकल्यावर मी त्यांना एक कापड दिलं आणि अशाप्रकारे आमची बातचीत सुरू झाली.

त्या दिवसापासून आजपर्यंतचा घटनाक्रम: अरुण यांच्याच शब्दात

26 एप्रिलचा दिवस होता. तीन-सव्वा तीन झाले होते. आम्ही दोघंही बाईकवर होतो. आमच्या घरात दोन-दोन लग्न होती. त्यामुळे बाजारात जाऊन कपडे घ्यावेत, असा आमचा विचार होता. परतताना मंदिरात दर्शनही करायचंही ठरवलं होतं.

आम्ही जिथून येत होतो तो भाग निर्मनुष्य आहे. खडकाळ आणि वाळूच्या डोंगरांशिवाय तिथे काहीच दिसत नाही. कदाचित तिथूनच त्यांनी आमचा पाठलाग सुरू केला असावा. ते पाच जण होते. दोन बाईकवर. पाठलाग करता करता अचानक ते आमच्या जवळ आले आणि आम्हाला वाळूवर पाडलं.

ते आम्हाला विचारू लागले, "कुठून आला आहात? इथे एकटेच काय करताय? का फिरत आहात?" आम्ही त्यांना सांगितलं, की आम्ही पती-पत्नी आहोत. लग्नाला वर्ष होऊन गेलंय. वाटल्यास आमच्या घरच्यांना विचारा. मात्र, ते ऐकायला तयार नव्हते. त्यांचं एकच सुरू होतं. फिरायला आला आहात दोघं. खोटं बोलत आहात.

प्रतिमा मथळा जगमोहन र्मा, पोलीस उपअधीक्षक, अलवर ग्रामीण

यानंतर त्यांनी आमचे कपडे फाडायला सुरुवात केली. त्यांनी मला बेदम मारहाण केली. अंकितालाही तीन-चार वेळा मारलं. आम्ही खूप ओरडलो. मदतीसाठी हाका मारल्या. त्यांच्या विनवण्या केल्या. मात्र, तिथे कुणीच नव्हतं. ऐकणार कोण?

जवळपास तीन तास त्यांनी आम्हाला टॉर्चर केलं. व्हीडिओ काढत होते. आम्ही विनवण्या करत होतो, की व्हीडिओ काढू नका. पण, त्यांनी ऐकलं नाही.

मी जिमला जातो. मेहनत करतो. पण त्यादिवशी मला काय झालं होतं, कुणास ठाऊक. मी त्यांचा सामनाच करू शकलो नाही. माझ्याकडे सहा हजार रुपये होते. तेही त्यांनी हिसकावून घेतले. मग मी त्यांना सांगितलं की घरी लग्न आहे आणि एवढेच पैसे आहेत माझ्याकडे. यानंतर त्यांनी मला चार हजार रुपये परत केले आणि दोन हजार ठेवून घेतले.

आम्ही कसेबसे उठलो आणि बाईकवरूनच घरी परत आलो. मी अंकिताला तिच्या माहेरी सोडलं आणि मी घरी येऊन झोपलो. झोपलो फक्त म्हणण्यापुरतं. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. कुणालाच काही सांगितलं नाही. हिम्मतच होत नव्हती. काय होऊन बसलं, हेच कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी गुपचूप जयपूरला निघून गेलो. तिथे मी शिकतोय. पण एकट्यानं खोलीत जायची हिम्मत झाली नाही. एका नातलगाकडे गेलो.

अंकिताने रडून रडून आपल्या आईला सगळं सांगितलं. ती खूप घाबरली होती. तीन दिवस फार कठीण गेले. कोंडीत सापडलो होतो.

व्हीडिओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी

याच दरम्यान, त्या लोकांचे वेगवेगळ्या नंबरवरून फोन येऊ लागले. ते ब्लॅकमेल करत होते. धमक्या देत होते. त्यांना दहा हजार रुपये हवे होते. म्हणत होते, "आम्हाला दारू-चिकनची पार्टी करायची आहे. पाच जणं आहोत. प्रत्येकाचे दोन-दोन हजार. दहा हजार दे, नाहीतर व्हीडिओ व्हायरल करेन. आमच्याकडे 11 व्हीडिओ आहेत. पन्नासहून जास्त फोटो आहेत. सगळं व्हायरल करू."

अखेर मी माझ्या घरच्यांना सगळं सांगून टाकलं. ऐकून तेही हादरले. मात्र, हिंमत करून 30 तारखेला आम्ही सर्वच एसपींकडे गेलो.

आम्ही एसपींच्या ऑफिसमध्ये होतो तेव्हाही फोन आला होता. ते पैसे मागत होते आणि व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होते.

एसपींनी सर्व ऐकलं आणि कारवाई करण्याचं आश्वासन देऊन आम्हाला थानागाजी पोलीस स्टेशनला पाठवलं.

6 मे रोजी निवडणूक असल्याने कारवाई नाही

थानागाजीच्या एसएचओ यांनी म्हटलं, की पोलीस ठाण्यात माणसं कमी आहेत आणि सर्वांची 6 मे ला निवडणूक ड्युटी लागली आहे. त्यामुळे काही दिवसानंतरच कारवाई होऊ शकेल.

4 मे रोजी त्यांनी व्हीडिओ व्हायरल केला. माझ्या नात्यातल्या एका भावाने मला फोन करून सांगितलं. आम्ही पुन्हा धावत पळत पोलीस स्टेशनला गेलो. एव्हाना बातमी मीडियापर्यंत पोहोचली होती. व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी हातपाय मारायला सुरुवात केली. मी तो व्हीडिओ अजून बघितलेला नाही. माझी हिंमत झाली नाही.

'माझ्यासोबत काय झालंमलाच ठाऊक'

मुळातच कमी बोलणारी अंकिता आता तर खूपच कमी बोलते. ती सांगते, "माझ्यासोबत काय घडलं मलाच ठाऊक. आज जे माझ्याबाबतीत घडलं ते उद्या इतर कुणासोबत होऊ नये, यासाठी गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी माझी इच्छा आहे. लवकरात लवकरत, कठोरातली कठोर आणि मोठ्यात मोठी शिक्षा. माझ्या मते फाशीच झाली पाहिजे."

कायद्यात फाशीपेक्षाही मोठी शिक्षा असेल तर ती त्यांना व्हावी, असं अरुण म्हणतात. आपल्या बायकोसोबत उभं राहण्याची हिंमत कुठून मिळाली, असं विचारल्यावर ते म्हणाले, "माझं हिच्यावर खूप प्रेम आहे. लग्न झाल्यापासून."

ते म्हणतात, "घरच्यांनी साथ दिली नाही तर आपण लढायचं, हे आम्ही ठरवलंच होतं."

यानंतर ते अंकिताकडे बघून हसत विचारतात, "तुला मी आवडतो की नाही?"

प्रतिमा मथळा पीडित स्त्री आणि तिचे पती

उत्तरादाखल अंकिता फक्त एकच शब्द उच्चारते, "आवडतात."

अरुण सांगतात, की अंकिताला डान्स करायला आवडतो आणि तिनं पोलिसात भरती व्हावं, अशी त्यांची इच्छा आहे.

कुटुंबियांचा भक्कम आधार

यावेळी अंकिता आणि अरुण दोघांचेही घरचे त्यांची सगळी काळजी घेत आहेत. अंकिताचे वडील तिला जास्तीत जास्त आराम करायला सांगतात. तिची सासू तिच्या जेवणाची काळजी घेते.

अंकिताचे वडील म्हणतात, "यात आमच्या मुलीची काय चूक? मी एकटा असतो आणि माझ्यावर पाच जणांनी हल्ला केला असता तर शरण जाण्याशिवाय माझ्याकडेही पर्याय राहिला नसता. हे कुणासोबतही घडू शकतं."

प्रतिमा मथळा पीडितेची खोली

अरूण यांचे वडील आणि अंकिताचे सासरे म्हणतात, "आम्हाला भीती वाटतेय. मात्र, आम्ही आमच्या मुलांची साथ सोडणार नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे."

कोण आहे आरोपी आणि पोलिसांचं म्हणणं काय?

सामूहिक बलात्कार करणारे पाचही तरुण आणि व्हीडिओ व्हायरल करणारा एक तरुण असे सगळेच गुर्जर समाजातले आहेत.

यांची नावं आहेत - अशोक गुर्जर, हंसराज गुर्जर, इंद्रराज गुर्जर, महेश गुर्जर आणि छोटेलाल गुर्जर. मुकेश गुर्जरवर बलात्काराचा व्हीडिओ व्हायरल करण्याचा आरोप आहे.

या सर्वांवर आयपीसीचं कलम 147, 149, 323, 341, 354, 376-D, 506 आणि एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊनही एफआयआरमध्ये आयटी कायद्याचा उल्लेखही नाही. मात्र, आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

प्रतिमा मथळा पीडितेचा पती

सर्व आरोपी आसपासच्या गावात राहणारेच आहेत. मात्र, त्यांना पूर्वी कधीच बघितलेलं नाही, असं पीडित आणि तिच्या पतीचं म्हणणं आहे. सर्व आरोपी 20-25 वयोगटातले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यातलं कुणीच फारसं शिकलेलं नाही आणि कुणाकडेच चांगला रोजगारही नाही.

छोटेलाल बेकायदा दारूविक्री करत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार छोटेलाल आणि हंसराज यांची नावं या आधीही अनेक गुन्ह्यांमध्ये आली आहेत. मात्र, इतर तीन आरोपींबद्दल अशी कुठलीच माहिती नाही.

प्रकरणाचा तपास करणारे अलवर ग्रामीणचे सह पोलीस निरीक्षक जगमोहन शर्मा यांनी बीबीसीशी बोलताना पोलिसांकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.

मात्र, निवडणूक असो किंवा सामान्य नागरिकांच्या समस्या कमी मनुष्यबळामुळे काही अडचणींचा सामना नक्कीच करावा लागतो, हे त्यांनी मान्य केलं. पोलीस विभाग उपलब्ध साधन सामुग्रीतच योग्य कारवाई करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

दुसरीकडे राज्याच्या गहलोत सरकारने प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस निरीक्षक राजीव पचर यांना पुढचे आदेश येईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. याशिवाय थानागाजी पोलीस स्टेशनमधल्या दोन एसएचओंचीही बदली करण्यात आली आहे.

दलितांवर अत्याचार, गुर्जर समाजाचा 'धाक'

या प्रकरणातले सर्व आरोपी गुर्जर समाजातले आहेत. अरूण यांच्या घरी आलेल्या बहुतांश लोकांचं म्हणणं आहे, की या भागात गुर्जरांचा दबदबा आहे. अलवरचे स्थानिक पत्रकारही त्याला दुजोरा देतात.

एका स्थानिक पत्रकाराने सांगितलं, "गेल्या अनेक वर्षातल्या गुन्हेगाराचा रेकॉर्ड बघितला तर लक्षात येईल की गुन्हेगारीत गुंतलेल्यांमध्ये गुर्जरांची संख्या मोठी आहे. इथे पूर्वीपासूनच गुर्जर वरचढ आहेत. भांडण-तंट्यातही ते सर्वांत पुढे असतात. याचं कारण शिक्षणाचा आणि रोजगाराचा अभाव असू शकतो."

या मुद्द्यावरून विरोध प्रदर्शन करणारे सामाजिक कार्यकर्ते महेश शर्मा सांगतात, "चांगली-वाईट माणसं प्रत्येकच समाजात असतात. मात्र, दलितांवर अन्याय करून तो दाबून टाकणं गुर्जरांसाठी सोपं आहे, हे वास्तव आहे. दलितांवर होणाऱ्या अन्यायाच्या कारणांमध्ये एका विशिष्ट जातीचं प्रभुत्व हे कारणही आहे. शिवाय त्यांना राजकीय संरक्षण मिळतं, यात शंका नाही."

अलवरला लागून असलेल्या भिवाडीतले दलित कार्यकर्ते ओमप्रकाश जाटव सांगतात, "गुर्जर समाजाच्या या मनमानीमागे एक मोठं कारण म्हणजे मोठ्या पदांवर याच लोकांचा ताबा आहे. शिवाय नेत्यांनाही गुन्हेगारी स्वरुपाच्या लोकांची गरज असते. त्यामुळे ते यांना सांभाळून घेतात."

दुसरीकडे स्थानिकांचं हेदेखील म्हणणं आहे की माजी आमदारही गुर्जर समाजातले होते आणि पोलीस विभागातही गुर्जरांचा दबदबा आहे. अशात अनेक प्रकरणं अशीच दाबून टाकली जातात.

अलवरमध्ये राहणारे बादल हरसाना हे देखील गुर्जर समाजातलेच आहेत. प्रॉपर्टी डिलिंगचा व्यवसाय करणारे बादल त्यांच्या समाजावर होणाऱ्या या आरोपांवर म्हणतात, "मीही गुर्जर आहे. मात्र शिकलोय. त्यामुळेच कदाचित माझी विचार करण्याची पातळी वेगळी आहे. गुर्जरांमध्येही खूप दारिद्र्य आणि कुपोषण आहे. तुम्हीच विचार करा, या प्रकरणात आरोपी दहा हजार रुपये मागत होते. फक्त दहा हजार रुपयांसाठी त्यांनी एवढा मोठा गुन्हा केला. ते कसं आयुष्य जगत असतील, याचा विचार करा."

2011च्या जनगणनेनुसार राजस्थानात जवळपास नऊ टक्के म्हणजे जवळपास 70 लाख गुर्जर आहेत. राज्यात आठ आमदार याच समाजातून येतात. राजस्थानातला गुर्जर समाज शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण मिळवण्यासाठी आणि अनुसूचित जातीत समावेश व्हावा, यासाठी झगडत आला आहे. सध्या राज्यात ते अनुसूचित जाती म्हणजे ओबीसींमध्ये गणले जातात.

थानागाजीमध्ये सातत्याने होत असलेले गुन्हे

थानागाजी भागातून एकापाठोपाठ एक गुन्हेगारीची प्रकरणं समोर येत आहेत.

स्थानिक टीव्ही चॅनलचे पत्रकार शिवचरण यांनी बीबीसीला सांगितलं, "आता फेब्रुवारीत इथे एका किशोरवयीन मुलीवर चार मुलांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्या प्रकरणात आतापर्यंत केवळ एका आरोपीला अटक झालीय. 2017 साली 56 वर्षांच्या महिलेवर अनेक लोकांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांच्या वहीत नोंद आहे. मात्र, ठोस कारवाई न झालेली अनेक प्रकरणं आहेत."

थानागाजीच्या स्थानिकांचं म्हणणं आहे की चोरी, लूट आणि इतर गुन्हेही इथे खुलेआम होत असतात.

नेते, राजकारण आणि महिला आयोग

अलवर गँगरेप प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावणारी भाजप याचा शस्त्राप्रमाणे वापर करून सत्ताधारी काँग्रेसवर सातत्याने टीका करतेय.

पक्षाने गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी निदर्शनं करताना अशोक गहलोत यांना 24 तासांचा अल्टिमेटम देऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

अलवर आणि राजधानी जयपूरसह राज्याच्या अनेक भागात बंद पुकारण्यात येतोय. दलित संघटनादेखील आंदोलन करत आहेत. शुक्रवारी महिला आयोगाच्या काही सदस्याही पीडितेच्या घरी दाखल झाल्या होत्या.

तर पीडितेच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की राजकारणाच्या चक्रात न्याय मिळवण्याच्या त्यांच्या मागणीचा विसर पडता कामा नये.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)