साध्वी प्रज्ञा सिंह भाजपसाठी राम मंदिरासारखाच फक्त एक निवडणुकीचा मुद्दा – प्रवीण तोगडिया #5मोठ्याबातम्या

तोगडिया आणि साध्वी Image copyright Getty Images

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:

1. 'भाजपसाठी हिंदुत्व आणि साध्वी प्रज्ञा सिंह केवळ निवडणुकीपुरते'

"भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुढे करतो. तसेच हा पक्ष हिंदूंसाठी असलेल्या वल्गना करत असतो. पण भाजपचं हिंदूत्व आणि त्यांचा राम दोन्ही गोष्टी निवडणुकीपुरत्या मर्यादित आहेत." असं वक्तव्य आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केलं आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

"भारतीय जनता पक्षाने त्यातही प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्या येथील राम मंदिर, इंदोरची मशीद, शेतकरी आत्महत्या, देशाच्या विकासाचं आश्वासन यांचा केवळ निवडणुकीसाठी वापर केला आहे. भाजपला यापैकी कोणत्याही गोष्टीशी काहीही देणेघेणे नाही." तोगडिया म्हणाले.

भोपाळच्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याबाबतीत बोलताना ते म्हणाले, "जेव्हा तुरुंगात होती, तेव्हा भाजपचे नेते तिच्याविषयी काहीच बोलत नव्हते. मी जर तिच्या बाजूने काही बोललो तर मला नेहमी रोखायचे.

"परंतु त्याच भाजपच्या नेत्यांनी आता साध्वीला मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भाजपसाठी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरदेखील निवडणुकीचा मुद्दा आहे. भाजपला साध्वीसाठी कोणत्याही प्रकारची सहानुभूती नाही. त्यांना केवळ तिचा निवडणुकीसाठी वापर करायचा आहे," असं तोगडिया यावेळी म्हणाले.

2. काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेटचा प्रांत स्थापन केल्याचा दावा?

आंतरराष्ट्रीय कट्टरतावादी संघटना इस्लामिक स्टेटनं काश्मीरमध्ये 'विलायह ऑफ हिंद' नावाचा प्रांत स्थापन केल्याचा दावा केला आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. द इंडियन एक्सप्रेसनं ही बातमी दिली आहे.

त्याला इस्लामिक स्टेट जम्मू काश्मीर (ISJK) असंही म्हटलं गेलं. शुक्रवारी संध्याकाळी इस्लामिक स्टेटची वृत्तसंस्था अमाकनं 'विलायह ऑफ हिंद' हा प्रांत स्थापित केल्याचा दावा केला होता.

पण इशफाक अहमद सोफी या कट्टरवाद्याच्या खात्म्यानंतर ISचं अस्तित्व संपल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Image copyright EPA

गेल्या आठवड्यात पोलीस चकमकीत सोफीला ठार करण्यात आलं होतं. त्याबरोबरच इस्लामिक स्टेटचा काश्मीरमधून नायनाट केल्याचा जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितल्याचं या बातमी दिलं आहे.

"मेल्यानंतर कुणीही त्याची जबाबदारी घेतं आणि त्यांच्या शहिदांच्या यादीत नाव जोडलं जातं," असं सिंह यांनी सांगितलं.

3. 'अपाचे' हेलिकॉप्टर हवाई दलाच्या ताफ्यात दाखल

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात 'अपाचे' हे अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत. अमेरिकेतील अॅरिझोना येथील उत्पादन तळावर भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे अपाची हेलिकॉप्टर सुपूर्द करण्यात आले. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

अॅरिझोनामध्ये अपाचे हेलिकॉप्टरचे उत्पादन केंद्र आहे. या हेलिकॉप्टरची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते. हवाई दलाच्या पठाणकोट तसेच आसामच्या जोरहाटमध्ये या हेलिकॉप्टर्सचा तळ असेल.

भारत आणि अमेरिकेत सप्टेंबर 2015मध्ये 13,952 कोटी रुपयांचा अपाची हेलिकॉप्टर खरेदीचा करार झाला होता. भारताला मार्च 2020 पर्यंत 22 अपाची हेलिकॉप्टर मिळणार असल्याचंही या बातमीत दिलं आहे.

4. मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यावर थापा मारणार नाहीत - रामदास आठवले

राज्याच्या दुष्काळ निवारणासाठी दोन हजार कोटींचा निधी केंद्र सरकारने दिल्याचे ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. पण प्रत्यक्षात ही मदत मिळालीच नसल्याचा दावा अनेकांनी केला आहे.

याबाबत मुख्यमंत्रीही मोदींच्या पावलावर पाऊल टाकत आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे नेते रामदास आठवले म्हणाले, "पंतप्रधान मोदी यांनी सत्तेवर येताना जी आश्वासने दिली आहेत, ते पूर्ण करण्यासाठी आणखी पाच वर्षांचा कालावधी त्यांना लागणार आहे़. त्यामुळे पुन्हा सत्तेवर येताच ते आश्वासनांची पूर्तता करतील ते पुन्हा थापा मारणार नाहीत."

Image copyright Getty Images

"मी ज्यांना पाठिंबा देतो, त्यांचीच सत्ता येते. माझा पाठिंबा आता भाजपला असून देशात पुन्हा भाजपाची सत्ता येणार" असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

4. पावसाळी अधिवेशन मुंबईतच

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी चार महिने शिल्लक आहेत. त्यामुळे 17 जूनपासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार असून त्यात घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याची बातमी सकाळ ने दिली आहे.

या अधिवेशनाची अधिसूचना आज जारी करण्यात आली. राज्यातला दुष्काळ, कर्जमाफी, धनगर आरक्षणासारख्या प्रश्नांना या अधिवेशनात सामोरं जावं लागणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला जाणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)