उत्तराखंड: भर लग्नात 'बेदम मारहाण' करून दलिताची हत्या, पण साक्षीदारच नाही

जितेंद्र
प्रतिमा मथळा जितेंद्र

उत्तराखंडमध्ये एका लग्नात पाहुणा म्हणून आलेल्या दलित मुलाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. लग्नाला अनेक जण आले पण कुणीच पुढे होऊन सांगायला तयार नाही त्या दिवशी काय झालं.

या घटनेनंतर बीबीसीचे प्रतिनिधी विनित खरे यांनी बासणगावला भेट दिली. वाचा हा ग्राउंडिरिपोर्ट

26 एप्रिलच्या रात्री उत्तराखंडच्या शहरी भागापासून लांब कोट गावात कालेदास यांच्या मुलाच्या लग्नात जवळपासच्या गावातून शेकडो लोक आले होते.

डोंगरांमधल्या लहान लहान शेताजवळ असलेल्या या गावातल्या एका मैदानात लग्नकार्य होतं.

कालेदास दलित आहेत आणि परंपरेप्रमाणे लग्नातलं जेवण सवर्ण बनवत होते. या भागात अनेक सवर्ण दलितांच्या हातचं जेवत नाहीत, पाणीही पीत नाहीत.

दलित सांगतात की लग्नातही दलित आणि सवर्णांच्या वेगवेगळ्या पंगती बसतात. मात्र, काही सवर्ण याचा इन्कार करतात.

अनेक दलितांनी सांगितलं की सवर्ण त्यांना घराबाहेरच चहा आणून देतात. त्यांना चहाचा कप धुवून द्यायला सांगतात. त्यानंतर तो कप पुन्हा धुतला जातो.

कुणीच काही बघितलं नाही

26 एप्रिलच्या रात्री मैदान पाहुण्यांनी भरलं होतं. 21 वर्षांचा दलित तरुण जितेंद्र लग्नासाठी आला होता. त्याला काही जणांनी बेदम मारहाण केली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असा आरोप आहे.

पण या घटनेला साक्षीदारच नाहीत. जितेंद्रला आधी मंडपात आणि त्यानंतर मंडपापासून काही अंतरावर नेऊन मारल्याचा आरोप आहे.

या मारहाणीत तो अर्धमेला झाला. मात्र कुणीच बघितलं नाही.

जितेंद्रच्या कुटुंबीयांच्या मते तो सवर्णांच्या समोर बसून जेवला म्हणून त्याला मारहाण करण्यात आली.

कालेदास (ज्यांच्या मुलाचं त्या रात्री लग्न होतं) सांगतात की डीजेच्या मोठ्या आवाजात त्यांना काहीच ऐकू आलं नाही.

जितेंद्र बसाणगावचा होता. त्याच्या गावातलेही अनेक जण लग्नात आले होते. मात्र, कुणीच काही बघितलं नाही.

कोट गावातलेही शेकडो लोक त्या मंडपात होते. मात्र, त्यांनीही काहीच बघितलं नाही. असंच ते म्हणत आहेत.

'हा जातीचा मुद्दा आहे'

मात्र, त्या रात्री काय घडलं, हे सगळ्यांनी ऐकलं आहे. लग्नात जेवताना जितेंद्र खुर्चीत बसला आणि त्याने घास घेतला तेव्हा एकाने त्याला जातीवाचक भाषा वापरत दुसरीकडे बसायला सांगितलं.

जितेंद्रने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यावर त्या व्यक्तीने लाथ मारून ताट फेकलं.

वाद वाढला आणि त्या आरोपीसोबतच्या लोकांनी मिळून जितेंद्रला मारायला सुरुवात केली.

जितेंद्रने कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि तो मंडपातून बाहेर पळाला. त्यानंतर काही अंतरावर आरोपींनी त्याला पुन्हा घेरलं आणि पुन्हा मारहाण केली.

प्रकरणाचा तपास करणारे उत्तराखंडचे पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) अशोक कुमार म्हणतात, "मारहाण जेवतानाच झालेली आहे. खुर्चीत बसण्यावरून वाद झाला. त्यात त्यांच्या कपड्यांवर जेवण सांडलं. यामुळेच मारहाण झाली. एससी- एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याने प्रकरण जातीशी संबंधित असल्याचं कळतं."

दुसऱ्या दिवशी जितेंद्रची आई गीता देवी पहाटे पहाटे उठल्या तेव्हा त्यांना जितेंद्र अर्धमेल्या अवस्थेत घराबाहेर पडलेला दिसला.

लग्नात तो जो शर्ट घालून गेला होता तो ठिकठिकाणी फाटला होता.

जितेंद्रच्या छाती, चेहरा, हात आणि गुप्तांगावर जखमा झालेल्या दिसत होत्या.

जितेंद्रला घराबाहेर कोण सोडून गेलं?

मुलाला या अवस्थेत बघून घाबरलेल्या गीता देवी पळत पळत शेजारच्या टेकडीवर असलेल्या आपल्या मुलीच्या घरी गेल्या आणि जोरजोरात दार ठोठावू लागल्या. आयुष्यात पुन्हा काहीतरी अघटित घडणार, याची चाहूल त्यांना लागली होती.

जवळपास पाच वर्षांपूर्वी घरी कुणी नसताना त्यांच्या पतीचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता.

सर्वांनी ही आत्महत्या असल्याचं म्हटलं होतं. मात्र, हा खून असल्याचा दाट संशय कुटुंबीयांना आहे.

दोन खोल्यांच्या आपल्या झोपडीवजा घराबाहेर मातीच्या ढिगाऱ्याजवळ बसलेली गीता देवी यांची मुलगी पूजा सांगत होती, "जितेंद्र थोडंफारच बोलू शकत होता. ज्याच्यासोबत भांडण झालं होतं त्याचंच नाव तो घेत होता. त्याला बोलता येत नव्हतं. पण, तो बोलण्याचा प्रयत्न करत होता. काय बोलतोय, ते फार काही कळत नव्हतं."

ती सांगते, "जितेंद्रला घराबाहेर कोण सोडून गेलं, माहिती नाही. त्याची बाईक जवळच उभी होती. बाईकची किल्ली त्याच्या खिशात होती."

तपासाचे आदेश

घटनेच्या नऊ दिवसांनंतर हॉस्पिटलमध्ये जितेंद्रचा मृत्यू झाला. भाऊ गेल्याच्या दुःखात सतत रडून रडून पूजाचा आवाज बसला होता.

वेगवेगळ्या कलमांखाली सात जणांना अटक करण्यात आली आहे. एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याने तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

स्थानिक दलितांनी सांगितलं की घटना घडली तेव्हा तिथे अनेक साक्षीदार होते. पण, कुणीच बोलायला तयार नाही.

त्या भागात काम करणारे दलित कार्यकर्ते जबर सिंह म्हणतात, "घटना 26 एप्रिल रोजी घडली. मात्र, 29 तारखेपर्यंत FIR दाखल झाला नाही. याच दरम्यान गुन्हेगारांना संधी मिळाली. त्यांना वाटलं, या प्रकरणात पुढे काही घडणार नाही. त्यामुळे जे साक्षीदार होते, ज्यांना मध्यस्थी करताना थोडाफार मारही लागला होता, ते फिरले. लोकांना वाटतं कशाला वैर ओढावून घ्यायचं.?"

तक्रार नोंदवून घेण्यात झालेल्या विलंबाविषयी पोलीस महासंचालक (कायदा सुव्यवस्था) अशोक कुमार सांगतात, "आम्ही तपासाचे आदेश दिले आहेत. कारण, अशा प्रकारचे आरोप मीडियामधूनही झाले होते. पोलीस ठाण्याचे प्रमुख आणि चौकी इन्चार्जची बदली करण्यात आली आहे आणि तपासाचे आदेशही दिले आहेत."

दलितांवर होणाऱ्या अत्याचारांची प्रकरणं

या घटनेमध्ये साक्षीदार पुढे न येण्याची दोन कारणं आहेत एक म्हणजे भीती आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथले बहुतांश दलित हे सवर्णांवरच आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत.

जबर सिंह वर्मा सांगतात, "हा भाग खूप आत आहे. हे दलित कुटुंब आहे. यांच्याकडे स्वतःची जमीन नाही. यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. प्रत्येक गावात फक्त चार-पाच कुटुंब अनुसूचित जातीतली असतात. आणि ही कुटुंबं सवर्णांवर अवलंबून असतात. त्यामुळेच यांच्यात भीती असते. शिवाय ही पहिलीच घटना नाही. अशा घटना वारंवार घडतात."

प्रतिमा मथळा जबर सिंह

"हे दबावाचं प्रकरण आहे. समोरचा पैसेवाला आहे. त्याच्या ओळखी आहेत. त्याच्या घरातला अधिकारी आहे. त्याच्याकडे स्वतःची जमीन आहे. पैसा आहे. त्याच्या लिंक्स आहेत. दुसरीकडे एक छोटसं एका खोलीत राहणारं कुटुंब आहे. कुटुंबाची आर्थिक घडी जरा बरी असती तर या लोकांनी आवाज उठवलाही असता. मात्र, तसं नाही. मुलाच्या वडिलांचा मृत्यू झालाय. त्यामुळे इतरांना वाटलं एका कुटुंबासाठी शत्रुत्व कशाला ओढावून घ्या."

बासणगावात जवळपास 50 कुटुंब आहेत. यातले 12-13 दलित आहेत. हीच परिस्थिती आसपासच्या इतर गावांची आहे.

उत्तराखंडमध्ये 19% दलित आहेत. राज्याच्या अनुसूचित जाती आयोगानुसार त्यांच्याकडे दरवर्षी दलितांवरील अत्याचाराची 300 प्रकरणं येतात. खरा आकडा तर याहून जास्त आहे.

कोण होता जितेंद्र?

जितेंद्र बाजगी समाजातला होता. या समाजातले लोक लग्न किंवा इतर शुभप्रसंगात ढोल किंवा इतर वाद्य वाजवतात.

जितेंद्रला ओळखणारे सांगतात की जितेंद्र शांत स्वभावाचा आणि मितभाषी होता.

पाच वर्षांपूर्वी वडिलांच्या निधनानंतर सातवीत असलेल्या जितेंद्रला शाळा सोडावी लागली.

तणावपूर्ण वातावरण

बासणगाव, कोट आणि आसपासच्या इतर गावातल्या दलितांमध्ये जितेंद्रच्या मृत्यूमुळे संताप आहे.

काही आपला संताप उघडपणे व्यक्त करतात. मात्र, बहुतांश लोक शांतच आहेत.

या भागातले सवर्ण या प्रकरणाला जातीशी जोडत नाहीत.

एकाने म्हटलं, "लग्नात थोडाफार वाद झाला असेल ज्याचं वाईट वाटल्याने जितेंद्रने आत्महत्या केली असावी."

Image copyright Empics
प्रतिमा मथळा जितेंद्रची आई

दुसऱ्याने सांगितलं, "जितेंद्रने मारहाणीची नामुष्की ओढावू नये, यासाठी कंपवाताच्या 20-30 गोळ्या घेतल्या. त्यामुळेचा त्याचा मृत्यू झाला."

जितेंद्रला गेल्या चार वर्षांपासून कंपवाताचा त्रास होता. तो आयुर्वेदिक उपचार घेत होता. मात्र, जितेंद्रचे कुटुंबीय सांगतात की जितेंद्रने गोळ्या घेतल्या नव्हत्या.

जितेंद्रच्या घराबाहेर बाईकवर उभ्या एका सवर्णाने जितेंद्रच्या मृत्यूच्या कारणांवर प्रश्न उपस्थित करताच तिथेच उभा असलेला एक दलित तरुण भयंकर संतापला आणि मोठमोठ्याने त्याचं म्हणणं खोडून काढू लागला.

सोशल मीडियावरही या घटनेची चर्चा सुरू आहे. तिथेही अनेक सवर्णांनी जातीमुळे जितेंद्रचा मृत्यू झाला असावा, याचा इनकार केला आहे.

जितेंद्रच्या मृत्यूबद्दल त्याच्या मेडिकल रिपोर्टमध्ये काय लिहिलंय, हे स्पष्ट नाही.

डेहरादून पोलीस मुख्यालयातल्या एका सवर्ण कर्मचाऱ्याने टोमणा मारण्याच्या स्वरात सांगितलं, "अच्छा तर दलिताचा मुद्दा आंतरराष्ट्रीय बनला आहे."

'हा कट आहे'

जितेंद्रच्या प्रकरणातले आरोपी जवळच्याच भटवाणी गावातले आहेत.

आरोपींच्या घरी आमची भेट प्रियंकाशी झाली. तिच्या मांडीत वर्षभराचं बाळ झोपलं होतं.

तिचे वडील, चार काका आणि दोन भाऊ आरोपी आहेत आणि पोलिसांच्या ताब्यात आहेत.

प्रियंका लग्नाला गेली नव्हती. हा 'कट' असल्याचं असल्याचं तिचं म्हणणं आहे.

ती सांगते, "माझ्या वडिलांनी मला हेच सांगितलं की त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही काही बोललोही नाही आणि काही बघितलंही नाही. त्यांनी जातीवाचक शब्द वापरले असते तर आम्ही त्यांच्या लग्नाला गेलोच नसतो. इतक्या लोकांनी मिळून एका व्यक्तीला मारलं असतं तर तो तिथेच मेला असता."

प्रियंकाशी बोलत असताना आम्हाला अनेक सवर्णांनी गराडा घातला. आपण जातीवरून भेदभाव करत नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं. 41 कुटुंबांच्या या गावात 11-12 दलित कुटुंबं आहे.

एकाने एका दलिताकडे इशारा करत मोठ्या आवाजात म्हटले, "त्यांना विचारा आम्ही त्यांच्यासोबत भेदभाव करतो का?"

मला काही कळण्याच्या आधीच तो दलित तिथून निघून गेला.

सामाजिक दबाव

एकुलती एक कमावती व्यक्ती गमावल्याने जितेंद्रची आई, बहिण आणि छोट्या भावासमोर वरच्या जातीचा प्रभाव असणाऱ्या या भागात आव्हानं कमी नाहीत.

आम्ही जितेंद्रच्या घरी पोचलो तेव्हा तिथे शूटर जसपाल राणा यांचे वडील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित क्रीडा भारती संघटनेचे नारायण सिंह राणाही तिथे सांत्वन करण्यासाठी आले होते. ते लखनौमधून त्यांचे व्याही राजनाथ सिंह यांची प्रचार मोहीम आटपून आले होते.

प्रतिमा मथळा जयपाल राणाचे वडील नारायण सिंह राणा

जितेंद्रची आई गीता देवी नारायण सिंह राणा यांच्या घरात झाडलोट आणि भांडी करायची.

माजी आमदार आणि मंत्री नारायण सिंह राणा यांनी गीतादेवीसाठी एक पोतं तांदूळ आणला होता.

त्यांनी जितेंद्रचा मृत्यू 'दुःखद आणि भयंकर' असल्याचं म्हटलं. मात्र, सोबतच ते म्हणाले, "एक घटना घडली. कुणी मुद्दाम तर केलं नाही. दारू नसती तर ही घटना घडलीच नसती. छोटीशी घटना घडली आणि त्याचा मोठा बभ्रा झाला."

मी विचारला तुम्हाला ही छोटी घटना वाटते. त्यावर ते म्हणाले, "ही छोटीशी घटना नाही. खूप मोठी घटना आहे."

जितेंद्रची आई गीता देवी सांगतात की जितेंद्रच्या मृत्यूनंतर त्यांना भेटायला काही लोक आले होते.

त्या सांगतात, "(ते लोक) आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते. समेट करा. दोष तुमचाच आहे. (त्यांनी माझ्या मुलाला) मारलं. बेदम मारलं. (त्याला) जेवताही येत नव्हतं. (आमच्या) मागे-पुढे कुणीच नाही."

अशा दुर्गम गावांमध्ये समेटासाठी दबाव नवीन गोष्ट नाही. तर पोलीस दबाव आणि भीती या दोन्हींचा इन्कार करतात.

नारायण राणा सांगतात, "त्यांना अजून समाजात रहायचं आहे. आम्हाला यांना वाचवायचं आहे. आम्हाला यांची सुरक्षा करायची आहे. यांचं भरणपोषण करायचं आहे."

कदाचित याच सामाजिक विणीमुळे या गावातला आणि आसपासच्या गावातला प्रत्येक व्यक्ती म्हणतोय - आम्ही काहीच बघितलं नाही.

दलितांवरच्या अत्याचाराचा इतिहास

उत्तराखंड अनुसूचित जाती आयोगाचे वरिष्ठ सल्लागार देव सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे आयोगाकडे दर वर्षी दलितविरोधी 300 प्रकरणं येतात. खरी संख्या यापेक्षा मोठी आहे.

ते सांगतात, "गावात दलितांचा तिरस्कार करण्याच्या घटना घडतच असतात. वरच्या जातीतले लोक त्यांच्या जमिनीचे पट्टे बळकावतात. अनेक प्रकरणांमध्ये तर पोलीस तक्रार दाखल करायलाच नकार देतात."

मात्र, उत्तराखंडमध्ये दलितांवरच्या अत्याचाराचा इतिहास खूप जुना आहे.

1980 साली कफल्टा गावात उच्चवर्णियांनी 14 दलितांची हत्या केली होती.

कफल्टा गावातून एक वरात जात असताना काही महिलांनी बद्रीनाथ देवाचा मान ठेवण्यासाठी नवरदेवाला डोलीतून उतरण्यास सांगितलं. नवरदेव मंदिरासमोरच उतरेल, असं दलितांचं म्हणणं होतं. याच वादाचं पर्यवसान 14 दलितांच्या हत्येत झालं.

काही महिन्यांपूर्वी उत्तराखंड पोलीस दलातल्या एका शिपायाच्या वरातीला मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं होतं.

त्याच वरातीत असलेले दलित कार्यकर्ते दौलत कुंवर सांगतात, "त्या गावात दलितांची संख्या कमी आहे. मी गावातल्या सवर्णांमधल्या काहींना म्हटलं, हा पोलीसवाला आहे. याला देवापुढे काही अर्पण करायचं आहे. त्याला करू द्या. तर ते म्हणाले, तू नेतागिरी करू नकोस. जे करायचं आहे ते मंदिराच्या फाटकापाशी कर."

2016 साली दौलत कुंवर माजी खासदार तरुण विजय यांच्यासोबत राज्यातल्या चकराता भागातल्या पुनाह देवतेच्या मंदिरात गेले होते त्यावेळी त्यांच्यावर दगडफेक झाली होती. यात दोघांनाही मार बसला.

बागेश्वरमध्ये पिठाच्या गिरणीला 'बाटवलं' म्हणून एका दलिताचं मुंडकं छाटण्यात आलं.

राज्यातल्या एका महाविद्यालयात स्वयंपाकीण (भोजन माता) म्हणून दलित महिलेची नियुक्ती झाली तेव्हा तिला काढण्यासाठी आंदोलन झालं.

दलित कार्यकर्ते दौलत कुंवर सांगतात, "ती बाई (दलित भोजन माता) फक्त स्वयंपाकासाठीची लाकडं स्वयंपाकघराबाहेर ठेवायची. एवढंच. मात्र, तरीही एकही मुलगा तीन दिवस कॉलेजमध्ये जेवला नाही."

दलित कार्यकर्ते सांगतात की राज्यातल्या जनसौर भागात पोलिसांनी हस्तक्षेप करुनदेखील आजही अशी मंदिरं आहेत जिथे दलितांना प्रवेश नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)