IPL 2019 Final - MI vs CSK: वर्ल्ड कपच्या उंबरठ्यावर IPLने असं केलं ग्लोबलायजेशन - ब्लॉग

आयपीएल अंतिम सामना Image copyright Getty Images

देशात सत्तेसाठीचा सारीपाट मांडला जाण्याची प्रक्रिया सुरू आहे. जाहीरनामे, उमेदवारांची नावं जाहीर होतानाची रस्सीखेच, हेलिकॉप्टरने येणारे उमेदवार, आरोप-प्रत्यारोपांची राळ, व्हायरल होणारी वक्तव्यं यांनी अवकाश व्यापला आहे. आणि अवघ्या दहा दिवसात देशाची सूत्रं कुणाकडे असतील, हे स्पष्ट होईल.

शेती, हमीभाव, दुष्काळ, आत्महत्या, रोजगार, गरिबी, रस्ते अशा सगळ्या प्रश्नांनी उमेदवार आणि आपल्याभोवती फेर धेरला आहे. खंडप्राय अशा आपल्या देशात लोकशाहीचा उत्सव जोशात असतानाच इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचा पट मांडला गेला.

निवडणुकांमुळे ही स्पर्धा विदेशात होणार अशी चर्चा होती. स्पर्धा आयोजन पुढे ढकललं जाईल, असंही वर्तवलं गेलं. कुणी म्हणालं की ही स्पर्धा लहान स्वरूपात होईल. मात्र तसं काहीही झालं नाही.

IPL तेवढ्याच जल्लोषात, थाटात झालं. वर्ल्डकपच्या उंबरठ्यावर झालेला हा महोत्सव अनेकअर्थी महत्त्वाचा.

रमझानच्या महिन्यात संध्याकाळी हैदराबादचा माहोल गजबजलेला होतो. 12 तारखेच्या दुपारी रामंतपूरच्या भल्यामोठ्या शिळांच्या मागे उभ्या असलेल्या अजस्त्र अशा राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमच्या बाहेर लगबग सुरू झाली होती.

खरंतर यजमान हैदराबाद, म्हणजेच सनरायझर्स हैदराबादचं आव्हान संपुष्टात आलेलं. फायनल मॅच होती मुंबई आणि चेन्नई या संघांदरम्यान, म्हणजे दोन्ही पाहुणे संघ. पण IPL कुठेही माहोल निर्माण करण्यात यशस्वी ठरतं.

फॅन्सचा उत्साह

हैदराबादेत शनिवारी रात्री पाऊस झाला. मात्र तरीही रविवारी पाऱ्याने चाळिशी गाठली होती. घराबाहेर पडताच घामाच्या धारा न्हाऊ घालत होत्या. मात्र आदित्य नारायणाची ही खप्पामर्जी सहन करत क्रिकेटचाहत्यांचे जत्थे उपलच्या स्टेडियमच्या दिशेने निघाले होते.

मोदी पुन्हा येणार का, हा गेल्या दीड महिन्यातला सवयीचा प्रश्न कुणाच्या गावीही नव्हता.

Image copyright PARAG PHATAK/BBC

दोन्ही संघांचे टीशर्ट्स आणि टोपी विकणारी मंडळी रविवारची बेगमी करण्यासाठी सरसावली होती. पिपाण्या विकणारे आपला आवाज टिपेला कसा जाईल, याची जाहिरात करत होते.

स्टेडियमच्या बाहेर एका दिशेला दुसऱ्या एक भल्याथोरल्या बिल्डिंगचं काम सुरू आहे. या बिल्डिंगच्या उभारणीसाठी आलेली मजूर मंडळी सिमेंटच्या पोत्यातून, धूळ भरलेल्या डोळ्यातून IPLच्या जत्रेसाठी जमलेल्या मंडळींना न्याहाळत होती.

कुणी मिनरल वॉटरच्या बाटल्या विकत होतं तर कुणी चॉकलेटगोळ्या. प्रत्येकाला आपापलं IPL कमवायचं असतं.

वेगवेगळ्या रंगांची, रूपांची, वस्त्रांची, आवाजांची, स्तरातली माणसं या महाकाय स्टेडियमच्या पोटात शिरण्यासाठी रांगा लावून उभी होती. कुणाच्या डोळ्यात धोनीला पाहण्याची उत्सुकता दडली होती तर काहींना अजूनही सचिन पाहायचा होता.

झेंडे फडकावले जात होते. आज हा चमकणार, तो मैदान गाजवणार, अशा चर्चा रंगत होत्या. अनेक जण तर तिकीट कन्फर्म न झाल्याने हिरमुसल्या मनाने परतत होते.

शरीरावर टॅटू गोंदवलेले, केसांना हटके कट दिलेले येत होते. लहानग्या मुलाचं बोट धरून त्यांचे पालक येत होते. नातवाचा उत्साह आणि वार्धक्यातली उत्सुकता दोन्ही अनुभवायला मिळत होतं.

हैदराबाद शहर आणि क्रिकेटविश्वातले 'Who's who' आपापल्या SUVमधून येत होते. उर्दूमिश्रित तेलुगू कानांवर पडत होती. हैदराबाद ते सायबराबाद असं संक्रमण जाणवत होतं.

श्रीनगरपासून वायनाडपर्यंत आणि गुजरातपासून गुवाहाटीपर्यंतची मंडळी होती.

Image copyright PARAG PHATAK/BBC

हैदराबादचं मराठी कनेक्शन तगडं आहे. मराठवाड्यातली अनेक मंडळी कुटुंबकबिला घेऊन हजर झाली होती. क्रिकेटचे शौकीन असलेले कार्यकर्ते पार मिरजेहून हैदराबादेत दाखल झाले होते.

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, हे प्रतिज्ञेतलं वाक्य इथे क्षणोक्षणी अनुभवायला मिळत होतं. आत 22 यार्डांवर रंगणाऱ्या नाट्याइतकंच स्टेडियमबाहेरच्या रांगांमध्ये भरलेला भारत अनुभवणं अनोखं होतं.

क्रिकेट कनेक्शन

अनेकांच्या IPL, क्रिकेट असं काही गावीही नाही. मात्र अनेकांनी रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनीला आपल्या गावचं करून घेतलं आहे.

राजकीय मैदानात कुणी कुणाचा मित्र नसतो, शत्रूही नसतो. IPL तरी वेगळं काय आहे. आपापल्या देशांसाठी खेळताना एकमेकांना पाण्यात पाहणारे खेळाडू आता गळ्यात गळे घालून असतात.

खेळ मनं जोडतात, असं म्हटलं जातं. त्यामुळे कदाचित रांचीचा धोनी चेन्नईकरांचा लाडका 'थला' होऊन जातो. आणि फॅफ डू प्लेसी अशा कठीण नावाचा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू चेन्नईकडून खेळतो, आणि त्याला पाहण्यासाठी नामपल्लीचा वेंकट रांगेत उभा राहतो. कदाचित यालाच ग्लोबलायजेशन म्हणत असावेत!

Image copyright PARAG PHATAK/BBC

दरवर्षी उन्हाळ्यात IPLचा फड रंगतो. GDP, GST सगळं मागं पडतं आणि पैशाचं प्रचंड अर्थकारण खेळाआडून कब्जा करतं. क्रिकेटविश्वातलं सगळं आजीमाजी तारांगण भारतात अवतरतं.

स्पॉटफिक्सिंग, मॅचफिक्सिंग आणि असंख्य वादांचा इतिहास साक्षी असतानाही मेट्रो शहरात, टिंबाएवढ्या गावांमध्ये IPLचा ज्वर पसरतो. शिक्षणात यथातथा असणारी मंडळी IPLच्या संघांची पल्लेदार इंग्रजी नावं झटक्यात सांगतात.

तीन तासात फैसला लागतो. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या अंतिम नाट्यात मुंबई बाजी मारतो. चंद्र रात्रीच्या मुक्कामाला येऊन स्थिर झालेला असतो, तेवढ्यात आकाशात आतषबाजी सुरू होते आणि हैदराबादचा पहुडलेला मध्यरात्रीचा आसमंत प्रकाशाने जागा होतो.

चेन्नईच्या पराभवाने निराश झालेली मंडळी परतू लागतात. मुंबईकर चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं असतं.

Image copyright Getty Images

रात्रीचे बारा वाजत आले... सोमवारचं ऑफिस अनेकांना खुणावू लागलं होतं. मैदानाबाहेरची टोप्या-पिपाणीवाली मंडळी दिवसाचा गल्ला मोजून गाशा गुंडाळू लागतात.

एरवी मध्यरात्रीपर्यंत शांत होणाऱ्या रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम घडवण्याची ताकद IPLमध्ये आहे. पोलिसांची अहर्निशं सेवा सुरूच आहे. राजीव गांधी स्टेडियमचे झगमगते लाईट टॉवर अजूनही तळपत आहेत.

यंदाचं IPLचं बारावं वर्ष. एक तपाचं वर्तुळ पूर्ण झालंय. यादरम्यान अनेक वाद झाले, मैदानातली गोष्ट कोर्टकचेरीत गेली. पण या सर्वांत IPLचा ज्वर कायम आहे. एका लोकप्रिय खेळाद्वारे देशातल्या प्रमुख शहरांना एकमेकांशी भिडवण्याची कल्पना किती पैसा आणि करमणूक उभी शकते, याची कुणी शतकाच्या सुरुवातीला कल्पनाही केली नसेल.

रविवारच्या सामन्यात एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी आता ठीक दहा दिवसांनी एकाच फ्लाईटमध्ये बसून टीम इंडियाच्या विश्वविजेते होण्याच्या सफरीला निघतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)