IPL 2019 - MI vs CSK: लसिथ मलिंगाने शेवटच्या ओव्हरमध्ये असा फिरवला सामना

लसिथ मलिंगा Image copyright Twitter / MIPaltan

क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ असंही म्हणतात. कधीही आश्चर्याचे धक्के बसू शकतात, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ शकतात आणि नशिबाने साथ दिली तर शेवटच्या क्षणी अख्खा सामना फिरू शकतो.

असाच एक सामना रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात झाला, जेव्हा अगदी सेंकदासेंकदाला सामना कधी चेन्नई सुपरकिंग्सच्या तर कधी मुंबईच्या बाजूने झुकत होता.

चेन्नईला जिंकण्यासाठी 150 रनांची आवश्यकता होती. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये टीमची स्थितीही भक्कम होती. त्यांना 12 बॉलमध्ये 18 रन हवे होते आणि 6 विकेट हातात होत्या.

शेन वॉटसन आधीच्या क्वॉलिफायर मॅचसारखाच फॉर्मात होता आणि असं वाटतं होतं की या हंगामातल्या मुंबईविरुद्धच्या 3 पराभवांचा बदला चेन्नई सुपरकिंग्स घेणार.

19व्या ओव्हरमध्ये मुंबईचा विकेटकीपर क्विंटन डीकॉकने हातात आलेला सोपा डॉट बॉल सोडून दिला आणि तो बॉल गेला थेट बाऊंड्री लाईनच्या पलीकडे. यामुळे चेन्नई सुपरकिंग्सला अजून ताकद मिळाली.

आता त्यांना 6 बॉलमध्ये 9 रन बनवायचे होते आणि शेन वॉटसन अजूनही क्रीझवर होता.

शेवटची ओव्हर मलिंगाला

यानंतर जे सहा बॉल टाकले गेले त्यांची कल्पनाच केली जाऊ शकते. 20व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर चेन्नईला जिंकायला 2 रन हवे होते.

तेव्हा लसिथ मलिंगाने थेट स्टंपवर बॉल टाकला आणि चेन्नईच्या शार्दूल ठाकूरला तो खेळणं जमलं नाही. परिणामी LBW आऊट झाला.

IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या लसिथ मलिंगाने या स्पर्धेत आतापर्यंत 100 पेक्षा जास्त मॅचेस खेळल्या आहेत. अर्थात तुमच्यात कितीही टॅलेंट असलं तरी शेवटच्या ओव्हरचा दबाव कोणत्याही बॉलरवर असतोच.

या मॅचमध्ये मलिंगाचा काळ आतापर्यंत फारसा चांगला नव्हता. शेन वॉटसन आणि ब्राव्होने मलिंगाला जाम धुतलं. शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये मलिंगाने 42 रन दिले.

अनेक फॅन्सना वाटत होतं की शेवटचा ओव्हर मलिंगाऐवजी दुसऱ्या कुणाला तरी दिला जाईल. काहींना तर खात्री होती की पंड्या बंधूपैकी एकाला शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग दिली जाईल.

पण कॅप्टन रोहित शर्माने बॉल पुन्हा मलिंगाच्याच हाती सोपवला आणि पुढे जे घडलं ते सगळ्यांनाच माहीत आहे.

Image copyright Getty Images

या हंगामाच्या 12 मॅचेसच्या शेवटच्या ओव्हर्समध्ये मलिंगाने 16 विकेट घेतल्या आहेत. खरंतर यावेळेची मलिंगाची कामगिरी, घेतलेल्या विकेट, सरासरी आणि इकॉनॉमी रेट 2017 पेक्षा जरासा चांगला आहे.

मलिंगाने फायनल मॅचमध्ये एकूण 4 ओव्हर टाकल्या आणि 49 रन देऊ फक्त एक विकेट घेतली. जर त्याने शेवटच्या बॉलवर विकेट घेतली नसती तर मलिंगाला सोशल मीडियावर जाम ट्रोलिंग झालं असतं. फॅन्सकडून जोरदार टीका झाली असती. पण नशिबाने साथ दिली आणि मलिंगा झिरो ठरता ठरता हिरो झाला!

ऐन मोक्याच्या क्षणी चमकदार कामगिरी करायची ही मलिंगाची पहिलीच वेळ नाहीये. याआधीही श्रीलंकेची राष्ट्रीय टीम तसंच मागच्या IPL स्पर्धांमध्ये खेळताना चांगली कामगिरी केली आहे.

याआधीही मुंबई इंडियन्सने शेवटच्या ओव्हरमध्ये कमाल दाखवली आहे. 2017 मध्ये पुणे सुपरजायंटसच्या विरोधात मिचेल जॉन्सनने मुंबईच्या बाजूने मॅच फिरवली होती.

क्रिकेटच्या जगतातले शेवटच्या ओव्हर्समधले कमाल-धमाल

1997 साली कराचीत खेळल्या गेलेल्या एका उत्कंठापूर्ण मॅचमध्ये सकलेन मुश्ताकच्या बॉलिंगवर भारताच्या राजेश चौहानने सिक्स मारला होता. सकलेन आजही त्या मॅचसाठी ओळखले जातात.

असंच काहीसं घडलं होतं भारतीय बॉलर चेतन शर्माच्या बाबतीत. पाकिस्तानी बॅट्समन जावेद मियांदादने चेतन शर्माच्या शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर सिक्स मारला होती आणि हातातोंडाशी आलेला भारताचा विजय हिसकावून नेला होता.

याव्यतिरिक्त 2011चा वर्ल्डकप आणि 2007च्या T-20 वर्ल्डकपचा हिरो समजल्या जाणाऱ्या युवराज सिंहला 2014 साली श्रीलंकेविरुद्ध झालेल्या T-20 वर्ल्डकप फायनलच्या पराभवासाठी जबाबदार मानलं जातं.

युवराजने बड्या मुश्किलीने 21 बॉलमध्ये 11 रन काढले होते. ते पीच इतकं अवघड होतं की भल्याभल्यांना त्यावर रन काढता येत नव्हते. पण ही गोष्ट चाहते विसरले.

1999 साली वर्ल्डकप जिंकण्याचे दक्षिण आफ्रिकेचे चान्सेस जास्त होते. दक्षिण आफ्रिकेचा लान्स क्लुजनर त्या स्पर्धेचा हिरो ठरला खरा, पण अॅलन डॉनल्ड ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगचा सामना करू शकला नाहीत आणि रनआऊट झाला.

त्यामुळे दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ही मॅच टाय झाली आणि दक्षिण आफ्रिकेची टीम फायनलमध्ये पोहोचू शकली नाही.

2015च्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड असा सामना होता. न्यूझीलंडच्या रॉस टेलरची विकेट पडल्यानंतर दक्षिण आफ्रिका आपला विजय निश्चित धरून चालली होती. पण ग्रॅंड एलियटने दमदार खेळी केली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या टीमला जिंकवून दिलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)