नरेंद्र मोदी यांनी देशात सगळ्यांत आधी डिजिटल कॅमेरा आणि ईमेल वापरला? - फॅक्ट चेक

नरेंद्र मोदी Image copyright Narendra Modi

कदाचित, देशात सर्वांत प्रथम आपणच डिजिटल कॅमेरा आणि इमेल वापरल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दावा केला. त्यांच्या या दाव्यानंतर ट्विटर आणि फेसबुकवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

1988मध्ये देशात डिजिटल कॅमेरा आणि ईमेल तंत्रज्ञान विकसित झालं होतं का? असा प्रश्न विचारला जात आहे. तर भाजपने मोदींवर होणाऱ्या टीकेचा निषेध केला असून आधी पंतप्रधानांची मुलाखत संपूर्ण पाहावी असं आवाहन केलं आहे.

"कदाचित देशात, माझ्या आधीही कुणीतरी असू शकतं, मला त्याच्याविषयी कल्पना नाही. पण कदाचित मी देशातला पहिला व्यक्ती असेल ज्यानं डिजिटल कॅमेऱ्याचा वापर केला असेल. 1987-88च्या दरम्यान. त्यावेळी खूप कमी लोकांकडं ईमेल होतं," असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

ते पुढं म्हणतात, "विरमगाम येथे लालकृष्ण आडवाणी यांची सभा होती. तेव्हा मी डिजिटल कॅमेरातून त्यांचा फोटो काढला होता. त्यावेळी डिजिटल कॅमेरा हा आकाराने मोठा असायचा. त्याने मी फोटो काढला आणि दिल्लीला ट्रान्समिट केला. दुसऱ्या दिवशी कलर फोटो छापला गेला. आडवाणींना त्यावेळी आश्चर्य वाटलं की माझा कलर फोटो लगेच त्याच दिवशी कसा छापण्यात आला?"

'न्यूज नेशन' या हिंदी न्यूज टीव्ही चॅनलला मोदी यांनी मुलाखत दिली होती.

देशात ईमेल वापरणाऱ्या पहिल्या काही व्यक्तींपैकी आपण होतो, असं मोदी यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं.

या वक्तव्यानंतर सोशल मिडियावर विशेषत: ट्विटरवर त्यांच्यावर खूप टीका होत आहे. अनेकजण त्यांच्यावर विनोदही करत आहेत.

पंतप्रधानांची संपूर्ण मुलाखत एकदा पाहावी

पंतप्रधान मोदींवर होणाऱ्या टीकेबाबत महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ म्हणतात, "टीकाकारांनी मोदी साहेबांची मुलाखत परत एकदा ऐकावी. त्यांनी transmission हा स्पष्ट शब्द वापरला आहे. ते ईमेल म्हणाले नाहीत. त्यामुळं त्यांच्या वक्तव्याचा मीडियानं विपर्यास करू नये."

"गेल्या पाच वर्षांत उदयाला आलेले मोदी हे भारतीय राजकारणाचे महत्त्वाचं केद्रस्थान बनले आहेत. त्यांच्यावर जेवढी टीका होईल तेवढा भाजपला फायदा होईल. कारण जनतेनं त्यांना स्विकारलं आहे. परत एकदा ते देशाचं नेतृत्व करणार आहेत," असंही त्यांनी म्हटलं आहे.

'सोशल मीडियावर काय चर्चा आहे?'

आमिर शाहुल म्हणतात, "सगळेजण एक मुद्दा विसरतायेत. मोदीजी यांनी 1988मध्ये डिजिटल कॅमेरा आणि ईमेल वापरला आहे."

कोपरखळी मारत आमिर पुढं म्हणतात "मला 1977 साली मोदी यांच्याकडून ईमेल आलेला. स्वातंत्र्य संग्रामात सामील होण्यासाठी त्यांनी मला आव्हान केलं होतं."

रुपा सुब्रमन्य लिहितात, "1988मध्ये विकसित देशात केवळ काही वैज्ञानिक आणि अभ्यासक हे ईमेल वापरायचे. भारतात तर ते 1995मध्ये सगळ्यांसाठी खुलं केलं पण मोदी यांनी तर ते 1988मध्येच वापरलं आहे. पण आपल्यला हे देखील माहीत आहे की मोदी हे काही सर्वसामान्य नाहीत."

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी म्हणाले की माझी जात गरिबी ही आहे. त्यांच्या या विधानातला आणि न्यूज नेशनच्या मुलाखतीदरम्यान केलेल्या दाव्यातील विरोधाभास काही जणांनी दाखवला आहे.

मोदींच्या दाव्यावर सदानंद घायल लिहितात, "काँग्रेसच्या सत्तेमुळे लोकांना खायला मिळत नव्हतं. गरीबी हटाव म्हणत गांधी घराणं निवडणुका जिंकत होतं. मोदीजींकडे मात्र 1988 सालीच डिजिटल कॅमेरा आला होता. ते ईमेलही वापरायचे. गरिबीतून वर येऊन त्यांनी मिळवलेलं हे यश खूप मोलाचं आहे. हे जपायला पाहिजे."

विवेक धोत्रे लिहितात, "अर्थातच गरीब मोदीसाहेब यांच्या म्हणण्यानुसार 1988मध्ये त्यांच्याजवळ डिजिटल कॅमेरा होता आणि भारतात इंटरनेट सर्व्हिस सुरू झाली होती. अमेरिकेत ही सेवा लोकांसाठी उपलब्ध नव्हती पण भारतात होती, तरी साहेब म्हणतात काँग्रेसनं 60 वर्षांत काय केलं, आता बोला कोण खोटं बोलतोय?"

"आपल्या देशात इंटरनेट 1995 साली आले, मात्र मोदी 1987 पासूनच इंटरनेटचा वापर करून मेल करत होते, तर भारतात डिजिटल कॅमेरा येण्याच्या 20 वर्षं आधी मोदींकडे डिजिटल कॅमेरा होता. (दुसरीकडं मी खूप गरीब होतो असंही मोदी सांगतात.)" असं दिपक भातुसे यांनी लिहिलं.

काँग्रेसनं नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत, "आता गेल्या 60 वर्षांत काय केलं हे परत विचारू नका." असं लिहिलं आहे. गेल्या 60 वर्षांत देशात प्रगती झाली नाही असं मोदी यांनी त्यांच्या भाषणात वारंवार म्हणाले आहे."

भारतीयांनी इमेलचा वापर नक्की कधी चालू केला?

15 ऑगस्ट 1995 साली विदेश संचार निगम लिमीटेड (VSNL) या सरकारी कंपनीनं सार्वजनिक इंटरनेट सुरू केलं आहे.

तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी हे आधुनिक तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी देशात टेलेकम्युनिकेशनच्या क्रांतीची सुरुवात केली होती, असं म्हटलं जातं.

डिजिटल कॅमेरा भारतात कधी आला?

"साधारण 1990मध्ये Nikon या जपानी कंपनीनं जगभरात पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा आणला. तो भारतीय बाजारात येण्यासाठी आणखी 5 वर्षं गेली. त्यावेळी परदेशातून डिजिटल कॅमेरा विकत आणण्याची भारतीयांमध्ये क्रेझ होती. डिजिटल कॅमेरा ही एक चैनीची गोष्ट मानली जायची," असं माहिती तंत्रज्ञान विषयाचे पत्रकार नीरज पंडित यांनी बीबीसीला सांगितलं.

"1970च्या दशकात अमेरिकेत ईमेलचा शोध लागला. भारतात सार्वजनिकरित्या इमेल येण्यासाठी 1995 साल उजडावं लागलं. VSNLनं ईमेल सिस्टिम सुरू केली होती. त्याआधी IIT मुंबईत 1988 साली प्रा. दिपक पाठक यांनी ईमेल सिस्टिम तयार करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना तांत्रिक हातभार न मिळाल्यानं तो प्रोजेक्ट थांबवण्यात आला होता," असंही पंडित यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)