बीड ऑनर किलिंग प्रकरण : परीक्षेला गेले आणि सुमीतसारखा माझ्यावरही हल्ला झाला तर?

ऑनर किलिंग,
प्रतिमा मथळा प्रियांका आणि सुमितचं ऑक्टोबर 2018 मध्ये लग्न झालं होतं.

दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केलं तर आईबाबा आपल्याला संपवतील, या भीतीपोटी पुण्यातील तळेगावच्या 19 वर्षीय एका मुलीने घरच्यांविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

तिचं प्रेम प्रकरण तिच्या घरी कळल्यानंतर तिच्या काकांनी तिला आणि तिच्या प्रियकराला जीवे मारण्याची धमकी दिली. तिचा प्रियकर लग्नाच्या कायदेशीर वयात येईपर्यंत तिला आणखी दोन वर्षं थांबावं लागणार आहे, म्हणून तिने तोपर्यंत संरक्षणाची मागणी कोर्टाकडे केली आहे.

या मागणीबदद्ल तिचं काही स्तरातून कौतुक झालं तर तितकीच टीकाही झाली. 'कुणी आपल्या पालकांना कोर्टात कसं खेचू शकतं, तेही एका परक्या पोराच्या प्रेमात?' असाही तिला ऐकावं लागत आहे.

पण महाराष्ट्रात ऑनर किलिंगच्या घटना आजही घडताना दिसतात, म्हणून तिची ही मागणी रास्त असू शकते.

यापूर्वीही आंतरजातीय विवाह, प्रेमविवाह आणि त्यांनंतर होणारं प्रतिष्ठेचं कथित नुकसान, यावरून अनेक जीव गेले आहेत. कधी दोघेही संपतात, तर कधी एकाचा जीव वाचतो. मग त्या व्यक्तीशी जोडल्या गेलेल्या माणसांच्या आयुष्याचं पुढे काय? ते कसे जगत आहेत, हा प्रश्न उरतोच.

पण, जिवंत राहीन की नाही याची भीती वाटते

20 डिसेंबर 2018 चा तो दिवस...सुमीत आणि माझी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा सुरू होती. सुमीत आणि माझं चार वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होतं.

माझ्या घरच्यांचा विरोध होता म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच मंदिरात लग्न केलं होतं.इंजिनिअर झाल्यावर चांगली नोकरी करायची, स्वत:च्या पायावर उभं राहायचं आणि संसार थाटायचा... आमची खूप छोटी स्वप्नं होती.

त्या दिवशी पेपर सुटल्यावर घरी येताना कॉलेजच्या गेटवरच सख्ख्या भावाने सुमीतवर चाकूने वार केले. सुमीतला दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं!सगळी स्वप्नं एका क्षणात संपली!

हे सांगताना २२ वर्षांच्या भाग्यश्री वाघमारेला हुंदका आवरता आला नाही.

बीडमध्ये झालेल्या ऑनर किलिंगच्या या घटनेला पाच महिने झाले. पण तो दिवस आजही सतत भाग्यश्री वाघमारेच्या डोळ्यासमोर येतो.

भाग्यश्री या घटनेनंतर सावरण्याचा प्रयत्न करतेय. सध्या ती तिच्या सासू-सासर्‍यांबरोबर राहते. तिचं इंजिनिअर व्हायचं स्वप्न आजही कायम आहे, पण भीतीसुद्धा.

"16 तारखेला परीक्षा सुरू होतेय. पण मी परीक्षेला गेले आणि सुमीतसारखा माझ्यावरही हल्ला झाला तर?"

तारखेच्या पहिल्याच दिवशी तिच्या आरोपी आत्येभावाला जामीन मिळाला. ती सांगते, "भावांच्या विरोधात साक्ष देऊ नकोस, असं समजवायला आईवडिलांनी आजी-आजोबांना माझ्याकडे पाठवलं. ते मला स्वत:बरोबर घेऊन जाणार होते. भावांविरोधात साक्ष देऊ नकोस म्हणून दबाव टाकत होते.

"पण मी नाही गेले. पोलीस संरक्षण असलं तरी 'त्याला मारलं, आता तुलाही मारू' अशा धमक्या मला अनेकदा दिल्या आहेत.

"सासू-सासरे मला चांगलं सांभाळतात. मला परीक्षा द्यायचीये. चांगल्या ठिकाणी नोकरी करायची आहे. पण घराबाहेर पडताना जिवंत राहीन की नाही, याची भीती वाटते," ती सांगते.

"गजानन क्षीरसागर आणि कृष्णा क्षीरसागर या दोन आरोपींवर सुमीत वाघमारे यांच्या खुनाच्या कटात सहभागी असल्याचे आरोप होते. पण पोलिसांच्या चार्जशीटवरून असं दिसत नसल्याचा युक्तिवाद कोर्टात केला आणि कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला," असल्याचं सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितलं.

मुख्य आरोपी अजून पोलिसांच्या ताब्यात आहे आणि खटला सुरू असल्याने अधिक भाष्य करता येणार नसल्याचं ते म्हणाले.

प्रतिमा मथळा सुमितची हत्या करण्यात आली.

'घटनेत स्त्रियांना स्वातंत्र्य'

भाग्यश्रीची सासू सुनीता वाघमारे याच भीतीने खचून गेल्या आहेत. सुमीतचा लहान भाऊ शिक्षण घेतोय.

"माझा आता एकच मुलगा राहिलाय, त्याला काही केलं तर मी जगूच नाही शकत," असं त्या म्हणतात.

"त्यात भाग्यश्रीची परीक्षा आहे. तिला कसं बाहेर पाठवायचं? पुन्हा तेच घडलं तर...?" हा प्रश्न त्या वारंवार विचारतात.

भाग्यश्रीचे सासरे शिवाजी वाघमारे शेतकरी आहेत. पाच महिन्यांपूर्वी त्यांच्या डोळ्यादेखत त्यांचा मुलगा गेला, पण ते खंबीरपणे परिस्थितीशी दोन हात करत आहेत.

"माझ्या मुलाला या मुलीच्या घरच्यांनी मारलंय. पण यात या पोरीचा काय दोष? माझ्या मुलामुळे ही आमच्या घरात आली. आम्ही तिला मुलीप्रमाणे सांभाळणार, तिला स्वतःच्या पायावर उभं करणार," असं ते सांगतात.

"जे आईवडील प्रेमविवाहाला विरोध करून असा कुणाला मारण्याचा विचार करतात, त्यांना सांगायचय की बाबासाहेबांनी घटनेत 18 वर्षांवरील स्त्रियांना स्वातंत्र्य दिलंय. त्यांच्या मतांचा आदर करायला पाहीजे."

'गावातल्या पुढाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा'

गावागावात ऑनर किलिंगच्या घटना वाढतायेत. सरकारने जरी आंतरजातीय विवाहासाठी पुढाकार घेतला असला तरी ग्रामीण भागात प्रबोधनाची खूप गरज असल्याचं 'राईट टू लव्ह' संस्थेचे समन्वयक अभिजीत कांबळे सांगतात.

"ही प्रकरणं घडल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये आल्यावर त्यांचा गाजावाजा होतो. पण नंतर 'त्या' मुलीकडे, मुलाकडे किंवा त्यांच्या घरच्यांकडे कुणीही लक्ष देत नाही. त्यांना यंत्रणांकडून प्रतिसाद मिळत नाही.

यासाठी गावपातळीवर पुढाऱ्यांचा सहभाग गरजेचा तर आहेच, पण ग्रामीण भागातील लोकांची मानसिकता बदलण्यासाठी काहीतरी करण्याची आवश्यकता असल्याचं कांबळे सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)