शरद पवारः नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर 15 दिवसांत सरकार कोसळेल #5मोठ्याबातम्या

शरद पवार आणि मोदी Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. '...तर 15 दिवसांत सरकार कोसळेल'

"लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं तरी त्या सरकारची गत 1996 सालच्या वाजपेयी सरकारसारखीच होईल. 13 ते 15 दिवसांत हे सरकार कोसळेल," असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी 23 मे नंतरच्या राजकीय शक्यतांवर भाष्य केलं.

"यावेळी सत्तेवर येणारं सरकार त्रिशंकू नसेल. UPA म्हणा किंवा अन्य काही, पण समविचारी पक्ष एकत्र येऊन स्थिर सरकार देतील. भाजपच्या हातात सत्ता जाणार नाही," असंही पवार यांनी म्हटलं.

महाराष्ट्रातही सत्ताबदल होणार असल्याचं भाकित पवारांनी वर्तवलं. सध्या महाराष्ट्रभर दुष्काळ दौरा करत असलेल्या पवारांनी सरकारविरोधात संतप्त जनमत असल्याचंही सांगितलं.

2. मृत्यू पत्करेन पण मोदींच्या आईवडिलांवर टीका करणार नाही - राहुल गांधी

Image copyright Getty Images

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते सतत नेहरू-गांधी कुटुंबावर टीका करत असतात. मात्र या टीकेला प्रत्युत्तर देताना आपण कधीही नरेंद्र मोदींच्या आईवडिलांचा अपमान करणार नाही," असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी PTIशी बोलताना म्हटलं आहे.

लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

"नरेंद्र मोदी फार द्वेषाने बोलतात. त्यांनी माझे वडील, आजी आणि आजोबांचा अपमान केला. पण मी कधीही त्यांच्या कुटुंबावर, आईवडिलांवर टिप्पणी करणार नाही. मृत्यू पत्करेन, पण त्यांच्या आईवडिलांचा अपमान करणार नाही," असं वक्तव्यं राहुल गांधींनी केलं आहे.

राहुल गांधींनी म्हणाले, "मी संघाचा किंवा भाजपचा माणूस नाही, पण काँग्रेसचा आहे. त्यांच्या द्वेषाला मी प्रेमाने उत्तर देईन. गळाभेट घेत, प्रेमाने आम्ही नरेंद्र मोदींचा पराभव करू."

3. मी पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला नको होताः सैफ अली खान

अभिनेता सैफ अली खानला 2010 साली पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. आता स्वतः सैफ अली खान यानंही पद्मश्री पुरस्काराच्या घोषणेनंतर 'मी स्वतःच आश्चर्यचकित झालो होतो,' असा खुलासा केला आहे.

"इंडस्ट्रीत या सन्मानास पात्र असे अनेक लोक आहेत. त्यामुळे हा पुरस्कार मी स्वीकारायला नको होता," असंही सैफनं म्हटलं आहे.

अभिनेता अरबाज खानच्या एका टॉक शोमध्ये सैफ अली खाननं पद्मश्री पुरस्कारासंबंधीच्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.

"हा पुरस्कार नाकारण्याचा विचार आल्यानंतर वडिलांनी माझी समजूत काढली. 'तू पुरस्कार नाकारण्याच्या परिस्थितीत नाहीस,' असं त्यांनी मला समजावलं. त्यानंतर मी हा सन्मान स्वीकारला आणि भविष्यात त्या पुरस्कारास साजेशी कामगिरी करून दाखवण्याचं ठरवलं," असं सैफनं म्हटलं.

4. ममता बॅनर्जींचं मीम शेअर करणाऱ्याची सुटका

पश्चिम बंगालमधील भाजपच्या कार्यकर्त्या प्रियंका शर्मा यांची जामिनावर तात्काळ सुटका करण्यात यावी, असा आदेश सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिला. ममता बॅनर्जींचं एक मीम फेसबुकवर टाकल्याप्रकरणी प्रियंका शर्मा यांना 10 मे रोजी अटक करण्यात आली होती. द इंडियन एक्सप्रेसनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

Image copyright Getty Images

11 मे रोजी हावडा न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते विभास हाजरा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियंका यांच्याविरोधात कारवाई केली होती.

सर्वोच्च न्यायालयानं मात्र प्रियंका शर्मा यांची जामिनावर सुटका करण्याचा निर्णय दिला असला तरी फेसबुकवर अशाप्रकारचे फोटो टाकल्याबद्दल त्यांनी लेखी माफी मागावी, असंही म्हटलं होतं. नंतर सुप्रीम कोर्टाने ही अट काढून घेतली आणि कुठल्याही अटीविना त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर या खटल्याची सुनावणी झाली.

5. जेट एअरवेजच्या CEO आणि CFOचा राजीनामा

आधीच अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजला अजून एक धक्का बसला आहे. जेट एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी पदत्याग केला. हिंदुस्तान टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.

Image copyright Getty Images

जेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी मंगळवारी राजीनामा दिला. त्यांच्या आधी कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी अमित अग्रवाल यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यासोबतच कंपनीचे सचिव कुलदीप शर्मांनीही जेट एअरवेज सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातली दुसऱ्या क्रमांकाची प्रवासी विमानसेवा असलेली ही कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. सुमारे 7,000 कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्याखाली ही कंपनी दबलेली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)