नरेंद्र मोदींची पश्चिम बंगालमध्ये खरंच हवा आहे की...

पश्चिम बंगाल Image copyright Getty Images

ममता बॅनर्जी- चौकीदार

गर्दी- चोर है

जनतेच्या वतीने चांगली प्रतिक्रिया मिळाल्यावर त्या व्यासपीठाच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूला जातात आणि सांगतात, "मी दोन मिनिटं शांत रहाते. आता जोरात बोला, चौकीदार.."

पुढचा आवाज 'चोर है' पुढच्या दोन मिनिटांपर्यंत घुमत राहातो.

पश्चिम बंगालमध्ये शेवट्च्या टप्प्याच्या निवडणुकीचा माहोल अतिशय गरमागरमीचा आहे. इथं तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्षांच्या सभा होत आहे.

मात्र तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सर्वांधिक सभा घेत आहेत आणि रोडशो करत आहेत.

तज्ज्ञांच्या मते ज्या पद्धतीने त्या नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहे त्यावरून निश्चितच त्यांनी नरेंद्र मोदींची धास्ती घेतली आहे.

प्रत्येक रॅलीत ममता बॅनर्जी 'चौकीदार चोर है'च्या घोषणा देत आहेत.

त्या कोणत्याही सभेत सरासरी एक तास भाषण देतात त्यात अर्धाधिक वेळ नरेंद्र मोदींवर टीका करतात.

हा निवडणुकीचा अंतिम टप्पा आहे. शेवटच्या टप्प्यात जागा जिंकण्यासाठी ममता बॅनर्जी संपूर्ण ताकद पणाला लावत आहेत.

Image copyright Getty Images

त्या रोज तीन ते चार सभा आणि रोड शो करतात. त्या प्रत्येक भाषणात रफाल, नोटाबंदी, बेरोजगारी आणि जीसएटीचा मुद्दा उपस्थित करतात.

त्या नरेंद्र मोदी आणि भाजपवर समाजात फूट पाडण्याचा आरोप करतात. त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

सभेत आलेले लोक त्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर होकार देतात आणि नेत्यांच्या सूरात सूर मिसळतात.

कोलकात्यापासून 100 किलोमीटर दूर असलेल्या आदमपूर गावाची लोकसंख्या 200च्या आसपास आहे. हा बसिरहाट मतदारसंघाचा एक भाग आहे. तिथे अभिनेता नुसरत तृणमूलतर्फे मैदानात आहे.

इथे कोणी उमेदवार मतं मागायला येतो का, असं विचारल्यावर तिथल्या गावकऱ्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. असं असलं तरी लोकांनी तृणमूलला मत देण्याचा निर्णय घेतला आहे.

'आम्ही टोपी घालून थाटात फिरू शकतो'

सत्तावीस वर्षांचा एक युवक म्हणाला, "ममता दीदींनी शाळेत जाणाऱ्या मुलींना सायकल दिली आहे. आम्हाला तांदूळ मिळतो. आमच्या गावापर्यंत येणारा रस्ता पूर्ण झाला आहे. आमचं आयुष्य सुखकर आहे. सीपीएमच्या काळात आम्ही दु:खात होतो."

आदमपूर जवळ असलेल्या एका गावाच्या बाहेर असलेल्या एका मुख्य रस्त्यावर काही मुस्लीम लोक बसले होते. ते सर्वजण एकमुखाने ममता बॅनर्जींच्या बाजूने बोलत होते.

मी विचारलं तर लोक सांगतात की, ममता पश्चिम बंगालच्या 30 टक्के मतदारांचा व्होट बँक म्हणून वापर करत आहेत. तिथे मोहम्मद बशीर मुल्ला नावाचे गृहस्थ बसले होते. ते सांगतात की ते एकेकाळी कम्युनिस्ट पक्षाचे समर्थक होते. मात्र ममता बॅनर्जींच्या सरकारने त्यांना सुरक्षा आणि सन्मान दिला आहे.

Image copyright Getty Images

मुल्ला सांगतात, "आम्ही ही टोपी आणि दाढी ठेवूनही अगदी सन्मानाने फिरू शकतो. मोदींच्या राज्यात कुणीही असं करू शकत नाही."

पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागात गेलात तर तुमचं स्वागत हमखास तृणमूलचे झेंडे आणि ममता बॅनर्जींच्या पोस्टरने होतं.

उत्तर आणि पश्चिम भारतात जागोजागी पंतप्रधानांचा हसरा चेहरा दिसतो.

पश्चिम बंगालच्या शहरी आणि ग्रामीण भागात मात्र हे पोस्टर दिसत नाहीत. तिथे फक्त तृणमूलचे झेंडे आणि पोस्टर दिसतात.

इथे नरेंद्र मोदींचं नाव घेणारे लोक अगदी कमी प्रमाणात आढळतात. इथे ममतादीदी जास्त लोकप्रिय आहेत.

उत्तर भारतात नरेंद्र मोदींना स्वीकार्हाता आहे, मात्र पश्चिम बंगालमध्ये दीदींसमोर कुणीच नाही.

सोमवारी डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघात त्यांच्या भाषणासाठी शेकडो लोक जमले होते. भयंकर उकाडा आणि रमजान असूनसुद्धा लोक त्यांच्या नेत्याला भेटायला आले होते.

गर्दीत उपस्थित असणाऱ्या समी मुल्ला यांनी सांगितलं, "मी मरेपर्यंत दीदींची साथ सोडणार नाही."

तिथे जवळ असलेल्या वहीदा गर्वाने सांगते, "इथे फक्त दीदींची लाट आहे." अनिक बोस सांगतात, "दीदी बंगालची वाघिण आहे."

या मतदारसंघातून तृणमूलचे उमेदवार अभिषेक बॅनर्जी मैदानात उपस्थित होते. ते ममता बॅनर्जीचे भाचे आहेत आणि लोकांचं ऐकलं तर ते त्यांचे वारसदार आहे. अभिषेक गेल्यावेळी सुद्धा इथून निवडणूक जिंकले होते.

ममता बॅनर्जी यांनी 2011च्या विधानसभा निवडणुकीत 34 वर्षं राज्य करणाऱ्या डाव्या पक्षाच्या सत्तेला उखडून टाकलं होतं. वारंवार निवडणूक लढवल्यामुळे त्यांचा पक्षांची मुळं मजबूत आणि पसरली आहेत.

भाजपही कमजोर नाही

काही राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपाची परिस्थिती मजबूत आहे. तिथे नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहांनी अनेक सभा घेतल्या. झारखंडला लागून असलेल्या भागात पक्षाने आपली जागा निर्माण केली आहे.

मागच्या निवडणुकीत भाजपला 42 पैकी फक्त दोनच जागा मिळाल्या. यावेळी पक्षाला अनेक जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

रविंद्र भारती विद्यापीठाचे प्राध्यापक सव्यासाची बासू यांची निवडणुकांवर बारीक नजर आहे. त्यांच्या मते भाजपला 10 जागा मिळू शकतात.

ते पुढे म्हणतात, या निवडणुकीत भाजप दुसरा सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ शकतो. त्यांच्या मतांची टक्केवारीही वाढू शकते.

Image copyright Getty Images

तृणमूलचे कार्यकर्ते दबक्या स्वरात मान्य करतात की यावेळी भाजपला जास्त जागा मिळू शकतात. पक्षाच्या दोन नेत्यांनी कबूल केलं की भाजपची ताकद गेल्यावेळेपेक्षा वाढली आहे. मात्र ते लोक हेही दावा करतात की भाजपच्या बाजूने राष्ट्रीय प्रसारमाध्यात जास्त माहोल तयार केला गेला आहे.

ग्रामीण भागात टीएमसीची दहशत

ममताच्या निकटवर्तीय नेत्यांनी सांगितलं, "भाजपचे बहुतांश कार्यकर्ते मैदानात नाहीत. त्यांच्याकडे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची फौज नाही. ग्रामीण भागात ज्या पक्षाची शाखा नाही ते जिंकणार तरी कसे?

ममता बॅनर्जी यांच्याविरोधात टीका करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सीपीएमच्या अनेक नेत्यांनी आम्हाला सांगितलं की ग्रामीण भागात टीएमसीची दहशत वाढली आहे. भाजपच्या एका कार्यकर्त्यांने तृणमूलच्या सत्तेला 'गुंडाराज' असं संबोधलं.

अशीच काहीशी तक्रार सामान्य लोकांनीही केली आहे. काही लोकांच्या मते जातीच्या आधारावर त्या जिंकल्या आहेत. मात्र त्यांच्या पक्षाच्या लोकांना गर्वाची बाधा झाली आहे. ते छोट्या छोट्या गोष्टीत हिंसाचार करतात.

मी सामान्य व्यक्तींची ही तक्रार तृणमूल कार्यकर्त्यांसमोर मांडली तेव्हा त्यांनी या आरोपाचा इन्कार केला. ते म्हणतात की, हिंसाचार भाजपचे लोक करतात आणि ते फक्त उत्तर देतात.

तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की ते 2021 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीत ते गुंतले आहेत. त्यांना अंदाज आहे की पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकांच्या निकालांचा विधानसभेवर परिणाम होईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)