ममता बॅनर्जी या सद्दाम हुसैनप्रमाणे वागत आहेतः विवेक ओबेरॉय #5मोठ्याबातम्या

ममता बॅनर्जी Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. ममता बॅनर्जी सद्दाम हुसैनप्रमाणे वागत आहेतः विवेक ओबेरॉय

ममता दीदी या सद्दाम हुसैनप्रमाणे वागत आहेत. त्यांची ही 'दीदीगिरी' यापुढे चालणार नाही, अशा शब्दांत अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.

कोलकात्यामध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो मध्ये झालेला हिंसाचार आणि त्यानंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेसनं परस्परांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर विवेक ओबेरॉय यांनी हे ट्वीट केलं आहे. 'लोकमत'नं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

ममता बॅनर्जींच्या राज्यात लोकशाही धोक्यात असल्याचंही विवेक ओबेरॉय यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. विवेक ओबेरॉय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारत आहेत.

दरम्यान, ममता बॅनर्जींनी भाजपवर टीका सुरूच ठेवली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी तुम्ही तुमच्या पत्नीची काळजी घेतली नाही. देशाची काळजी तुम्ही काय घेणार ? अशा शब्दात त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला. 'लोकसत्ता'नं हे वृत्त दिलं आहे.

बुधवारी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदींना एकही मत देऊ नका असे सांगत मोदींना हटवण्याचे आवाहन ममता बॅनर्जींनी केले.

2. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

दुष्काळग्रस्त भागामध्ये शेतकऱ्यांना चाऱ्यासाठीचं अनुदान वाढवून मिळावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. शरद पवारांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळाबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीला पवार यांच्यासह अजित पवार, राणा जगजित सिंह पाटील हे देखील उपस्थित होते. 'एबीपी माझा'नं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

Image copyright TWITTER

दुष्काळग्रस्त जनावरांना भागात ऊस सोडून इतर चाराही दिला जावा. तसंच चारा अनुदान 90 रुपयांवरून 110 रुपये केलं जावं, अशी मागणी शरद पवार यांनी केली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चारा अनुदान वाढवून शंभर रूपये करण्याची घोषणाही केली.

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये दुष्काळी भागात पाण्याचं आणि अन्नधान्याचं नियोजन, नागरिकांच्या हाताला काम, फळबागा, छावण्या या विषयांवरही चर्चा झाली.

3. मोदींच्या खोट्या दाव्यांमुळे डिक्शनरीमध्ये नवीन शब्द आला आहे : राहुल गांधी

बालाकोट हल्ल्याच्यावेळी पाकिस्तानी रडारला चकविण्यासाठी ढगाळ वातावरणाचा फायदा झाला हे वक्तव्य तसेच आपल्याकडे 1988 मध्ये डिजिटल कॅमेरा होता हा दावा यांमुळे गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

Image copyright Getty Images

विरोधकही त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. मोदींच्या याच दाव्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर टीका करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की डिक्शनरीत एक नवीन शब्दाची भर पडली आहे. तो म्हणजे Modilie. या एन्ट्रीचा स्नॅपशॉट सोबत जोडत आहे, असंही ते म्हणाले.

हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

राहुल गांधींनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये या शब्दाचा अर्थ सत्याचा विपर्यास करणारी, सातत्यानं आणि सवयीनं खोटं बोलणारी किंवा निरंतर खोटा बोलणारी व्यक्ती असा दिला आहे.

4. मान्सून यंदा पाच दिवस उशिरा, दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला पाहावी लागणार 11 जूनपर्यंत वाट

यंदा मान्सूनचं आगमन पाच दिवस उशिरा होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. केरळमध्ये मान्सून 6 जूनला दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 'द हिंदू'नं हे वृत्त दिलं आहे. एरवी केरळमध्ये मान्सून 1 जूनला येतो, यावेळेस मात्र मान्सूनला पाच दिवस उशीर होईल.

हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेनंही मान्सून नेहमीपेक्षा काहीसा उशिरा म्हणजे 4 जूनला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Image copyright Getty Images

अर्थात मान्सूनला थोडा उशीर होणार असला, तरी जून ते सप्टेंबरमधील पर्जन्यमान हे सामान्य राहील असं हवामान विभागाचं म्हणणं आहे.

केरळमध्ये मान्सूनचं आगमन लांबल्यामुळं दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या महाराष्ट्रालाही पावसाची प्रतीक्षा करावी लागेल. महाराष्ट्रात मान्सून 11 जूनच्या सुमारास हजेरी लावेल, असा अंदाज आहे. 'सकाळ'नं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

5. झोपडपट्टी ते न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल: मुंबईच्या सचिन पवारचा कौतुकास्पद प्रवास

मुंबईच्या कलिना येथील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या सचिन पवार या बालकलाकारानं न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपला ठसा उमटवला आहे.

11 वर्षांच्या सचिनला 19 व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं आहे. 'चिप्पा' या चित्रपटासाठी सचिनला हा पुरस्कार मिळाला आहे. 'लोकसत्ता' नं हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)