पश्चिम बंगाल: शाह यांच्या रोड शोमध्ये गोंधळ घालण्याचं आवाहन भाजपनेच केलं का?

अमित शाह Image copyright NurPhoto

पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शोदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या सहकाऱ्यांना मारहाण करण्यासाठी स्टीक्ससह तयार राहा असं एक भाजप समर्थक पक्ष सहकाऱ्यांना सांगत असल्याचा 53 सेकंदांचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

आखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे सोशल मीडिया समन्वयक दिप्तांशू चौधरी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करण्यात आलं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळ्याची विटंबना करण्याचं कारस्थान भाजपने आधीच रचलं होतं? अमित शाह यांच्या रोड शोदरम्यान लाठ्यांसह हजर राहा असा मेसेज भाजप बंगालच्या क्लोज्ड ग्रुपमध्ये का देण्यात आला? मला लक्ष्य करण्यात आलं असं म्हणून अमित शाह सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत होते का? द्वेष पसरवणाऱ्या शाह यांना कोण लक्ष्य करेल? असं या ट्वीटमध्ये दिप्तांशूंनी विचारलं आहे.

हा व्हीडिओ सोशल मीडियावर 60,000 पेक्षा जास्त वेळा बघितला आणि शेअर केला गेला आहे.

व्हीडिओत एक माणूस बोलताना दिसत आहे. त्या व्यक्तीने भगव्या रंगाचं 'नमो' लिहिलेलं शर्ट घातलेलं दिसत आहे. ती व्यक्ती सांगते, "फाटाफाटी (व्हॉट्सअप ग्रुप) सदस्यांना काय करायचं आहे ते नेमकं ठाऊक आहे. उद्या रोडशोदरम्यान काही अडचणी निर्माण होऊ शकतात. उद्याच्या रोडशोला उपस्थित न राहणाऱ्या सदस्यांना ग्रुपमधून काढून टाकण्यात येईल."

"फाटाफाटी ग्रुप सदस्यांनी उद्याच्या रोड शोला यावं आणि गोंधळ घालावा असं मी आवाहन करतो. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अमित शाह यांच्या रोड शोमध्ये तुम्हाला महत्त्वाची भूमिका बजावायची आहे. 8 फूट लांब स्टीक्स आपल्याकडे असतील आणि त्यांच्या साहाय्याने आपण तृणमूलच्या गुंडांचा आणि पोलिसांचा प्रतिकार करू," असं ती व्यक्ती सांगते.

भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शोदरम्यान हिंसाचार उफाळल्यानंतर हा व्हीडिओ सोशल मीडियावर फिरू लागला आहे.

निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना निर्धारित मुदतीच्या एक दिवस आधीच प्रचार थांबवण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकांच्या निमित्ताने उसळणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा उपाय म्हणून निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.

भाजपने निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात राज्यातली परिस्थिती हाताबाहेर गेली असून, इथे अराजक माजलं आहे असा युक्तिवाद भाजपने केला होता.

दरम्यान निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीवादी नाही असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. हा निर्णय म्हणजे बंगालमधील जनतेचा अपमान आहे असंही त्या म्हणाल्या होत्या.

Image copyright ANI
प्रतिमा मथळा बंगालमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान उफाळलेला हिंसाचार

हिंसाचाराला सुरुवात कोणी केली यावरून दोन्ही पक्षांमध्ये तुंबळ घमासान सुरू आहे. प्रतिस्पर्धी पक्षानेच हिंसाचाराला सुरुवात केली याचे पुरावे दोन्ही पक्ष देत आहेत.

भाजपने पूर्वनियोजित पद्धतीने हा हिंसाचार घडवून आणला असं ट्विटरवर गौरव पांधी यांनी म्हटलं आहे. पांधी यांनी आपल्या ट्विटरच्या बायोमध्ये आपण काँग्रेस समर्थक असल्याचं म्हटलं आहे.

आम्ही केलेल्या पडताळणीत हा व्हीडिओ खरा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

व्हीडिओत दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव राकेश कुमार सिंह असल्याची माहिती बीबीसीला मिळाली. त्यांच्याशी बीबीसीने संपर्क केला. हा व्हीडिओ खरा आहे पण तो अपूर्ण आहे त्यात काटछाट करण्यात आल्याचं सिंह सांगत आहेत.

"अमित शाह यांच्यावर तृणमूलच्या गुंडांकडून हल्ला केला जाईल याचा इशारा तृणमूलच्या नेत्यानेच दिला होता. आम्हाला तयार राहावं लागेल. संपूर्ण व्हीडिओ दोन मिनिटांचा आहे. मात्र त्याचा काही भागच सोशल मीडियावर पसरवण्यात आला", असं राकेश यांनी सांगितलं.

आठ फूट लांबीच्या स्टिक्सबद्दल मला असं म्हणायचं होतं की तृणमूलच्या सदस्यांपेक्षा जास्त दिसण्याकरता भाजपचे झेंडे आणायला हवेत. मात्र त्या व्हीडिओत सोयीनुसार बदल करण्यात आले आहेत.

बीबीसीने त्यांना संपूर्ण व्हीडिओ उपलब्ध करून देण्याची विनंती केली. मात्र वरिष्ठांनी ख रा अधिकृत व्हीडिओ शेअर न करण्याचं आवाहन केलं. या व्हीडिओसंदर्भात कायदेशीर लढाई लढणार असल्याने व्हीडिओ देऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं.

त्या व्हीडिओत छेडछाड करण्यात आली किंवा सोयीस्कर बदल करण्यात आले का याची आम्ही स्वतंत्रपणे शहानिशा करू शकत नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)