साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना मी मनापासून माफ करू शकणार नाही – नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी Image copyright ANI

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना मी मनापासून माफ करू शकणार नाही, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्यावर न्यूज24 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं आहे.

"साध्वी प्रज्ञा यांच हे वक्तव्य दुर्दैवी आहे, ते भयंकर खराब आहे, त्याची निंदेच्या लायकीचं आहे. सभ्य समाजात अशा वक्तव्यांना कुठेही जागा नाही, साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागितली आहे, पण मी त्यांना मनापासून माफ करू शकणार नाही. यापुढे असं वक्तव्य देणाऱ्याला आधी 100 वेळा विचार करावा लागेल," असं मोदींनी म्हटलं आहे.

दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागितली आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर गुरुवारी म्हणाल्या होत्या, "नथुराम गोडसे देशभक्त होते,आहेत आणि देशभक्त राहतील."

तसंच त्या पुढे म्हणाल्या, "जे लोक त्यांना दहशतवादी म्हणतात, त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. अशा लोकांना निवडणुकीत चोख उत्तर देऊ."

पण भाजपनं त्यांच्या या विधानाशी सहमत नसल्याचं म्हणत त्यांना माफी मागावी लागेल असं म्हटलं होतं.

"हे माझं खासगी वक्तव्य आहे. मी रोडशोमध्ये होते त्यावेळी जाता जाता मी हे उत्तर दिलं. माझ्या भावना तशा नव्हत्या. यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते. मीडियानं माझं वक्तव्य तोडूनमोडून दाखवलं. गांधीजींनी देशासाठी जे केलं आहे ते विसरता येणार नाही, मी त्यांचा सन्मान करते. मी पक्षाच्या शिस्तीचं पालन करते. जी पक्षाची भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे," असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)