राहुल गांधी विसरले आपल्याच मुख्यमंत्र्यांची नावं? - फॅक्ट चेक

राहुल गांधी Image copyright Getty Images

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावांवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा गोंधळ उडाल्याचा एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडियोसोबत जो मजकूर आहे तो असा, "अरे.... हे काय राहुलजी. भाषणातच का होईना पण शेतकऱ्यांची कर्ज वेळेत माफ न केल्यामुळे तुम्ही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीच बदलले. तुमच्यासारखी महान व्यक्तीच असं महत् कार्य इतक्या झटकन करू शकते."

या तेरा सेकंदाच्या व्हिडियोत राहुल गांधी भूपेश बघेल यांचा मध्य प्रदेशचे तर हुकूम सिंह कारडा यांचा छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करताना दिसतात.

या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे.

हा व्हायरल व्हिडियो 50,000 हजारहून जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि शेअर करण्यात आला आहे.

Image copyright FACEBOOK

बीबीसी फॅक्ट चेक टीमने पडताळणी केली तेव्हा असं लक्षात आलं की हा व्हिडियो अपूर्ण आणि दिशाभूल करणारा आहे.

वास्तव

हा व्हिडियो राहुल गांधी यांनी 14 मे रोजी मध्य प्रदेशातल्या निमचमध्ये घेतलेल्या सभेतला आहे.

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत युट्यूब पेजवर हा संपूर्ण व्हिडियो आहे आणि त्यात राहुल गांधी व्यासपीठावर उपस्थित दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व काँग्रेस नेत्यांची नावं घेत आहेत. यात राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कमल नाथ आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून भूपेश बघेल यांची नावं घेतल्याचं स्पष्ट दिसतंय.

Image copyright FACEBOOK

या व्हिडियोमध्ये 0.08 सेकंदाला राहुल गांधी म्हणतात, "कमल नाथजी-मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री! भूपेश बघेलजी-छत्तीसगडचे मुख्यमंत्री! हुकूम सिंह कारडाजी, पी. सी शर्माजी, हरदीप सिंह डांगजी, प्रकाश रारातीयाजी, उदयलाल अंजानाजी, मिनाक्षी नटराजनजी, इतर सर्व ज्येष्ठे नेतेमंडळी, माध्यम मित्र आणि बंधू आणि भगिनींनो-तुम्हा सर्वांचं स्वागत."

काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडियो शेअर केला. मात्र, त्याची सुरुवात 'मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री' या शब्दापासून केल्याने तो व्हायर झाला. प्रत्यक्षात मात्र, त्यांनी आपल्या वाक्याची सुरुवात कमल नाथजी-मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री! भूपेश बघेलजी-छत्तीसगडचे मुख्यमंत्री!", अशी केली आहे.

मात्र, काँग्रेसनेच आपल्या ट्विटर अकाउंटवर जो व्हिडियो टाकला त्यात कमल नाथजी हा शब्द गाळला आहे. त्यामुळे पुढचा सगळा गोंधळ झाला.

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठे नेते शिवराज सिंह चौहान यांनीदेखील स्वतःच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडियो शेअर केला आहे.

Image copyright FACEBOOK

मात्र, त्यांनी नंतर दुरुस्ती करत नव्याने पोस्ट टाकली. त्यात ते लिहितात, "कुणीतरी मला सांगितलं की हा व्हिडियो एडिट केलेला आहे. राहुल गांधींबाबत अडचण ही आहे की ते इतकं खोटं बोलतात की ते केव्हा काय बोलतात हेच कळत नाही."

Image copyright TWITTER@CHOUHANSHUVRAJ

दाव्याची पडताळणी: मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची नावं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विसरल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बीबीसी फॅक्ट चेक टीमच्या पडताळणीत हा व्हिडियो अपूर्ण आणि दिशाभूल करणारा असल्याचं सिद्ध झालं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)