नरेंद्र मोदींनी पत्रकार परिषदेत एकही प्रश्न घेतला नाही

नरेंद्र मोदी Image copyright ANI

भाजप मुख्यालयात सरकारला 5 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी अमित शहा यांनी सर्व प्रश्नांना उत्तरं दिली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही प्रश्न घेतला नाही.

आज तकच्या पत्रकार अंजना ओम कश्यप यांनी जेव्हा पंतप्रधानांना सध्वी प्रज्ञासिंह यांच्याबाबत प्रश्न केला तेव्हा त्यांनी अमित शहा याचं उत्तर देतील असं सांगत, "मी तर डिसिप्लीन सोल्जर आहे, अध्यक्ष आमच्यासाठी सर्वकाही आहेत," म्हटलं.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली आहे.

"पत्रकार परिषद घेतल्याबाबत मोदींचे अभिनंदन, पुढच्या वेळी अमित शहा तुम्हाला एखाददोन प्रश्नांची उत्तर देण्याची संधी देतील. छान," असं राहुल यांनी ट्वीट केलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेले ठळक मुद्दे

 • निवडणुकीच्या काळात सर्व सण, रामनवमी, इस्टर, रमजान, मुलांच्या परीक्षा, आयपीएल होत आहे, ही देशाची ताकद आहे.
 • सकारात्मक भावनेने निवडणुका झाल्या.
 • पूर्ण बहुमताने आलेलं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा निवडून येत असल्याची शक्यता बऱ्याच कालावधीनंतर आली आहे.
 • देशात जनता निर्णय घेऊन सरकार तयार होण्याची ही 2014 साली संधी मिळाली, त्यानंतर आता पुन्हा येत आहे.
 • निवडणुकीसाठी बाहेर पडलो तेव्हा लोकांना मी धन्यवाद देण्यासाठी आलो आहे असे सांगत असे. गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक चढ उतार आले पण प्रत्येकवेळेस देश माझ्याबरोबर राहिला.
 • मी जो प्रवास सुरू केला तो पुढे नेण्यासाठी मला लोकांचा आशीर्वाद हवा आहे आणि लोक भरभरून आशीर्वाद देत आहेत.
 • 17 मे 2014 रोजी सट्टेबाजांचं मोठं नुकसान झालं होतं. म्हणजे मी शपथ घेण्याआधीच इमानदारीचं युग सुरू झालं होतं. सट्टेबाजांच्या जगाला मोठा धक्का बसला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे इमानदारीच्या युगाची चिन्ह दिसायला लागली होती.
 • शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवणं हे आमच्या सरकारचं ध्येय आहे. शेवटच्या लाभार्थीपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न होता.
 • माझी पहिली सभा मेरठमध्ये झाली आणि शेवटची प्रचार सभा मध्य प्रदेशात झाली होती. मेरठमध्ये 1857 साली उठावाची ठिणगी पडली होती. मध्य प्रदेशातील भीमा नायक नावाच्या व्यक्तीला या उठावात भाग घेतल्यामुळे फाशी झाली होती. म्हणजे आमचा प्रचार कार्यक्रमही योग्य दिशेने जात असतो. तो अचानक ठरवलेला नसतो. माझा एकही कार्यक्रम रद्द झाला नाही.

अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेले मुद्दे

 • जनता आमच्यापुढे राहिली, मोदी सरकार पुन्हा बनवण्यासाठी लोकांचे परिश्रम आमच्यापेक्षा जास्त दिसून आले.
 • नरेंद्र मोदी प्रयोगाला जनतेनं स्वीकारलं, गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त बहुमतानं मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत येईल
 • मोदी सरकारने 133 योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला.
 • या योजनांच्या अंतर्गत देशात चेतना जागृत झाली.
 • बहुपक्षीय लोकशाही पद्धती देशाला पुढे नेईल यावर लोकांनी विश्वास दर्शवला आहे.
 • भाजपाची आता देशात 16 राज्यांत सत्ता आहे. भाजपाने गरीब जनतेला घर, वीज, शौचालय, पाणी देऊन देशाच्या विकासात गरिबांचं स्थान आहे याची खात्री त्यांना दिली.
 • सर्व लोकांना मोदींच्या नेतृत्त्वाखाली देश सुरक्षीत आहे अशी लोकांची भावना आहे.
 • शेतकऱ्यांच्या विकासासाठी, महिलांसाठी आमच्या सरकारनं काम केलं आहे.
 • नरेंद्र मोदी यांनी केलेलं काम आणि त्यांची लोकप्रियता यामुळं आमच्या पक्षाला भरपूर नवे स्वयंसेवक मिळाले हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य.
 • नरेंद्र मोदी यांनी सर्व माध्यमांना मुलाखती दिल्या.
 • भाजपामुळे निवडणुकीचा स्तर गेला का यावर बोलताना अमित शाह म्हणाले, भाजपानं ही सुरुवात कधीही केली नाही. मुदद्यांवर बोलणं, भ्रष्टाचारावर बोलणं याला स्तर खाली आणला म्हणणं योग्य नाही. 
 • भाजपचं स्वतःचं बहुमत येईल, पण सरकार एनडीएचे असेल.
 • पश्चिम बंगालमध्ये भाजपानं हिंसा घडवली असा ममता बॅनर्जी यांनी केला आहे त्यावर शाह म्हणाले, माझे गेल्या दीड वर्षात 80 कार्यकर्ते मारले गेले आहेत. आम्ही इतर राज्यांतही लढत आहोत. मग पश्चिम बंगालमध्येच हिंसा कशी झाली?  इतरत्र हिंसा कशी झाली नाही?
 • नथुराम गोडसे यांच्याबाबत साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या विधानाबाबत शिस्त समिती निर्णय घेईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)