साध्वी प्रज्ञासिंह यांना आठवड्यातून एकदा न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश - #5मोठ्याबातम्या

साध्वी प्रज्ञासिंह

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. प्रज्ञासिंह यांना आठवड्यातून एकदा न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश

मालेगाव 2008 बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्व आरोपींना खटल्यासाठी आठवड्यातून एकदा न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश विशेष न्यायालयानं गुरुवारी दिला आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याबरोबर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हेसुद्धा या केसमध्ये मुख्य आरोपी आहेत.

सर्व आरोपी खटल्यादरम्यान अनुपस्थित असल्यानं विशेष NIA न्यायालयानं नाराजी व्यक्त करत आरोपींनी किमान आठवड्यातून एकदा तरी न्यायालयात हजर राहावं, असं म्हटलं आहे.

खटल्याची पुढील सुनावणी २० मेला आहे.

2. नथुराम गोडसे दहशतवादीच - प्रकाश आंबेडकर

महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करणारा नथुराम गोडसे दहशतवादीच होता, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी कोल्हापुरात ते बोलत होते. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

Image copyright BBC / Sharad Badhe

"महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे हा दहशतवादीच होता. कोणाला हे सिद्ध करून पाहिजे असल्यास त्यासाठी कोठेही चर्चा करण्याची आपली तयारी आहे," असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, "काही वर्षांनी श्री श्री गोडसेला भारतरत्न देण्याचीही शिफारस भाजपा करेल," असं एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

3. MPSCच्या जागांमध्ये वाढ

राज्य लोकसेवा आयोगामार्फत गेल्या फेब्रुवारी महिन्यात पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी डिसेंबर 2018मध्ये काढलेल्या जाहिरातीत 342 पदसंख्या जाहीर करण्यात आली होती. आता मात्र ही संख्या 431 इतकी करण्यात आली आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

Image copyright Amol Kokate
प्रतिमा मथळा पुण्यातला मोर्चा

आयोगामार्फत डिसेंबर 2018मध्ये निघालेल्या जाहिरातीनुसार एकूण 11 संवर्गातील 342 पदांसाठी राज्य सेवा पूर्व परीक्षा जाहीर करण्यात आली. त्याप्रमाणे फेब्रुवारीमध्ये ही पूर्व परीक्षा झाली. त्यानंतर मे महिन्यात 342 वरून 424 पर्यंत वाढ करण्यात आली. आता पुन्हा या पदसंख्येत आयोगानं वाढ केली असून आता ती 431 इतकी झाली आहे.

4. 'गोहत्येप्रकरणी बळी ठरलेल्यांची गृहमंत्रालयानं माहिती द्यावी'

2010 चे 2017दरम्यान गोहत्येच्या संशयावरून किती जणांची हत्या करण्यात आली, याची माहिती RTI अंतर्गत गृह मंत्रालयानं द्यावी, असं केंद्रीय माहिती आयोगनं म्हटलं आहे. द वायर हिंदीनं ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images

गोहत्येच्या संशयावरून मारण्यात आलेल्या व्यक्तींची आणि त्यांच्या कुटुंबीयांना काय सरकारी मदत देण्यात आली, याची माहिती समीर खान नावाच्या एका व्यक्तीनं RTI अंतर्गत गृह मंत्रालयाला विचारली आहे.

पण, मंत्रालयानं काहीही प्रतिसाद न दिल्यामुळे समीर खान यांनी केंद्रीय माहिती आयोगात धाव घेतली आहे.

5. 'नाना पाटेकर यांना क्लीन चिट नाही'

"अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरुद्ध विनयभंगाच्या केलेल्या तक्रारीबाबत जबाब देण्यासाठी कोणीही प्रत्यक्षदर्शी पुढे आलेला नाही, या कारणानं पोलिसांनी पाटेकर यांना क्लीन चिट दिली, अशी बातमी जाणीवपूर्वक पसरवली जात आहे," असं अभिनेत्री तनुश्री दत्तानं म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी नाना यांनी विनयभंग केला, असा आरोप तनुश्रीनं गेल्या वर्षी 'मी-टू' मोहिमेच्या निमित्तानं केला होता. तिनं दिलेल्या लेखी तक्रारीनंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती एफआयआर नोंदवला होता.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)