इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे माझीही हत्या होऊ शकते: अरविंद केजरीवाल #पाचमोठ्याबातम्या

Image copyright ANI

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत :

1) इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे माझीही हत्या होऊ शकते : अरविंद केजरीवाल

पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या सुरक्षारक्षकाने केली होती, तसंच मला सुरक्षा देणारे दिल्ली पोलीस अधिकारीच माझी हत्या करू शकतात अशी भीती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. पंजाब केसरी या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे.

केजरीवाल यांच्या विधानाचा भाजपने निषेध केला आहे.

केजरीवाल म्हणाले, "एक दिवस इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) यांच्याकडून माझी हत्या केली जाऊ शकते. भाजप माझ्या जिवावर उठली आहे तेच सुरक्षारक्षकांकडून माझी हत्या करवून घेऊ शकतात," असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

आम आदमी पक्षाच्या प्रचारासाठी केजरीवाल पंजाब दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

"ते माझी हत्या करतील आणि एखाद्या असंतुष्ट कार्यकर्त्यानं हे काम केलं असा दावा करतील," असंही ते म्हणाले.

दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतील अनेक मोठ्या नेत्यांना दिल्ली पोलीस सुरक्षा देत आहे. त्यांच्या रक्षणासाठी संबंधित पथक कटिबद्ध आहे. ज्याप्रमाणे इतर नेत्यांच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसांवर आहे त्याप्रमाणेच केजरीवाल यांचीही जबाबदारी पोलिसांवर आहे.

2) पंतप्रधान नरेंद्र मोदींना मानसिक पराभव मान्य -राज ठाकरे

गेल्या 5 वर्षांत एकदाही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी प्रचार संपताना झालेल्या पत्रकार परिषदेला आलेच कशाला? अमित शाह हेच सगळी उत्तरं देणार होते तर मग मोदीनी गेलेच का? त्यांनी मानसिक पराभव मान्य केला आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

पत्रकारांच्या प्रश्नांना मोदी एवढं का घाबरतात? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

Image copyright ANI

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये लोकांचं म्हणणं ऐकून घेण्याची आणि त्यांना उत्तर देण्याची हिंमतच उरलेली नाही.

मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना का घाबरतात याचं उत्तरही त्यांनी पत्रकारांना द्यावं अशीही मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेनं एकही उमेदवार उभा केला तरीही राज ठाकरे यांनी राज्यभरात 10 प्रचारसभा घेतल्या.

3) राज्यातल्या 26 धरणांतला पाणीसाठा चिंताजनक

महाराष्ट्रातल्या 26 धरणांत केवळ मृत पाणीसाठा शिल्लक असल्यानं ते पाणी काळजीपूर्वक वापरावं, केंद्र सरकारनं राज्य सरकारला सांगितलं आहे. देशातल्या आणखी 6 राज्यात पाण्याची स्थिती बिकट असल्याचंही त्यांनी सांगितलं. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील धरणातलं पाणी तळाला पोहोचलं आहे. केंद्रीय जल आयोगाचे (सीडब्ल्यूसी) सदस्य एस.के. हलदर यांनी सांगितले.

Image copyright PRASHANT KAMBLE
प्रतिमा मथळा फाईल फोटो

गेल्या 10 वर्षांतील जिवंत साठ्याची सरासरी आकडेवारीपेक्षा जलशयांतील पाणीपातळी 20 टक्क्यांवर आल्यानं केंद्र सरकारकडून राज्यांना ही पाणी जपून वापरा असं सांगण्यात आलं आहे.

घटत्या पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर जोवर पाणीपातळीत वाढ होत नाही, तोवर धरणांत उपलब्ध पाण्याचा पिण्यासाठीच वापर करावा, असा सल्ला या राज्यांना देण्यात आला आहे.

4) मान्सून अंदमानात दाखल; दोन दिवसांत पावसाचा अंदाज

नैऋत्य मौसमी वारे (मान्सून) शनिवारी अंदमानात बेटांच्या भागात दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्यानं केल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे.

या मौसमी वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे आणि दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

Image copyright Getty Images

येत्या तीन चार दिवसांमध्ये नैऋत्य मौसमी वाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. येत्या 48 तासात (सोमवारपर्यंत) निकोबार बेटांवर पावसाचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे, असंही या बातमी म्हटलं आहे.

5) 'नथुराम गोडसेनं गांधीजींच्या शरीराची तर प्रज्ञाने त्यांच्या आत्म्याची हत्या केली'

महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेची बाजू घेणाऱ्या नेत्यांचा 'नोबेल' पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी निषेध व्यक्त केला आहे. ABP माझानं ही बातमी दिली आहे.

"नथुराम गोडसेनं गांधीजींच्या शरीराची तर प्रज्ञाने त्यांच्या आत्म्याची हत्या केली आहे. ते अहिंसा, शांती, सहिष्णुता आणि भारताच्या आत्म्याची हत्या केलीय," असंही त्यांनी म्हटलं आहे.

गांधी हे सत्ता आणि राजकारणापेक्षा वर आहेत. छोट्याशा फायद्याचा मोह सोडून भाजप नेतृत्वाने अशा नेत्यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करावी आणि राजधर्माचं पालन करावं', असं सत्यार्थींनी सुचवलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)