मतदानाचा सातवा टप्पा Live: नरेंद्र मोदींसह अनेक हाय-प्रोफाईल उमेदवार रिंगणात

शेवटच्या टप्प्यासाठी मतदान Image copyright Getty Images

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी सरासरी 60.21 टक्के मतदान झालं. सर्वाधिक मतदान हे झारखंडमध्ये झालं. झारखंडमध्ये 64.81 टक्के मतदान झालं.

सातव्या टप्प्यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहारसमवेत सात राज्यांत आणि एका केंद्रशासित प्रदेशात मिळून 59 जागांवर मतदान झालं.

उत्तर प्रदेश आणि पंजाबमधल्या 13 जागांवर, बिहार आणि मध्य प्रदेशमधल्या प्रत्येकी आठ जागांवर, पश्चिम बंगालमधील नऊ, हिमाचल प्रदेशमधील चार, झारखंडमधील तीन आणि केंद्र शासित प्रदेश चंदीगढमध्ये एका जागेवर मतदान झालं.

मतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वांचं लक्ष लागून राहिलं ते पश्चिम बंगालवर. कोलकात्यामध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाला कलम 324 चा वापर करावा लागला आणि पश्चिम बंगालच्या नऊ जागांवरील प्रचार निर्धारित वेळेच्या 19 तास आधीच संपविण्यात आला होता.

मतदानाच्या दिवशीही बंगालमध्ये तोडफोड, वादावादीच्या घटना घडल्या. मात्र मतदारांचा उत्साह कमी झाला नाही. दुपारपर्यंत बंगालमध्ये 49.79 टक्के मतदान झालं.

या टप्प्यात 10 कोटी मतदारांनी मतदान केलं. 909 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात झाला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मतदानाचा हक्क बजावला.

दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

शिमल्यापासून जवळपास 280 किमी दूर असलेल्या हिमाचल प्रदेशच्या किन्नोर जिल्ह्यातील कल्पा गावात श्याम शरण नेगी यांनी मतदान केलं.

Image copyright Twitter / SpokespersonECI
प्रतिमा मथळा श्याम सरण नेगी यांनी मतदान केलं

102 वर्षांचे नेगी यांची 'स्वतंत्र भारताचे पहिले मतदार' अशी ओळख आहे आणि त्यांनी 1951 पासून आजवर झालेल्या सर्व निवडणुकींमध्ये मतदान केलं आहे.

वाचा त्यांची संपूर्ण कहाणी इथे

याशिवाय अनेक सिने आणि क्रीडा जगतातल्या तारेतारकांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

Image copyright Twitter / @GulPanag
Image copyright Twitter / @harbhajan_Singh
प्रतिमा मथळा हरभजन सिंग

सबा आणि फराह या दोन सयामी जुळ्या मुलींना पाटण्यात यंदा दोन स्वतंत्र मतं देता आली. गेल्या निवडणुकीत या दोघींनी मिळून एकच मत दिलं होतं.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा सबा आणि फराह या दोन सयामी जुळ्या मुलींना पाटण्यात यंदा दोन स्वतंत्र मतं देता आली.

तत्पूर्वी, अनेक नेतेमंडळींनीही या टप्प्यात मतदान केलं.

16व्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी इंदौरमधील मतदान केंद्रावर आपला हक्क बजावला.

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर मतदारसंघातून मतदानाचा अधिकार बजावला.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथील मतदान केंद्रावर मतदान केलं.

माजी केंद्रीय मंत्री आणि आनंदपूर साहिबमधील काँग्रेसचे उमेदवार मनीष तिवारी यांनी लुधियानामधील मतदान केंद्रावर मतदान केलं.

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही पाटण्यामध्ये मतदान केलं.

भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी इंदौरमध्ये मतदानाचा अधिकार बजावला.

हाय-प्रोफाईल लढती

शेवटच्या टप्प्यांत सर्वांचं लक्ष असेल ते वाराणसी मतदारसंघाकडे. वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे अजय राय आणि समाजवादी पार्टीच्या शालिनी यादव आहेत.

गोरखपूर मतदारसंघातून भाजपनं प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते रवी किशन यांना उमेदवारी दिली आहे. सप-बसप आघाडीनं रामभुआल निषाद आणि काँग्रेसच्या मधुसूदन तिवारी यांना गोरखपूरमधून उमेदवारी दिली आहे.

Image copyright Getty Images

बिहारच्या पटना साहिब मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याविरुद्ध काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार या बिहारमधील सासाराममधून निवडणूक लढवत आहेत.

पंजाबमध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी अमृतसरमधून निवडणूक लढत आहेत. गुरदासपूरमधून अभिनेता सनी देओल आणि चंदीगढमधून अभिनेत्री किरण खेर या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

उत्तर प्रदेशमधील गाझीपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर आघाडीचे उमेदवार अफजाल अन्सारींचं आव्हान आहे.

झारखंडमधील दुमका मतदारसंघातून झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन निवडणूक लढवत आहेत.

कोठे होत आहे मतदान?

राज्य मतदारसंघांची संख्या मतदारसंघ
उत्तर प्रदेश 13 गोरखपूर, वाराणसी, महाराजगंज, कुशीनगर, देवरिया, बांसगांव, घोसी, सालेमपुर, बलिया, गाझीपूर, चन्दौली, मिर्झापूर आणि रॉबर्ट्सगंज
पंजाब 13 गुरदासपूर, अमृतसर, जालंधर, होशियारपूर, आनंदपूर साहिब, लुधियाना, फतेहगढ साहिब, फरीदकोट, फिरोझपूर, भठिंडा, संगरुर, पटियाला आणि खडूर साहिब.
मध्य प्रदेश 8 इंदौर, देवास, उज्जैन, मंदसौर, खरगौन, खंडवा, रतलाम आणि धार
बिहार 8 पटना साहिब, सासाराम, नालंदा, पाटलीपुत्र, आरा, बक्सर, काराकट आणि जहानाबाद.
झारखंड 3 दुमका, राजमहल, गोड्डा
पश्चिम बंगाल 9 कोलकाता दक्षिण, कोलकाता उत्तर, डमडम, बारासात, बशीरहाट, जयनगर, मथुरापुर, डायमंड हार्बर आणि जादवपुर.
हिमाचल प्रदेश 4 शिमला, हमीरपुर, मंडी आणि कांग्रा
चंदीगड 1 चंदीगढ

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)