नरेंद्र मोदींच्या केदारनाथ यात्रेवरून वाद, ममतांची आयोगाकडे तक्रार

नरेंद्र मोदी Image copyright TWITTER/ JP NADDA

लोकसभा निवडणुकीसाठी आता शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. प्रचाराची सगळी धामधूम आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ आणि बद्रीनाथच्या यात्रेवर आहेत. केदारनाथमधील गुहेतील ध्यानधारणेपासून त्यांच्या यात्रेतला प्रत्येक क्षण कॅमेऱ्यावर टिपला जात आहे, त्याचं प्रक्षेपण होत आहे.

नेमक्या याच गोष्टीवर आक्षेप घेत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार संपुष्टात आला आहे, तरीही पंतप्रधानांचा केदारनाथ-बद्रीनाथ दौरा सातत्यानं टीव्हीवर दाखविण्यात येत आहे. हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचा युक्तिवाद ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आलाय.

हा प्रचाराचाच एक भाग असून त्यामुळं मतदानावरही परिणाम होऊ शकतो, असंही तृणमूल काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

या प्रक्षेपणावर तातडीनं बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही तृणमूल काँग्रेसनं केली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगानंच पंतप्रधानांच्या केदारनाथ-बद्रीनाथ यात्रेला परवानगी दिली होती. लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू असल्याची आठवणही आयोगानं करून दिली होती.

सोशल मीडियावर उपहासात्मक प्रतिक्रिया

तृणमूल काँग्रेसनं केलेल्या तक्रारीनंतर एकीकडे पंतप्रधानांची यात्रा राजकीय वादात सापडला आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावरही मोदींच्या केदारनाथमधील ध्यानधारणेवर उपहासात्मक प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत.

पंतप्रधान मोदी शनिवारपासून दोन दिवसांच्या केदारनाथ-बद्रीनाथ यात्रेवर आहेत. शनिवारी केदारनाथ मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर इथल्या 'ध्यान कुटी'मध्ये मोदींनी ध्यान लावलं. जवळपास 17 तास ते या गुहेमध्ये होते.

Image copyright TWITTER/ MODI

अंगावर भगवं वस्त्र पांघरून ध्यानाला बसलेल्या मोदींचा फोटो भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट केले गेले. माध्यमांनीही याचं प्रसारण केलं. त्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधानांना ट्रोल केलं गेलं.

राणा संग नावाच्या ट्विटर युझरनं मोदींची केदारनाथ-बद्रीनाथ यात्रा हा प्रचाराचाच भाग असल्याचं म्हटलं आहे. सर्व राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचार करणं बंद केलं आहे. मोदी मात्र अजूनही सरकारी खर्चानं प्रचार करत आहेत, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

एक शब्द न उच्चारताही मोदी प्रचार करू शकतात, असं ट्वीट मिशिका सिंह नावाच्या युझरनं केलं आहे.

केदारनाथमधील एकांत आणि आध्यात्मिक वातावरणात मोदींनी केवळ फोटोसेशनवर भर दिला, असं म्हणतही अनेकांनी त्यांना ट्रोल केलं.

काँग्रेस प्रवक्त्या डॉ.शमा मोहम्मद यांनी म्हटलं आहे, की सामान्य व्यक्तीला मेडिटेशनसाठी शांतता आणि एकांताची आवश्यकता असते. मोदीजींना मात्र कॅमेरामन हवा असतो.

काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींनी आपल्याकडे 1988 साली डिजिटल कॅमेरा होता असं विधान केलं होतं. त्याचीही आठवण अनेकांना या निमित्तानं झाली. याच कॅमेऱ्यानं फोटो काढले, का असे खोचक ट्वीटही अनेकांनी केले आहेत.

केदारनाथ की कान्सचं रेड कार्पेट?

मोदींची वेशभूषा, केदारनाथ मंदिरापर्यंत रेड कार्पेटवरून केलेला प्रवास यांमुळे ही केदारनाथ यात्रा आहे की कान्सचं रेड कार्पेट असा प्रश्न नेटिझन्सनी विचारायला सुरूवात केली.

पारंपरिक पहाडी अंगरखा, कमरेला भगवं वस्त्र, डोक्यावर हिमाचली टोपी अशा वेशात पंतप्रधान लाल रंगाच्या पायघड्यांवरून मंदिरामध्ये जातानाचे फोटो पाहिल्यानंतर अशी वागणूक सामान्य भक्तांनाही मिळते का, अशा आशयाचे ट्वीटही केले गेले.

संन्यस्त आयुष्य जगल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीसाठी रेड कार्पेट का? हे केदारनाथचं मंदिर आहे, की कान्सचं रेड कार्पेट? असं ट्वीट नीरज भाटिया या युझरनं केलं.

पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी मोनोग्राम सूटनंतर हा मला आवडलेला हा मोदींचा दुसरा पेहराव आहे. फॅशनची जाण असलेल्या पंतप्रधानांचा अभिमान वाटतो, असं उपरोधिक ट्वीट त्यांनी केलं.

पंतप्रधान मोदी चौथ्यांदा केदारनाथला आले आहेत. आपल्या या दौऱ्यात त्यांनी इथल्या काही विकासकामांचाही आढावा घेतला. मोदी 2017 मध्ये मे आणि ऑक्टोबरमध्ये केदारनाथला आले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातही मोदी केदारनाथ इथं आले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)