Exit Poll: '...तर नरेंद्र मोदी यांचा स्वभाव नवीन सरकार आल्यावर बदलेल का?'

मोदी Image copyright Twitter / Narendra Modi

लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोल आता जाहीर झाले आहेत. बहुतेक सर्व एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता आघाडीच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सर्वाधीक जागा मिळतील, असे कल स्पष्ट होत आहेत.

एबीपी निल्सनने जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पार्टीला 220 जागा आणि NDAला एकूण 267 जागा मिळतील, असं या पोलमध्ये म्हटलं आहे. तसेच काँग्रेसप्रणित आघाडीला 127 जागा मिळतील असे या पोलनुसार स्पष्ट झालं आहे.

भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेशात मोठा फटका बसत असून समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाला एकत्रित आघाडीला जास्त जागा मिळत असल्याचं दिसून येत आहे.

प्रतिमा मथळा एक्झिट पोलचे आकडे

तुम्ही या बद्दलची सविस्तर बातमी इथे पाहू शकता

वाचा- एक्झिट पोलचा अंदाज किती खरा, किती खोटा?

वाचा- 'नमो टीव्हीवर भाजपला 542 पैकी 542 जागा'

या एक्झिट पोलवर विविध नेत्यांनी, राजकीय विश्लेषकांनी मते व्यक्त केली.

"भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करता आलं नाही आणि मित्रपक्षांच्या आधारे सरकार स्थापन करावं लागलं तर अशा सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वभाव बदलेल का," असा प्रश्न राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी एबीपी माझा वाहिनीवर बोलताना उपस्थित केला.

"गेल्या वेळेस उत्तर प्रदेशात सपा-बसपात युती नव्हती त्यामुळे भाजपाला फायदा झाला होता. मात्र आता या दोन पक्षांची आघाडी झाल्यामुळं भाजपाच्या जागा कमी होत असल्याचं दिसत आहे. मात्र राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि काही प्रमाणात झारखंडमध्ये अशी स्थिती नसल्यामुळं तिथं भाजपाला फारसा तोटा होत नसल्याचं दिसतं," असंही पळशीकर यांनी सांगितलं.

प्रतिमा मथळा महाराष्ट्रातील एक्झिट पोलचे आकडे

"सर्व एक्झिट पोल्सकडे पाहिल्यास सध्याच्या सरकारमधील भाजपच्या जागा कमी होतील, मात्र भाजप सरकारला पूर्णपणे नाकारलं नाही, असा अर्थ निघतो," असं मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मत व्यक्त केलं आहे.

2014 साली 'आता डॉ. मनमोहन सिंह यांचं सरकार बास!' अशी एक भावना तयार करण्यात आली होती. मात्र आता तशी मोदींविरोधात लाट नाही. या एक्झिट पोलवरून रालोआचं सरकार तयार होईल हे उघड दिसत असल्याचं गिरीश कुबेर यांनी मत व्यक्त केलं.

'एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही'

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचं मत ट्विटरवर व्यक्त केलं आहे. "एक्झिट पोल हे गॉसिप आहे. या गॉसिपमधून हजारो EVM बदलून त्यात छेडछाड करण्याचा खरा प्लान आहे. मी सर्व विरोधी पक्षांना एकत्रित आणि सर्व ताकदीनिशी राहाण्याचं आव्हान करते. ही लढाई आपण एकत्र लढू," असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

खासदार स्वपन दासगुप्ता यांनी मात्र एक्झिट पोलबद्दल एक वेगळं मत मांडलं आहे. "केवळ मतदान 6 वाजता संपलं म्हणून एक्झिट पोल प्रसिद्ध होणं म्हणजे पश्चिम बंगालमध्ये जिथं लोकशाही रुळावरून घसरली आहे तिथं काही मतदारसंघांत पुन्हा मतदान होणारच नाही असं नाही. निवडणूक आयोगानं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे. विशेषतः डायमंड हार्बर मतदारसंघात," असं त्यांनी ट्वीट केलं आहे.

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्झिट पोलवर वेगळं मत व्यक्त केलं आहे. "प्रत्येक एक्झिट पोल चुकीचा ठरू शकत नाही. आता टीव्ही आणि सोशल मीडिया बंद करून 23 तारखेला पृथ्वी तिच्या आसाभोवती फिरत राहतेय का, हे पाहेपर्यंत थांबावं," असं उपहासात्मक ट्वीट त्यांनी केलं आहे.

Image copyright TWITTER/@OmarAbdullah

एबीपी नील्सनच्या पोलनुसार भाजपाच्या जागा कमी होतील असा कल दाखवण्यात येत आहे. यावर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी "भारतीय जनता पार्टीच्या जागा निश्चित वाढतील," असा अंदाज व्यक्त केला आहे.

तर महाराष्ट्रात ग्रामीण भाग काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने उभा राहील, असं मत काँग्रेस नेते अनंत गाडगीळ यांनी एबीपी माझावर बोलताना व्यक्त केलं.

महाराष्ट्रात शहरी भागामध्ये काँग्रेसनं हा प्रदेश ऑप्शनला टाकल्याप्रमाणे प्रचारात मागे राहाण्याचा प्रयत्न केला, असं मत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)