Exit Poll : आकडेवारीबाबत तज्ज्ञांना नक्की काय वाटतं, एक्झिट पोलचे आकडे प्रत्यक्षात किती खरे ठरतील?

मोदी आणि राहुल Image copyright Getty Images

2019च्या लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर झाली असून त्यात एनडीएला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. असं असलं तरी काही तज्ज्ञांनी ही आकडेवारी अंतिम नाही, असं मत बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं आहे.

मध्यमवर्ग अजूनही मोदींच्या प्रेमात

लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान म्हणतात, "जे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत त्यावरून असं लक्षात येतं की मध्यमवर्गीय लोक अजूनही मोदींच्या प्रेमात आहे. नवमतदार, ज्याने पहिल्यांदाच मतदान केलं आहे तो मोदींच्या धोरणाच्या प्रेमात आहे. ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती आहे. तिथं फारशा उपाययोजना झालेल्या नाहीत. त्याची प्रतिक्रिया या मतदानात उमटलेली नाही असा त्याचा अर्थ काढावा लागेल."

महाराष्ट्राच्या आकडेवारीबद्दल बोलताना ते म्हणाले, "गेल्या वेळेपेक्षा विदर्भ आणि मराठवाड्यात आणि काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्थिती सुधारायला हवी. मागच्या वेळेला भाजपच्या एका नेत्याने 35 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात तो आकडा 42 च्या पुढे गेला होता. ही आकडेवारी त्यांनाही अचंबित करणारी होती. मात्र यावेळी असे काही आकडे येतील असं मला वाटत नाही. मला महाराष्ट्राचे आकडे विश्वसनीय वाटत नाहीत. विदर्भ मराठवाड्यात त्यांना काही जागांवर नुकसान होईल असं मला वाटतं."

प्रधान यांच्या मते भाजप शिवसेना युतीला 28 जागा मिळतील. त्यातही भाजपच्या जागा राहतील मात्र शिवसेनेला जास्त फटका बसेल, असंही प्रधान नमूद करतात.

त्याचप्रमाणे शरद पवार विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचे काय होतील, या प्रश्नाचं उत्तर देताना ते प्रधान म्हणाले, "ही आकडेवारी समजा अस्तित्वात आली तर विरोधकांची आघाडी तयार होण्याची शक्यताच नाही. पण, ज्याअर्थी चंद्राबाबू नायडू दिल्लीतल्या नेत्यांच्या भेटी घेत फिरत आहेत त्याअर्थी हे आकडे प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता कमी आहे याची कल्पना या नेत्यांना आली असावी. कारण प्रादेशिक नेत्यांना त्यांच्या भागात काय परिस्थिती आहे याची कल्पना असेलच."

'भाजपचं सरकार येईल'

भाजपचा दावा होता आमच्या पक्षाच्या तीनशेपेक्षा जास्त जागा येतील. उत्तर प्रदेशात 70पेक्षा जागा येतील असं भाजपचं म्हणणं होतं. असं चित्र एक्झिट पोलमध्ये दिसत नाही, असं ज्येष्ठ पत्रकार आदिती फडणीस म्हणाल्या. बीबीसी हिंदीशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

मात्र एक्झिट पोलनुसार भाजपचं सरकार येईल असं दिसतंय, असंही त्या म्हणाल्या. पक्षीय समीकरणांमध्ये अन्य पक्षांना जास्त जागा मिळेल असं दिसतंय त्याचं एक कारण म्हणजे भाजपप्रणित एनडीएमधून काही पक्ष सोडून गेले आहेत. एनडीए आणि यूपीएव्यतिरिक्त अन्य पक्ष मजबूत झाले आहेत असं त्यांना वाटतं.

Image copyright Congress/Twitter

"नरेंद्र मोदींचं सरकार पुन्हा सत्तेत येईल असं चित्र आहे. मात्र सगळे विरोधी पक्ष एकत्र आले तर नरेंद्र मोदींना थोडी अडचण निर्माण होऊ शकते. मात्र व्यावहारिकदृष्ट्या असं घडत नाही.

भाजपकडून काही पक्षांना मैत्रीचा हात पुढे केला जाऊ शकतो. आम्ही तुमचा सन्मान करतो अशी भूमिका घेतली जाऊ शकते. शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आमच्याप्रमाणे विचार करणाऱ्या पक्षांशी हातमिळवणी केली जाऊ शकते असं सूचित केलं. बहुमताचा आकडा पार न केल्यास भाजपच्या मित्रपक्षांची संख्या वाढू शकते. काही नवी समीकरणं मांडली जाऊ शकतात," फडणीस पुढे सांगतात.

काँग्रेसच्या स्थितीबाबत त्या म्हणाल्या, "गेल्या निवडणुकांच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढतील. मात्र त्यावर संतुष्ट होणं त्यांना परवडणारं नाही. राहुल गांधी सपशेल अपयशी ठरलेत असं काँग्रेसमधला कोणताही गट म्हणू शकत नाही. प्रियंका गांधी यांना काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. त्यांच्याकडून कार्यकर्त्यांना बऱ्याच आशाअपेक्षा होत्या. मात्र प्रियंका आपला करिश्मा दाखवू शकल्या नाहीत. काँग्रेसने 72,000 रुपये वर्षाला देऊ असं सांगितलं होतं. मात्र काँग्रेस पक्ष हे खरंच करू शकेल का याविषयी नागरिकांच्या मनात साशंकता होती. अनेक ठिकाणी संघटना म्हणून काँग्रेस ठप्प स्वरुपात आहे. त्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी फटका बसू शकतो."

काँग्रेसचं पुनरुज्जीवन हाही महत्त्वाचा मुद्दा असल्याचं त्या म्हणाल्या. त्यांच्या जागा 44हून 80पल्याड झाल्याचं चित्र आहे. त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. राहुल गांधी पंतप्रधान होतील असं चित्र रंगवलं जात होतं. ते काही होण्याची शक्यता नाही. काँग्रेसला आणखी प्रचंड मेहनत करण्याची आवश्यकता आहे.

काँग्रेसने दिल्लीत आपबरोबर तसंच उत्तर प्रदेशात सपा-बसपशी आघाडी करण्यासंदर्भात पुढाकार घेतला नाही. बिहारमध्ये काँग्रेसने आघाडी केली. त्याचवेळी काँग्रेस पक्ष देशभरात ओळखला जातो. ते स्वत:ची ओळख ठासवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी काळासाठी हे सकारात्मक चित्र आहे, असं फडणीस यांना वाटतं.

तृणमूलचे कार्यकर्ते साशंक होते. तृणमूलचे दहा ते पंधरा जण संपर्कात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान म्हटलं होतं. बंगालमध्ये दोन वर्षात विधानसभा निवडणुका होत आहेत. किती माणसं ममतांना सोडून भाजपमध्ये जातात हे निकालानंतर स्पष्ट होईल. तसंच बंगालमध्ये भाजप तेवढ्या मजबूत स्थितीत नाही. आगामी काळात बंगालमध्ये लढाई आणखी तीव्र होणार असल्याचं मत फडणीस यांनी व्यक्त केलं.

Image copyright Getty Images

"निकालानंतरच खरी आकडेवारी स्पष्ट होईल. काँग्रेस सत्तास्थापनेसाठी दावा करू शकते का, हे तेव्हाच स्पष्ट होईल. तेवढ्याच जागा भाजपलाही मिळाल्या तर अन्य पक्षांची भूमिका निर्णायक ठरू शकते," अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

आंध्र प्रदेशची स्थिती अस्पष्ट

आंध्र प्रदेशचं चित्र अस्पष्ट आहे. राष्ट्रीय स्तरावरील संघटनांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसला जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र राज्यातील संघटनांनी केलेल्या सर्वेक्षणात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीला सर्वाधिक जागा मिळतील अशी शक्यता आहे.

याबाबत बीबीसी तेलुगूचे संपादक राममोहन गोपीशेट्टी सांगतात, "जगनमोहन रेड्डी यांच्या सभांना मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. मात्र चंद्राबाबू नायडूंनी सरकारच्याच एका योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिला आणि लहान मुले अशा 94 लाख सदस्यांना प्रत्येकी 10,000 रुपये देण्याची खेळी केली. आता या महिलांची मतं चंद्राबाबू नायडू यांना मिळणार का, हे निकालादिवशी स्पष्ट होईल."

आंध्रात जनसेनेला दोन जागांवर विजय मिळू शकतो. मात्र हा पक्ष अन्य दोन जागांची किती मतं खाणार हे कळीचं ठरू शकतं, असं राममोहन यांना वाटतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)