मुंबईत धुळीमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणात 15 वर्षांत दुपटीने वाढ #5मोठ्याबातम्या

मुंबई Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रतिकात्मक फोटो

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या अशा आहेत :

1) मुंबईतली धुळ गेल्या 15 वर्षांत दुपटीनं वाढली

मुंबईला किनारी वारे लाभले असले तरी हे वारे हवेतले प्रदूषित घटक कमी करण्यास असमर्थ ठरत आहेत, असं एका अभ्यासात दिसून आलं आहे. गेल्या 15 वर्षांत मुंबईल्या हवेची गुणवत्ता काही प्रमाणात सुधारली आहे. पण हवेतले धुळीचे कण मात्र वाढले आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतल्या हवेत सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजनच्या ऑक्साईड्सची पातळी कमी झाली असली तर हवेतले धुळीचे कण लक्षणीयरित्या वाढले आहे.

केंद्रीय सांख्यीकी कार्यालयानं 'EnviStats-India 2019' हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार 2001मध्ये धुळीचं प्रमाण दरचौरस मीटर भागातत सरासरी 67.2 मायक्रोग्रॅम इतकं होतं. तेच प्रमाण 2017 मध्ये वाढत 151 मायक्रोग्रॅम इतकं झालं आहे, असंही या बातमीत म्हटलं आहे.

2) राज्यातील निम्मे टँकर मराठवाड्यात

महाराष्ट्रात सुरू असलेल्या साडेपाच हजार टँकरपैकी निम्मे टँकर एकट्या मराठवाडा विभागात सुरू आहेत. सुमारे 50 लाख नागरिकांना त्याद्वारे पाणी पोहोचवलं जात आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक 1069 टँकर औरंगाबाद जिल्ह्यात सुरू आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

यंदा अत्यल्प पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळाला सामोरं जावं लागत आहे. सध्या राज्यातील तब्बल 4,331 गावं आणि 9,470 वाड्यांना 5493 टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यातली सर्वाधिक गावं आणि वाड्या मराठवाडा विभागात आहेत.

किमान तीन आठवडे पावसाची वाट पहावी लागणार असल्याने टँकरची संख्या साडेतीन हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

मराठवाडा पाठोपाठ उत्तर महाराष्ट्र विभागात 1257 तर पश्चिम महाराष्ट्रात 881 टँकरद्वारे पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

3) चंद्राबाबूंकडून 1 दिवसात शरद पवारांची दोनदा भेट

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान सुरू असतानात नवी दिल्लीत महाआघाडीच्या नेत्यांच्या भोटीगाठी वाढल्या होत्या. निवडणूक निकालनंतरच्या परिस्थितीबाबत या नेत्यांमध्ये चर्चा होत आहे. सामनानं ही बातमी दिली आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाआघाडीचे नेते रणनीती आखत आहेत. चंद्राबाबू यांनी शनिवारी राहुल गांधी, शरद पवार, मायावती आणि अखिलेश यादव यांना भेटले होते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा संग्रहित फोटो

तसंच शुक्रवारी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली होती. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रादेशिक पक्षांच्या मदतीने सरकार स्थापनेसाठी महाआघाडीची रणनीती ठरवण्यात येत आहे.

4) मतदान टाळण्यासाठी आदल्या दिवशीच बोटाला शाई

उत्तर प्रदेशातील चंडौली मतदारसंघातल्या ताराजीवनपूर गावातील एका दलित वस्तीत जाऊन भाजप कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्रीच काही मतदारांच्या बोटांना शाई लावून वर 500 रूपये लाच दिली. त्यांना मतदान करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, अशी सप-बसपनं तक्रार केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

भाजप कार्यकर्ते या वस्तीत गेले आणि लोकांना तुम्ही कुणाला मतदान करणार असे विचारलं. त्यांनी भाजपला मत देणार नाही, असं सांगितल्यानंतर त्यांच्या बोटाला शाई लावून प्रत्येकी पाचशे रुपये लाच देण्यात आली, असा आरोप आहे. याच्या निषेधार्थ ताराजीवनपूरमधल्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यासमोर निदर्शनं केली.

Image copyright Getty Images

दरम्यान मतदारांच्या बोटाला मतदान न करताच बळजबरीने शाई लावण्यात आली असली तरी ते मतदान करू शकतात, शिवाय जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं स्थानिक प्रशासनानं सांगितलं.

भाजपन मात्र हे आरोप फेटाळले असून हा विरोधकांनी केलेला बदनामीचा डाव असल्याचा आरोप केला आहे.

5) प्राथमिक शिक्षक भरतीची परीक्षा 22सप्टेंबरला

शिक्षण हक्क कायद्याने प्रस्तावित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा 22 सप्टेंबरला घ्यावी, असं राज्य परिक्षा परिषदेतर्फे प्रस्तावित करण्यात आलं आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे

राज्यात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत समाविष्ट होण्यासाठी शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. राज्य शासनातर्फे अनेक वर्षांनंतर शिक्षक भरती सुरू करण्यात आली आहे.

असं असतानाही अनेक जिल्हा परिषदांनी मधल्या काळात शिक्षक भरतीस स्थगिती असतानाही शिक्षक भरती केल्याची बाब समोर आली आहे. अशा नियुक्त झालेल्या पण शिक्षक भरती परिक्षा उत्तिर्ण न झालेल्या शिक्षकांचं वेतन थांबवावं आणि त्यांना सेवेतून कमी करावं असे आदेश सरकारने याआधी दिले होते.

त्यामुळे परिक्षा उत्तिर्ण न झालेल्या तरीही सेवेत असलेल्यांना ही शेवटची संधी असणार आहे, असंही या बातमी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)