Exit Poll : महाराष्ट्राच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीबाबत तज्ज्ञांना नेमकं काय वाटतं?

महाराष्ट्र Image copyright Getty Images

निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले आहेत. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार एनडीए सरकारला बहुमत मिळणार हे स्पष्ट दिसत असलं, तरी अनेक ठिकाणी भाजपच्या जागा कमी झालेल्याही दिसत आहेत. गेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं 80 पैकी 71 जागा जिंकल्या होत्या. यावेळी मात्र सपा-बसपा युतीचा भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशाखालोखाल संसदेत सर्वाधिक खासदार पाठवणारं राज्य महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात 2014 मध्ये 48 पैकी 42 जागा भाजप-शिवसेना युतीनं जिंकल्या होत्या. यावेळेस महाराष्ट्रातही युतीच्या जागा कमी होतील असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तविण्यात आला आहे. राजकीय विश्लेषक महाराष्ट्राच्या एक्झिट पोलचा अन्वयार्थ नेमका कसा लावत आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला.

प्रतिमा मथळा एक्झिट पोलनुसार महाराष्ट्राचं चित्र असं असेल

काही अपवाद वगळता बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप-शिवसेना युतीला 34 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 14 जागा मिळतील, असं एक्झिट पोलची आकडेवारी सांगते. तर वंचित बहुजन आघाडी आपलं खातंही उघडू शकणार नाही, असं चित्र आहे.

मात्र लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक यदु जोशी यांनी एक्झिट पोलचे हे आकडे आपल्याला फारसे मान्य नसल्याचं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

"भाजप-शिवसेनेला 38 जागा मिळतील, असा माझा अंदाज आहे. भाजपला 22 तर शिवसेनेला 16 जागांवर विजय मिळू शकेल. तीन ते चार जागांचं नुकसान होत असल्यामुळे याचा फायदा नेमका काँग्रेसला होईल की राष्ट्रवादीला होईल, हे सांगणं अवघड आहे. विदर्भात युतीला दोन जागांचा फटका बसू शकतो. पश्चिम महाराष्ट्रात पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, त्यामुळं तिथंही युतीची एखादी जागा कमी होऊ शकते," असं यदु जोशींनी सांगितलं.

12 ते 15 मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडी चांगली मतं घेईल, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला.

"मोदी लाट ओसरली असं समजून प्रसिद्धी माध्यमांनी आपले अंदाज व्यक्त केले आहेत. 2014 मध्ये यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या राजवटीविरुद्ध नाराजी होती. मनमोहन सिंह यांच्यावर मौनी पंतप्रधान अशी टीका होत होती. त्या पार्श्वभूमीवर मोदींची प्रतिमा ही लोकांना आश्वासक वाटत होती. त्यामुळे मोदी लाट प्रत्यक्ष दिसत होती. यंदा असं वातावरण नसलं, तरी मोदींनाच कौल देण्याचं मतदारांनी निश्चित केलं होतं."

यदु जोशींनी सांगितलं, की महाराष्ट्राचा विचार करता शिवसेना आणि भाजप निवडणुकीआधी एकत्र आले होते. विरोधकांनी ही युती मारूनमुटकून असल्याची टीका केली असली तरी दोन्ही पक्षांनी एकदिलानं निवडणूक लढवली. काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल बोलायचं तर हे दोन्ही पक्ष सोशल मीडियावरच जास्त अॅक्टिव्ह होते. पण मतदारांना मतदान केंद्राकडे घेऊन येणाऱ्या यंत्रणेचा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे अभाव होता. याउलट भाजपनं बूथच्या हिशोबाने आपल्या कार्यकर्त्यांना कामं सोपवली होती. मोदी द्वेषापलिकडे विरोधकांचा कोणताही अजेंडा दिसला नाही. अशापरिस्थितीत महाराष्ट्राच्या मतदारांनी नरेंद्र मोदी की राहुल गांधी या पर्यायांपैकी मोदींच्याच नावाला पसंती दिली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नाना पटोले नितीन गडकरींना धक्का देणार का?

तर दुसरीकडे ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनीही बीबीसी मराठीशी बोलताना एक्झिट पोलच्या आकडेवारीबद्दल असहमती व्यक्त केली.

"भाजप प्रणित एनडीए 200चा आकडा पार करेल, पण बहुमतापर्यंत पोहोचणं त्यांच्यासाठी कठीण असेल. महाराष्ट्रातही युतीच्या जागा लक्षणीयरित्या कमी होतील. भाजप-सेनेला 26 जागा मिळतील तर काँग्रेस-राष्ट्रवादीला 22. शिवसेना 10 ते 12 जागा जिंकू शकेल तर भाजपला 16 ते 14 जागा मिळतील. काँग्रेस 8 ते 9 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला 12 ते 13 जागांवर विजय मिळू शकेल," असं सुरेश भटेवरांनी म्हटलं.

नेमक्या कोणत्या भागांमध्ये भाजप-शिवसेनेला फटका बसू शकतो, याबद्दल बोलताना सुरेश भटेवरा यांनी सांगितलं, की मराठवाडा आणि विदर्भामध्ये भाजप-शिवसेनेला नुकसान होऊ शकतं. मुंबईमध्ये काँग्रेस एखाद्या जागेवर विजय मिळवू शकेल. कोकणातही काँग्रेसला फार जागा मिळण्याची शक्यता नाहीये. पश्चिम महाराष्ट्रात शिरूर, मावळ, बारामती, सातारा, कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीला विजय मिळू शकतो.

एक्झिट पोलच्या एकूण प्रक्रियेबद्दल मत व्यक्त करताना भटेवरा यांनी म्हटलं, की निवडणुकीचे निकाल प्रभावित करण्यासाठी मानसशास्त्रीय दबाव म्हणून बऱ्याचदा एक्झिट पोलच्या आकड्यांचा वापर होतो. उत्तर प्रदेशमधील निवडणुका कव्हर करताना एक्झिट पोलचा वापर कसा केला जातो, हे मी स्वतःही पाहिलं आहे. आम्हीच सत्तेवर येणार आहोत, असं सांगत सरकारी यंत्रणा आणि विरोधकांवर दबाव आणला जातो.

राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी महाराष्ट्रासाठी विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलच्याच जवळपास जाणारा अंदाज व्यक्त केला.

महाराष्ट्रात युतीला 30 ते 32 जागा मिळतील तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना 16 ते 18 जागांवर विजय मिळू शकेल, असं अभय देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युतीच्या विरोधात केलेला प्रचार आणि वंचित बहुजन आघाडीने केलेली मतविभागणी, हे दोन घटक विचारात घेणं आवश्यक आहे, असं अभय देशपांडे सांगतात.

"मतांच्या विभागणीमध्ये राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी महत्त्वाची भूमिका बजावेल. मात्र, त्यांच्या परिणामाचा अंदाज बांधणं सध्या तरी कठीण आहे. सोलापूर, अकोल्यासह राज्यात अन्य दोन ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार स्पर्धेत आहेत. इतर 10 ते 12 मतदारसंघात त्यांच्या उमेदवारांना चांगली मतं मिळण्याची शक्यता आहे. असं झालं तर त्याचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बसेल आणि त्यांच्या जागा कमी होतील."

अभय देशपांडे यांनी सांगितलं, "आता युतीच्या कमी होणाऱ्या जागांबद्दल विचार करायचा झाल्यास पहिल्यांदा महाराष्ट्रात होणाऱ्या लढतींकडे पाहूया. महाराष्ट्रात अकरा ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत आहे. तर 17 ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये. या लढतींमध्ये सर्वांत जास्त नुकसान हे शिवसेनेचं होऊ शकतं. शिवसेनेचा भूमिकेतला बदल, ग्रामीण-शहरी मत विभागणी यासोबतच उमेदवार न बदलणं यांमुळे शिवसेनेला फटका बसेल. भाजपनं आपले आठ उमेदवार बदलले. शिवसेनेनंही काही ठिकाणी उमेदवार बदलावेत, अशी सूचना भाजपकडून करण्यात आली होती. मात्र शिवसेनेचे अनेक उमेदवार हे तिसऱ्यांदा-चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध मतदारांमध्ये असलेल्या नाराजीमुळे शिवसेनेच्या जागा कमी होतील."

अभय देशपांडे यांनीही युतीच्या जागा मराठवाडा-विदर्भात कमी होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला. "विदर्भातील 10 आणि मराठवाड्यातील 8 अशा एकूण 18 जागांवर मिळून गेल्यावेळेस काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळाला होता. भाजप-शिवसेनेनं 16 जागा जिंकल्या होत्या. यावेळेस परिस्थिती बदलेल. मराठवाडा-विदर्भात काँग्रेस राष्ट्रवादी मिळून 7 जागा जिंकू शकते तर युतीला अकरा जागांवर विजय मिळू शकतो."

Image copyright ANI

ज्येष्ठ पत्रकार किरण तारे यांनीही काँग्रेस यवतमाळ-वाशिम आणि गडचिरोलीमध्ये वरचढ ठरू शकते, असं मत बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

"उस्मानाबाद आणि परभणीमध्ये शिवसेनेलाही फटका बसेल. पण काँग्रेसच्या हातून नांदेड-हिंगोली जाऊ शकतात. उत्तर महाराष्ट्रात भाजप धुळ्याची जागा हरू शकते. राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची असलेली माढ्याची जागा ते जिंकतील त्याचबरोबर राष्ट्रवादी बारामती आणि साताराही राखेल. मात्र मावळच्या जागेवर राष्ट्रवादी हरू शकेल."

"युती केल्यामुळे भाजप आणि सेनेला फायदा झाला आहे, असं मतही किरण तारे यांनी व्यक्त केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अजून आपली विश्वासार्हता कमावता आली नाही. मोदी यांची लोकप्रियता कायम आहे. त्यांना अजून एक संधी मिळायला हवी, अशी भावना लोकांमध्ये आहे. तसंच विरोधी पक्षांकडे असलेला सम्यक, विश्वासार्ह आणि स्वीकारार्ह नेतृत्वाचा अभाव हेदेखील भाजपच्या पथ्यावर पडताना दिसत आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)