विवेक ओबेरॉयनं मागितली माफी, ऐश्वर्यासंबंधीचं ट्वीटही केलं डिलीट

ऐश्वर्याबद्दलच्या ट्वीटमुळे विवेक ओबेरॉय वादात Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ऐश्वर्याबद्दलच्या ट्वीटमुळे विवेक ओबेरॉय वादात

ऐश्वर्या रायचा भूतकाळ आक्षेपार्ह पद्धतीनं समोर आणणाऱ्या मीमवरून वाद वाढल्यानंतर अभिनेता विवेक ओबेरॉयनं यासंबंधीचं ट्वीट आता काढून टाकलं आहे. इतकंच नाही तर विवेकनं माफीही मागितली आहे.

विवेक ओबेरॉयनं ट्वीट करून म्हटलं, की एखादी गोष्ट तुम्हाला प्रथमदर्शनी विनोदी आणि निरुपद्रवी वाटते, पण दुसऱ्यांना तसं वाटेलच असं नाही.

विवेकनं लिहिलं आहे, "मी गेल्या दहा वर्षांत दोन हजारांहून अधिक वंचित मुलींना मदत करण्यासाठी काम केलं आहे. महिलांचा अनादर करण्याचा विचारही माझ्या मनात येणार नाही. माझ्या मीम शेअर करण्यामुळे कोणत्याही महिलेच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. माझं ट्वीट मी डिलीट केलं आहे."

Image copyright Twitter / VivekOberoi
प्रतिमा मथळा विवेक ओबेरॉयने ट्वीट केलेलं ते वादग्रस्त मीम

एक्झिट पोल आणि निवडणूक निकालाच्या संदर्भात ऐश्वर्या रायचं एक मीम सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. यात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सलमान खान, नंतर विवेक ओबेरॉय आणि त्यानंतर तिचा पति अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या यांच्याबरोबर दिसत आहे.

हेच मीम विवेक ओबेरॉयनं ट्वीट केलं आणि "हे खूप क्रिएटिव्ह आहे. हे राजकारण नाही, फक्त आयुष्यच समजा," असं म्हटलं. या ट्वीटनंतर विवेक ओबेरॉयवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. महिला आयोगानंही यासंबंधी विवेक ओबेरॉयला नोटीस बजावली.

विवेकनं माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली. मात्र यामध्ये काहीही चूक नसून आपण माफी मागणार नसल्याचं विवेक ओबेरॉयनं म्हटलं होतं.

"माफी मागायला हरकत नाही, मात्र मी काय चूक केली आहे? माझ्याकडून चूक झाली असेल तर मी माफी मागेन आणि मला नाही वाटत, की मी काही चुकीचं केलं आहे,"

सोशल मीडियावर विवेक ट्रोल

अभिनेत्री सोनम कपूर अहुजा हिने विवेकचं हे ट्वीट "अतिशय घृणास्पद आणि दर्जाहीन" असल्याचं म्हटलं.

सोनम कपूरच्या या टिप्पणीवर ANI वृत्तसंस्थेशी बोलताना विवेक ओबेरॉयनं म्हटलं, "तिने (सोनम कपूरने) तिच्या चित्रपटात थोडी कमी ओव्हर अॅक्टिंग आणि सोशल मीडियावर कमी ओव्हर रिअॅक्टिंग (अतिरेकी प्रतिक्रिया देणं) टाळावं. मी स्त्रियांच्या सबलीकरणासाठी गेल्या 10 वर्षांपासून काम करतोय. मी कुणाच्याही भावना दुखावलेल्या नाही."

रौनक राठोड नावाच्या ट्विटर युजरनं म्हटलं, "स्वत:ला सेलिब्रिटी म्हणवणाऱ्या या माणसाची मनोवृत्ती बघा. तो एक सेलिब्रिटी असल्याचं विसरलाय. एखाद्या राजकीय पक्षाची आंधळी भक्ती असली की काय होतं, याचं हे उदाहरण आहे. विवेक सर, मला तुमची लाज वाटते. मी आता तुमचे चित्रपट, शोज पाहणार नाही."

Image copyright Twitter

मानसी नावाच्या युजरनं म्हटलं आहे, की विवेक ऑबेरॉयने एक मीम शेअर केलं तर लोक त्याच्यावर टीका करू लागले आहेत. सलमानने जेव्हा ऐश्वर्याला मारहाण केली होती तेव्हा विवेकने तिला आधार दिला होता.

"त्याने अगदी विनोदी पद्धतीने काही शेअर केलं तर लोक त्याचा इश्यू करत आहेत. मोदींवरच्या चित्रपटात त्यांची महत्त्वाची भूमिका असल्यामुळे उदारमतवादी आणि स्त्रीवादी लोक गळा काढत आहेत," असंही मानसीला वाटतं.

Image copyright Twitter

पण अंकिता नावाच्या एका युजरला वाटतं की यावर रोष व्यक्त करण्याचा अधिकार फक्त अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना आहे. ती म्हणते, "जर ऐश्वर्याला काही अडचण असेल तर तिने विवेकला माफी मागायला सांगावी, कारण ते मीम त्याने तयार केलेलं नाही. त्याने फक्त शेअर केलं आहे."

Image copyright Twitter

"हे ट्वीट अतिशय वाईट आहे. हे महिलांचा अपमान करणारं ट्वीट आहे," असं सांगत महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी महिला आयोग विवेक ऑबेरॉयला नोटिस पाठवत असल्याचं म्हटलं आहे.

Image copyright Twitter

राष्ट्रीय महिला आयोगच नव्हे तर राज्य महिला आयोगानेही विवेक ओबेरॉयला या मीममध्ये ऐश्वर्या राय आणि आराध्याचा फोटो वापरयाबद्दल नोटीस बजावली आहे.

Image copyright Twitter

"अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी केलेल्या ट्वीटची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. त्यांना नोटीस बजावली जाईल. त्यांचे ट्वीट महिलेचा अनादर करणारे आहे," असं राज्य महिला आयोग अध्यक्ष विजया रहाटकर एका व्हीडिओ संदेशात म्हणाल्या.

आकाश बॅनर्जी या राजकीय व्यंगकाराने महिला आयोगाच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे. "हे पाऊल उचलल्याबद्दल आभार. यामुळे शहरातील महिलांना अधिक सुरक्षित आणि आदराने समाजात जगता येईल. वेळीच अशा प्रकारावर आळा घालणं आवश्यक आहे."

Image copyright Twitter

पण सगळेच महिला आयोगाच्या या कारवाईशी सहमत नाही.

NDTVच्या पत्रकार निधी राजदान यांना हे पाऊल अतिशयोक्तीचं वाटतं. "महिला आयोगाला दुसरी काही कामं नाही आहेत का," असा प्रश्न त्या उपस्थित करतात.

Image copyright Twitter

तर पत्रकार पल्लवी घोष यांच्या मते हे खरंच एक गंभीर प्रकरण आहे. "ही मानसिकता बदलली पाहिजे," असं ट्वीट घोष यांनी केलं आहे.

Image copyright Twitter

ऐश्वर्या, सलमान आणि विवेक हे प्रकरण आहे तरी काय?

एकेकाळी बॉलिवुडची आघाडीची जोडी म्हणून ऐश्वर्या आणि सलमान यांचं नाव घेतलं जायचं. पण त्यांच्यातील वाद माध्यमांमध्ये आल्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं.

त्यानंतर ऐश्वर्याचं नाव विवेक ओबेरॉयशी जोडलं गेलं. त्यांनी तेव्हा एकत्र केलेल्या सिनेमामुळे ही चर्चा अधिक गहिरी झाली.

त्यानंतर 2003 मध्ये सलमान खानने आपल्याला धमकावल्याचा आरोप विवेक ओबेरॉयने केला होता. ऐश्वर्यानेही त्यावेळी म्हटलं होतं, "आता बास झालं! मी माझ्या कुटुंबासाठी आणि आत्मसन्मानासाठी सलमानबरोबर कधीही काम करणार नाही."

Image copyright AFP

"सलमानबरोबरचा तो काळ एक वाईट स्वप्न होतं," असं तेव्हा तिनं सांगितलं होतं.

तिने सलमान खानवर आरोप केला, की त्याच्या कुटुंबियांनी कायम तिला त्रास दिला आणि तिचा व्यक्तिगत तसंच व्यावसायिक पातळीवर मानसिक छळ केला. सलमानच्या कुटुंबियांनी तिच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली तसंच इतर कलाकारांशी तिचे संबंध बिघडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, असंही तिनं म्हटलं होतं.

मात्र विवेक ओबेरॉयबरोबरच्या कथित प्रेमप्रकरणाबद्दल तिने कधीही वाच्यता केली नाही.

2007 मध्ये ऐश्वर्या रायचा विवाह अभिषेक बच्चन बरोबर झाला. त्यांना आराध्या नावाची आठ वर्षांची मुलगी आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)