पहिला सर्जिकल स्ट्राईक मोदी सरकारच्याच काळात: भारतीय लष्कर #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

Image copyright TWITTER
प्रतिमा मथळा लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह

1. पहिला सर्जिकल स्ट्राईक मोदी सरकारच्याच काळात: भारतीय लष्कराची माहिती

युपीएच्या काळातही सर्जिकल स्ट्राईक झाले होते, या काँग्रेसच्या दाव्याला छेद देणारी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे. सप्टेंबर 2016 पूर्वी सर्जिकल स्ट्राईक झाला नसल्याचं भारतीय लष्करानं म्हटलं आहे. इंडिया टीव्हीनं ही बातमी दिली आहे.

उत्तर विभागाचे जीओसी इन चीफ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी यासंबंधीचं निवेदन दिलं आहे. काही दिवसांपूर्वी माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना DGMOनं पहिली सर्जिकल स्ट्राईक 2016 सालीच झाल्याचं म्हटलं होतं.

राजकीय पक्षांचं यासंबंधी काय म्हणणं आहे, त्याचं उत्तर सरकार देईल. मी केवळ तुम्हाला वस्तुस्थिती सांगत आहे, असंही रणबीर सिंह यांनी म्हटलं.

2. एक्झिट पोलनंतर भाजपच्या हालचालींना वेग, मोदी-शाहांनी बोलावली घटक पक्षांची बैठक

भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळणार हे एक्झिट पोलमधील आकड्यांवरून स्पष्ट झाल्यानंतर एनडीएमधील घटक पक्षांची एक बैठक मंगळवारी बोलवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्लीमध्ये एनडीएमधील सहकारी पक्षांसाठी स्नेह भोजन आयोजित केलं आहे. द इंडियन एक्सप्रेसनं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल आणि लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

3. मध्य प्रदेश सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न, बहुमत सिद्ध करण्यासाठी तयार असल्याचा कमलनाथ यांचा दावा

मध्य प्रदेशातील काँग्रेसप्रणीत कमलनाथ सरकार अल्पमतात आल्याचा दावा भाजपने केला आहे. एक्झिट पोलचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्रात पुन्हा भाजपचं सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. त्यानंतर लगेचच भाजपनं मध्य प्रदेशमधील सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

Image copyright FACEBOOK

दरम्यान, मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपण विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी तयार आहोत, असं जाहीर केलं. सरकार पाडण्यासाठी भाजप धडपडत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसनं २३०पैकी ११४ जागा जिंकल्या. बहुमत सिद्ध करण्यासाठी पक्षाला ११६ जागांची गरज होती ती बहुजन समाज पक्षाचे दोन आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार यांच्या जोरावर भागली आहे. भाजपला १०९ जागा मिळाल्या होत्या.

4. एक्झिट पोल आणि मोदींचं केदारनाथ दर्शन म्हणजे नौटंकीः शरद पवार

निवडणुकीची रणधुमाळी आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ-बद्रीनाथला गेले होते. केदारनाथमधील ध्यानमुद्रेतले त्यांचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र मोदींचं केदारनाथ दर्शन ही 'नौटंकी' असल्याचं म्हटलं होतं.

Image copyright Getty Images

राष्ट्रवादी काँग्रेसनं सोमवारी मुंबईतील इस्लाम जिमखाना इथं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीदरम्यान शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. एबीपी माझानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी एक्झिट पोलच्या आकड्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि विविध संस्थांनी प्रसिद्ध केलेले एक्झिट पोल हेदेखील एक प्रकारचं नाटकच असल्याचं म्हटलं.

5. निवडणुकीचा प्रचार संपल्याबरोबर 'नमो टीव्ही' गायब

निवडणुकीच्या काळात अचानकपणे सुरू झालेलं 'नमो टीव्ही' हे चॅनेल मतदानाच्या सातव्या टप्प्यातला प्रचार संपल्यावर "ऑफ एअर" झालं आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

Image copyright NARENDRAMODI @TWITTER

31 मार्चपासून नमो टीव्ही टाटा स्काय, डिश टीव्ही आणि अन्य DTH प्लॅटफॉर्म्सवर सुरू झालं होतं. या चॅनेलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जुनी भाषणं तसंच भाजप आणि केंद्र सरकारशी संबंधित गोष्टी दाखवल्या जात होत्या.

17 मे रोजी निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातला प्रचार बंद झाला आणि 'नमो टीव्ही' सुद्धा. भाजपच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनीही 'नमो टीव्ही' बंद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतरही 'नमो टीव्ही' लाँच झाल्यामुळे आम आदमी पक्ष तसंच काँग्रेसनंही याविरोधात तक्रार केली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)