EVM : लोकसभा निकालांआधी विरोधी पक्षांची निवडणूक आयोगाची भेट आणि प्रणब मुखर्जींची चिंता

मुखर्जी आणि मोदी Image copyright Ministry of parliamentary affairs

23मेरोजी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी मंगळवारी 21 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या सदस्यांची भेट घेतली. यादरम्यान नेत्यांनी EVM संबंधी निवडणूक आयोगाकडे चिंता व्यक्त केली आहे.

काँग्रसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, EVM मशीनच्या छेडछाडीबाबत बातम्या येत आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याविषयीची चिंता निवडणूक आयोगासमोर ठेवली आहे.

23मेरोजी मतमोजणी करताना त्यासोबतच VVPATची मोजणी व्हावी, अशी सर्व पक्षांनी आयोगाकडे मागणी केली आहे.

आझाद यांनी सांगितलं, "आमच्या 2 मागण्या होत्या. एक म्हणजे प्रत्येक लोकसभा क्षेत्रात 5 रँडम पोलिंग बूथ निवडून तिथं EVM मशीनसोबतच VVPAT स्लिपचीही मोजणी व्हावी. हे सर्वांत आधी व्हायला हवं आणि कोणत्याही एका बूथच्या VVPATमध्ये कोणत्याही प्रकारची चूक समोर आली, तर त्या लोकसभा क्षेत्राची संपूर्ण मतमोजणी पुन्हा करायला हवी."

"याविषयी एक बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. आमची चिंता आयोगानं व्यवस्थितपणे ऐकली आहे आणि यावर निर्णय करण्याचं आश्वासन दिलं आहे," त्यांनी पुढे सांगितलं.

"विरोधी पक्ष हा मुद्दा गेल्या दीड महिन्यांपासून उचलून धरत आहे, पण निवडणूक आयोगानं याकडे दुर्लक्ष केलं आहे," असं काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे.

प्रणव मुखर्जी यांची चिंता

EVM मशीनच्या चर्चेनंतर माजी राष्ट्रपती प्रणब मुर्खजी यांनी ट्वीट केलं आहे. EVMसंबंधित बातम्यांमुळे चिंता वाटत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

"निवडणूक आयोगाच्या ताब्यात असलेल्या EVMची सुरक्षा करणं, ही आयोगाची जबाबदारी आहे. लोकशाहीला आव्हान करणाऱ्या शक्यतांसाठी कोणतीच जागा शिल्लक असायला नको. जनतेचा निर्णय सर्वोच्च असतो आणि त्याविषयी थोडाही संशय येता कामा नये," असं त्यांनी म्हटलंय.

"कोणत्या संस्थेने कसं काम करायचं, याचा निर्णय तिथं काम करणाऱ्या लोकांचा असतो. या प्रकरणात संस्थेची विश्वासार्हता पटवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. त्यांनी सर्व शक्यतांवर विराम लावायला हवा," असंही त्यांनी म्हटलंय.

यापूर्वी मुखर्जी यांनी निवडणूक आयोगाची प्रशंसा करताना म्हटलं होतं की, 2019ची निवडणूक अत्यंत योग्य पद्धतीनं पार पडली आहे.

विरोधी पक्षांची बैठक

निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर विरोधी पक्षांचं सरकार बनवण्याची शक्यता पडताळण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते.

Image copyright ANI

या बैठकीत काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, अशोक गहलोत यांच्यासह तेलुगू देसमचे चंद्राबाबू नायडू, बहुजन समाज पक्षाचे चंद्र मिश्रा, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसचे डरेक ओब्रायन, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, डीएमकेच्या कनिमोळी, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीद मेमन आणि नॅशनल कॉन्फरन्सचे देविंदर राणा यांचा समावेश होता.

दुसरीकडे निवडणूक आयोगानं EVMसंबंधित बातम्यांमुळे होणारे मात्र आरोप फेटाळून लावले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)