PSLV 46 वरून RISAT-2Bचं प्रक्षेपण यशस्वी: इस्रोने सोडला ढगांआडून जमिनीवरील वस्तू टिपू करू शकणारा उपग्रह #5मोठ्याबातम्या

उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण Image copyright TWITTER/ISRO

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. इस्त्रोनं केलं रिसॅट-बी उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (ISRO) रिसॅट-2B या उपग्रहाचं यशस्वीपणे प्रक्षेपण केलं. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन स्पेस सेंटर इथून PSLV-C46 च्या माध्यमातून रिसॅटचं प्रक्षेपण करण्यात आलं.

615 किलो वजनाचा हा उपग्रह निर्धारित कक्षेत स्थिरावला, अशी बातमी टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे.

रिसॅट ही रडार इमेजिंग उपग्रहाची श्रेणी आहे. या मालिकेतला पहिला उपग्रह 20 एप्रिल 2009 साली प्रक्षेपित करण्यात आला होता. त्यानंतर पूर्णपणे भारतीय बनावटीचा रिसॅट-1 या उपग्रहाचं प्रक्षेपण 26 एप्रिल 2012 ला करण्यात आलं होतं.

रिसॅट श्रेणीतल्या उपग्रहांचा वापर हा मुख्यतः हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी केला जातो. पण त्याचबरोबर लष्करी कारवायांसाठीही हे उपग्रह उपयुक्त ठरतात. रडार इमेजिंग सॅटेलाइट दाट ढगांना भेदून जमिनीवरील वस्तूची प्रतिमा टिपू शकतात.

2. अरुणाचल प्रदेशः कट्टरवादी हल्ल्यात आमदारासह 11 जण ठार

अरुणाचल प्रदेशच्या तिराप जिल्ह्यात कट्टरवाद्यांकडून नॅशनल पीपल्स पार्टीचे (NPP) आमदार तिरोंग अबो यांच्यासह 11 लोकांची हत्या करण्यात आली. तिरोंग अबो मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या पक्षाचे आमदार होते.

बीबीसी हिंदीसह NDTVनं सुद्धा ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

Image copyright TIRONG ABOH/ FACEBOOK

या हल्ल्यात तिरोंग अबो यांच्या मुलाचाही मृत्यू झाला. जखमींपैकी दोघांची प्रकृती अतिशय गंभीर आहे.

NSCN या संघटनेच्या हल्लेखोरांनी पाळत ठेवून हा हल्ला घडवून आणला. या घटनेनंतर आसाम रायफल्सनं या भागात शोधमोहीम हाती घेतली आहे.

कट्टरतावाद्यांकडून यापूर्वीही NPP आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या हत्या घडवून आणण्यात आल्या आहेत.

3. NDAचं नेतृत्व पुन्हा मोदींकडे

NDAचं नेतृत्व पुन्हा एकदा एकमुखाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. मंगळवारी झालेल्या NDAच्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाला रितसर मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.

सर्व घटकपक्षांनी मोदींच्या नेतृत्वाला मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी दिली.

Image copyright TWITTER/BJP

भाजपने आयोजित केलेल्या बैठकीला NDAतील 36 घटकपक्षांचे नेते उपस्थित होते. तीन मित्रपक्षांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. या तिन्ही पक्षांनी मोदींच्या नेतृत्वाचं समर्थन करणारं पत्र पाठवल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

NDAने विकासाचा वेग वाढवण्याचा प्रमुख संकल्प केला असून पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं.

4. राफेल करारः अनिल अंबानींकडून काँग्रेस नेत्यांविरोधातला मानहानीचा दावा मागे

राफेल कराराच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राविरोधात दाखल केलेला पाच हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला अनिल अंबानी यांनी मागे घेतला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

राफेल कराराबाबत नॅशनल हेराल्डमध्ये आलेल्या लेखाविरोधात रिलायन्स समूहाने अहमदाबाद इथल्या न्यायालयात खटला दाखल केला होता. अनिल अंबानी यांचा दावा होता की नॅशनल हेरॉल्डमध्ये राफेल कराराबाबत खोटी आणि अपमान करणारी माहिती छापण्यात आली आहे.

Image copyright Getty Images

या खटल्यावर सत्र न्यायाधीश पी. जे. तमकुवाला यांच्या कोर्टात कामकाजही सुरू झालं होतं. आम्ही प्रतिवाद्यांना त्यांच्यावरचे खटले मागे घेत असल्याचं सांगितलं आहे, अशी माहिती अंबानी यांचे वकील राकेश पारीख यांनी कोर्टात दिली.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीनं काँग्रेस नेते सुनील जाखड, रणदीपसिंह सुरजेवाला, ओमन चांडी, अशोक चव्हाण, अभिषेक मनु सिंघवी, संजय निरुपम या नेत्यांविरोधात आणि नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.

5. प्रज्ञा सिंह यांच्याविरोधातला हत्येचाखटला काँग्रेस सरकार पुन्हा उघडण्याच्या तयारीत

भोपाळमधून भाजपच्या उमेदवार असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर सुनील जोशींच्या हत्येचा आरोप होता. मात्र ठोस पुरावे नसल्यामुळं देवासच्या न्यायालयानं 1 फेब्रुवारी 2017 ला प्रज्ञा आणि अन्य सात आरोपींची मुक्तता केली होती.

मध्य प्रदेश सरकारनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक सुनील जोशी यांच्या हत्येप्रकरणी वरच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. एबीपी न्यूजनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Image copyright Getty Images

मध्य प्रदेशचे कायदा मंत्री पी. सी. शर्मा यांनी म्हटलं की देवासच्या जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी अहवाल देण्यास सांगितलं आहे. त्या अहवालावर कायदेशीर सल्ला घेऊन मग आम्ही वरच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय घेऊ.

मध्य प्रदेश सरकार सूडबुद्धीनं ही कारवाई करत असल्याची टीका भाजपनं केली आहे. "साध्वी प्रज्ञा काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवत असल्यामुळेच काँग्रेसकडून ही कारवाई केली जात आहे," असं मध्य प्रदेश भाजपचे प्रवक्ते रजनीश अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)