लोकसभा निकाल : फेरफारासाठी EVM सुरक्षा व्यवस्थेतून बाहेर काढणं किती सोपं?

EVM Image copyright Getty Images

लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी 21 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या सदस्यांची भेट घेतली. EVM मशीनच्या छेडछाडीबाबत बातम्या येत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे यासंबंधीची काळजी व्यक्त केली, असं काँग्रसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, सोशल मीडियावरही EVM आणि VVPAT असलेली वाहनं सापडल्याचे दावे केले जात आहेत. बिहार तसंच उत्तर प्रदेशमधील झाशी, चंदौली, गाझीपूर, डुमरियाजंग इथून EVM सापडल्याचे आरोप झाले आहेत.

निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी सोशल मीडियावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया शेअर केल्या आणि EVM सोबत कोणत्याही प्रकारची छेडछाड करणं कठीण असल्याचं स्पष्ट केलं.

निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या अनेक IAS अधिकाऱ्यांनीही सोशल मीडियावरून EVM हॅकिंग किंवा जिथं EVM ठेवले जातात, त्या स्ट्राँग रूममधून ही मशीन्स हलवणं हे अशक्यप्राय असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणतात अधिकारी?

ओडिशा केडरच्या आयएएस अधिकारी अबोली नरवणे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून EVM हॅक करणं किंवा त्यात नोंदवल्या गेलेल्या मतांमध्ये फेरफार करणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे.

अबोली नरवणे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे-

CRPFच्या सुरक्षा यंत्रणेला चकवा देणं, सीसीटीव्ही फुटेज मॅनेज करणं, रिटर्निंग अधिकाऱ्याचं सील तोडून स्ट्राँग रूममधून 600 EVM बाहेर काढणं, त्यानंतर ही मशीन्स ट्रकमध्ये भरून त्यातल्या मतांमध्ये फेरफार घडवणं, ती परत ठेवण्यासाठी पुन्हा सुरक्षा भेदून जाणं, रिटर्निंग अधिकाऱ्याचं सील मिळवणं आणि मशीन्स स्ट्राँग रुममध्ये परत ठेवणं हे सगळं खरंच शक्य आहे का?

मतदानाची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा 5 महिने अविरतपणे काम करत होती. EVM वर शंका घेणं म्हणजे या सर्व अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांवर अविश्वास व्यक्त करण्यासारखं आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे भारतासारख्या देशात सर्व अधिकारी एकाच राजकीय पक्षाचं समर्थन करतील हे कसं शक्य आहे?

Indian Customs and Indirect Taxes विभागात कार्यरत असलेले अधिकारी श्रीकांत अवचार यांनीही EVM हे सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे.

त्यांनी लिहिलं आहे, की हरियाणा (ऑक्टोबर 2014), मेघालय (फेब्रुवारी 2018), मध्य प्रदेश (डिसेंबर 2018) आणि आंध्र प्रदेश (एप्रिल 2019) इथे पार पडलेल्या निवडणुकांमध्ये निरीक्षक म्हणून काम केल्यानंतर मी हे सांगू शकतो की रिटर्निंग अधिकाऱ्यांच्या ताब्यात EVM हे सुरक्षित असतात.

EVM एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवताना सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे या सर्व प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं आणि EVM संबंधी शंका-कुशंकांना प्रोत्साहन देणं हे स्वतंत्र-न्याय्य निवडणुका पार पाडण्यासाठी झटणाऱ्या अधिकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे.

2015 सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी भावेश मिश्रा यांनीही EVM हॅक करणं किंवा त्यासोबत छेडछाड करणं का अवघड आहे, यासंबंधी सविस्तर लिहिलं आहे. केवळ भावेश मिश्राच नाही तर अमिताव सेन आणि अन्य काही अधिकाऱ्यांनाही मतदानाच्या दिवसापासून मतमोजणीपर्यंतचा प्रवास नेमका होतो कसा, हे सांगितलं आहे.

मतदानापासून मतमोजणीपर्यंत...

Image copyright Getty Images

सर्वांत पहिली गोष्ट EVM हे स्टँड अलोन मशीन असतात. प्रत्येक मशीनला एक सीरियल नंबर दिलेला असतो. या मशीनमधील चीप या One Time Programmable असतात. म्हणजे नंतर त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल घडवता येत नाही.

निवडणूक आयोगाकडून EVM हे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे (DEO) पाठविण्यात येतात. या मशीन्सच्या सुरक्षेची जबाबदारी ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे असते.

EVM ची पहिली तपासणी ही सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये पार पडते. ही मशीन्स नीट काम करत आहेत की नाही हे मुख्यतः तपासलं जातं. या EVM वर मत नोंदविण्याची रंगीत तालीमही (mock poll) पार पाडली जाते. या चाचणीत जी EVM योग्य पद्धतीनं काम करतात ती वेगवेगळ्या पोलिंग बूथवर पाठवली जातात. अर्थात, ही मशीन्स पाठविण्याआधी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यामध्ये बॅलट पेपरही टाकला जातो. या सर्व प्रक्रियेचं व्हीडिओ रेकॉर्डिंगही होतं.

प्रत्यक्ष मतदानापूर्वीही बूथवर पोलिंग एजन्ट्सच्या उपस्थितीतही mock poll होतात आणि मतदानाआधी ही मतं मशीनमधून काढून टाकली जातात.

मतदान पार पडल्यानंतर EVM बंद करून सील केली जातात आणि मग स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यासाठी पाठवली जातात. ज्या गाडीतून EVM ची वाहतूक केली जाते, त्या गाडीसोबत पोलिंग एजन्ट्स स्वतःच्या वाहनानं जाऊ शकतात. स्ट्राँग रूममध्ये EVM फॉर्म 17 आणि निवडणूक अधिकारी तसंच पोलिंग एजन्टची सही असलेलं कार्डही असतं. प्रत्येक EVM चा सीरियल नंबर हा संबंधित पोलिंग एजन्टकडे असतो.

Image copyright Getty Images

स्ट्राँग रूम या उमेदवार आणि केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत सील केल्या जातात. स्ट्राँग रुमच्या सुरक्षेची जबाबदारी CFPF च्या जवानांकडे असते. उमेदवार किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेली कोणतीही व्यक्ती चोवीस तास त्या स्ट्राँग रूमवर नजर ठेवू शकतात. शिवाय या स्ट्राँग रूमवर सीसीटीव्हीचीही निगराणी असते. स्ट्राँग रूममध्ये जाण्यासाठी एकच प्रवेशद्वार असतं आणि त्याची किल्ली ही जिल्हा निवडणूक अधिकारी आणि उप-जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे असते. स्ट्राँग रूम या केवळ उमेदवारांच्या उपस्थितीतच उघडता येऊ शकतात.

मतमोजणीच्या वेळेस EVM मध्ये नोंदवली गेलेली मतं ही प्रेसिडिंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालातील आकड्यांसोबत जुळवून पाहिली जातात.

या निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच पोलिंग बूथमधील व्हीव्हीपॅट पावत्या आणि EVM मध्ये नोंदवली गेलेली मतं याचीही पडताळणी केली जाणार आहे. ठराविक निकष न लावता या पोलिंग बूथची निवड केली जाईल.

केवळ एका मशीनमध्ये फेरफार करायचा झाला, तरी सुरक्षेसाठीची ही सर्व यंत्रणा भेदणं आवश्यक आहे. ही अशक्य कोटीतील आहे, असंच या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

( वरील सर्व माहिती वेगवेगळ्या IASअधिकाऱ्यांनी त्यांच्या फेसबुक टाईम लाईनवर लिहिलेल्या पोस्ट मधून घेण्यात आली आहे.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)