औरंगाबाद लोकसभा निकाल : MIM चे इम्तियाज जलील विजयी, चंद्रकांत खैरे यांचा पराभव

चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील, हर्षवर्धन जाधव Image copyright Facbook

औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि MIMचे उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले आहेत.

औरंगाबादमध्ये चंद्रकात खैरे सलग चारवेळा निवडून आले होते, यंदा पाचव्यांदा मात्र ते जिंकू शकले नाहीत.

औरंगाबादचे सिल्लोड, फुलंब्री आणि पैठणवगळता उर्वरित तालुके आणि शहर असा मतदारसंघ आहे. गेल्या चार टर्मपासून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे या मतदारसंघातून निवडून येत आहेत.

त्यांनी 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये विजय मिळवला होता. 1999 मध्ये त्यांनी बॅरिस्टर अंतुले यांना, 2004 मध्ये रामकृष्ण बाबा पाटील यांना. 2009 मध्ये उत्तमसिंह पवार आणि पाच वर्षांपूर्वी नितीन पाटील यांचा पराभव केला होता. हे सर्व काँग्रेसचे उमेदवार होते.

औरंगाबादची निवडणूक ही हिंदू-मुस्लीम मतांच्या ध्रुवीकरणावरच होत असल्याचा आरोप नेहमी केला जातो. यामुळेच लोकसभा मतदारसंघातील विकासाचे मुद्दे हे नेहमी दुर्लक्षीत झाले.

यंदा MIMचे आमदार इम्तियाज जलील हे निवडणूक रिंगणात उतरले. वंचीत बहूजन आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघीतलं जात असलं तरी त्यांनी MIMचे निवडणूक चिन्ह असलेल्या पतंगावरच निवडणूक लढविली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा औरंगाबाद शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.

दुसरीकडे काँग्रेसतर्फे सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सिल्लोडचे आमदार आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारलं होतं. त्यानंतर ते पक्षातून बाहेरही पडले. जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यासोबत त्यांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट ही चर्चेचा विषय ठरली.

मतदान संपल्यानंतर त्याचदिवशी संध्याकाळी MIM आणि वंचीत बहूजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. त्यातून आपला विजय पक्का असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)