भारतीय वायुदलाने स्वतःचंच मिग-17 हेलिकॉप्टर पाडलं होतं #5मोठ्याबातम्या

मिग -17 क्रॅश Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मिग -17 क्रॅश

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. मिग-17 हेलिकॉप्टर पाडलं म्हणून वायूसेनेच्या अधिकाऱ्यावर कारवाई

फेब्रुवारी 27 रोजी भारतीय आणि पाकिस्तानी लढाऊ विमांनांमध्ये चकमक झाली होती. काश्मिरातल्या नौशेरा भागात भारतीय वायुदलाचं मिग-17 हे हेलिकॉप्टर कोसळलं होतं आणि त्यात असलेले सहा लोक ठार झाले होते.

त्यानंतर झालेल्या चौकशीत असं समोर आलं आहे की हे हेलिकॉप्टर भारतीय वायुदलानंच पाडलं. याविषयीचं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.

चौकशीनंतर समोर आलेल्या पहिल्या अहवालात असं लक्षात आलं की शत्रूचं हेलिकॉप्टर समजून भारतीय वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी मिग-17 पाडलं. यानंतर श्रीनगर एअरबेसच्या सर्वांत वरिष्ठ अधिकाऱ्याला पदावरून हटवण्यात आलं आहे.

चौकशीचा अंतिम अहवाल येणं अजून बाकी आहे.

2. फ्रान्समधल्या रफाल कार्यालयात चोरीचा प्रयत्न

फ्रान्समध्ये भारताचं रफाल प्रकल्प व्यवस्थापन ज्या कार्यालयातून पाहिलं जातं त्या कार्यालयात रविवारी रात्री काही अज्ञात व्यक्तींनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याचं आता समोर आलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

Image copyright DASSAULT RAFALE
प्रतिमा मथळा रफाल विमान

रफालबाबतचा महत्त्वाची कागदपत्र चोरण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या उपनगरात राफेल व्यवस्थापन टीमचं कार्यालय असून कार्यालयातून हार्ड डिस्क वा कोणताही दस्तावेज चोरीला गेलेला नाही, अशी माहिती मिळाली आहे.

हे अज्ञात इसम कार्यालयात नेमके कोणत्या उद्देशान घुसण्याचा प्रयत्न करत होते, याचा तपास सुरू असल्याचे भारतीय हवाईदलातील सूत्रांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितले.

3. भावना कांत वायूसेनेतल्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक ठरल्या

फ्लाईट लेफ्टनंट भावना कांत या हवाईदलातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिक झाल्या आहेत. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

25 वर्षीय भावना यांनी मिग-21 बिसन्स विमानावरील प्रशिक्षण बुधवारी यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्या बिहारच्या आहेत. प्रशिक्षणात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून भावनाला तब्बल चार मातृत्व टाळण्याचा सल्ला देण्यात आला होता.

वायुसेनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमानुसार फायटर पायलटसाठी पाच वर्षांचे विनाअडथळा नियमित प्रशिक्षण आवश्यक आहे.

भावना कांतसह अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग यांचेही प्रशिक्षण सुरू आहे. आतापर्यंत या तिघींनी पायलॅटस पीसी-7, टर्बोप्रॉप्स, किरण आणि हॉक जेट ट्रेनर्स अशी तुलनेनं हाताळायला सोपी विमानं चालवली आहेत. आता त्यांनी 340 किमी प्रति तासांचं व्हर्च्युअल प्रशिक्षण घेतलं आहे. अवनीने 2-आसनी मिग-21 टाइप 69 ट्रेनर विमानात क्वालिफाइड फायटर इंस्ट्रक्टरसोबत प्रशिक्षण घेतलं आहे.

4. अभिनेता विवेक ओबेरॉयला जीवे मारण्याची धमकी

धमकी मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांनी वाढ केली आहे. धमकी देणारा व्यक्ती कोण आहे, कुठून आला आहे, काय धमकी दिली आहे, याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.

याबद्दलचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.

एक्झिट पोल्स आणि ऐश्वर्या राय यांच्याबाबतीतलं वादग्रस्त ट्वीट केल्यानंतर अडचणीत आलेल्या विवेक ओबेरॉयला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

ही धमकी मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांनी वाढ केली आहे. धमकी देणारा व्यक्ती कोण आहे, कुठून आला आहे, काय धमकी दिली आहे, याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे.

5. देशात पाच ठिकाणी आत्मघाती हल्ल्याची फेसबुकवरून धमकी

जळगाव शहरातल्या अतिया रिचार्ज नावाच्या फेसबुक अकाउंटवरून स्वत:ला मोहम्मद कलीमउद्दीन खान म्हणून घेणाऱ्या व्यक्तीने देशातील प्रमुख पाच शहरांमध्ये आत्मघाती हल्ले करण्याची धमकी दिली आहे़. याबद्दलचं वृत्त लोकमतने दिलं आहे.

हा व्यक्ती स्वत:ला जैश-ए-मोहम्मदचा एक जिहादी असल्याचे सांगत आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सायबर हल्ला

"देशातील प्रमुख पाच शहरांमध्ये आत्मघाती हल्ला करण्यासाठीचा दारूगोळा आणि सुसाईड बाँबगोळा पोहोचला आहे. पुलवामा येथे झालेला हल्ला फक्त नमुना होता. पंतप्रधानांनी आतापासून सांभाळून रहायला हवे," असे त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पोस्ट टाकणाऱ्या संशयिताचा जळगाव सायबर पोलीस शोध घेत आहेत. याबद्दल फेसबुकलाही सायबर पोलिसांकडून मेल पाठविण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)