लोकसभा निकाल: मतमोजणी कशी होते? EVM आणि VVPAT कसे काम करतात?

मतदानयंत्राची माहिती देताना Image copyright AFP / Getty Images

17व्या लोकसभेसाठी सात टप्प्यांमध्ये 542 जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यांची मतमोजणी गुरुवारी सकाळी 8 वाजेपासून सुरू झाली आहे.

या निवडणुकीत पहिल्यांदा देशात VVPAT मशीन वापरलं गेलं आणि यामुळेच यंदाचे निकाल यायला उशीर होईल.

मतमोजणी सुरू व्हायच्या आधीच अनेक विरोधी पक्षांनी EVMच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित केले. आधी सुप्रीम कोर्टाकडे आणि नंतर निवडणूक आयोगाकडे विरोधकांनी 100 टक्के VVPATच्या पावत्या पडताळून पाहायची मागणी केली होती. पण कोर्ट आणि निवडणूक आयोग दोघांनीही ही मागणी फेटाळून लावली.

काही विरोधी पक्षांनी EVMला सुरक्षा न देताच त्यांची वाहतूक केल्याचा आरोप केला. पण यात काही तथ्य नाही, असं म्हणत निवडणूक आयोगाने हा आरोपही फेटाळून लावला.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
लोकसभा निवडणुकीचे निकाल: ताजे आकडे आणि विश्लेषण

पण EVM व्दारे झालेल्या निवडणुकीची मतमोजणी कशी होते? चला बघूया.

मतमोजणी प्रक्रिया

सगळ्यात आधी रिटर्निंग अधिकारी आणि त्यांचे सहकारी सगळ्यांसमोर मतांची गोपनीयता राखण्याची शपथ घेतात. त्यानंतर रिटर्निंग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सगळ्या EVMची तपासणी होते.

यावेळी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आपल्या काउंटिंग एजंटसोबत मतमोजणी केंद्रांवर उपस्थित राहाण्याचा अधिकार आहे. हे एजंट मतामोजणी पाहू शकतात.

सगळ्यांत आधी पोस्टल मतांची मोजणी केली जाते. त्यानंतरच EVM मधल्या मतांची मोजणी सुरू होते.

Image copyright Getty Images

मतदान केंद्रांवर एका विशिष्ट क्रमाने ठेवलेल्या EVM ऑन करून त्यांच्यात नोंदल्या गेल्या मतांची मोजणी होते. त्यानंतर वेगवेगळ्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची मोजदाद होते.

त्यानंतर सगळ्या मतदान केंद्रांवरच्या EVM आकड्यांची बेरीज केली जाते.

शेवटी होणार VVPATच्या पावत्यांची पडताळणी

निवडणूक आयोगानुसार EVM ची मतमोजणी संपल्यानंतर त्यांची टोटल VVPATच्या पावत्यांशी पडताळून पाहिली जाणार आहे. या कामासाठी प्रत्येक काउंटिंग हॉलमध्ये वेगळा VVPAT बूथ असेल.

कोणत्याही प्रकारचा वाद किंवा तांत्रिक अडचणींमुळे मतमोजणी थांबली तर याबद्दल ताबडतोब निवडणूक आयोगाला कळवणं, ही रिटर्निंग अधिकाऱ्याची जबाबदारी आहे.

ही सूचना मिळताच निवडणूक आयोग त्या ठिकाणी मतमोजणी चालू ठेवणं, मतमोजणी रद्द करणं किंवा पुर्नमतदान करण्याचा आदेश देऊ शकतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मतमोजणी

जर कोणत्याही त्रुटीशिवाय मतमोजणी पूर्ण झाली आणि निवडणूक आयोगाने दुसरा कोणता आदेश दिला नाही तर रिटर्निंग अधिकारी निकाल घोषित करू शकतात.

यंदाच्या निवडणुकीत जवळपास 39.6 लाख EVM आणि 17.4 लाख VVPAT मशीन वापरले गेले, यात राखीव मशीन्सचाही समावेश आहे.

निवडणूक आयोगाने यंदा सुविधा नावाचं अॅपही लाँच केलं आहे, ज्यावर मतदान केंद्रांचे निकाल पाहता येऊ शकतील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)