उत्तर प्रदेश लोकसभा निकाल: भाजपचा विजय आणि सपा-बसपाच्या महागठबंधनचा पराभव का झाला?

महागठबंधन भाजपला रोखू शकलं नाही Image copyright Twitter / Getty Images
प्रतिमा मथळा महागठबंधन भाजपला रोखू शकलं नाही

असं म्हणतात की दिल्लीतल्या खुर्चीचा रस्ता उत्तर प्रदेशमधून जातो. हे वाक्य अनेकदा आपल्या कानी पडलंही असेल पण प्रत्येक वेळेस ते खरंच ठरतं.

यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळेस उत्तर प्रदेशमधले दोन प्रमुख पक्ष समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टी यांच्यात ऐतिहासिक आघाडी झाली ज्याला महागठबंधन असंही म्हटलं गेलं.

उत्तर प्रदेशातली जातीची समीकरणं पाहाता राजकीय विश्लेषकांचा कयास होता की जर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजयरथ कुठे अडवला जाऊ शकत असेल तर तो फक्त उत्तर प्रदेशमध्ये.

2014 मध्ये भाजपला उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 73 जागा मिळाल्या होत्या. पण यंदाच्या निवडणुकांमध्ये सपा-बसपाच्या महागठबंधनने भाजपसमोर तगडं आव्हानं उभं केलंय, असं वाटत होतं. त्यामुळे भाजपच्या जागा कमी होतील असाही अंदाज होता.

याबाबत भाजपच्या नेत्यांना प्रश्न विचारले की ते म्हणायचे की "आम्ही यावेळेस पश्चिम बंगालमध्ये चांगली कामगिरी करणार आहोत."

Image copyright Getty Images

पण झालं भलतंच. सध्याच्या निकालांचे कल पाहाता भाजप उत्तर प्रदेशमध्ये 60 जागा तरी जिंकेल असं दिसतं आहे. त्यांना एकूण 49 टक्के मतं मिळाल्याचंही दिसतंय.

असं काय झालं, कुठे कळ फिरली की भाजपच्या हातातून उत्तर प्रदेश जाणार, असं वाटत असताना मतदारांनी भाजपच्या पारड्यात एवढी भरभरून मतं टाकली? महागठबंधन अयशस्वी ठरलं का?

याबद्दल आम्ही तज्ज्ञांशी बोललो.

जेष्ठ पत्रकार महेश सरलष्कर सांगतात, "असं नाहीये की महागठबंधन फेल ठरलं. तुम्ही बघा, त्यांच्या जागा मागच्या निवडणुकीच्या तुलनेत वाढल्या आहेत. पण असं म्हणता येऊ शकेल की त्यांच्या अपेक्षाएवढ्या जागा त्यांना मिळाल्या नाहीयेत.

"आणि दुसरं म्हणजे मोदी फॅक्टर. मोदींच्या नावावर भरघोस मतदान झालेलं आहे. काल (बुधवारी) रामविलास पासवान म्हणाले की ही मोदींची लाट नाही तर त्सुनामी आहे. त्यामुळे भाजपला उत्तर प्रदेशमध्ये यश मिळालं आहे."

Image copyright Getty Images

उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांदरम्यान फिरलेले आणि त्या भागाचा अभ्यास असणारे पत्रकार पार्थ MN सांगतात, "ही निवडणूक राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर लढली गेली. पुलवामा हल्ला, बालाकोट हल्ला, असे मुद्दे या निवडणुकीत आले आणि जातीपातीच्या समीकरणापेक्षा हे मुद्दे अधिक प्रभावी ठरले."

मोदींचा कल्ट, त्यांच्यामागे ठामपणे उभे असलेले लोक हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे, असं पार्थ सांगतात. "लोक सरळ सांगतात, 'स्टेट का चुनाव अलग होता है, देश का अलग'. त्यामुळे अखिलेशसाठी मनात सॉफ्ट कॉर्नर असूनही लोकांनी लोकसभेला मात्र मोदींना मत दिलं."

उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान घरकुल योजना, उज्ज्वला योजना यासारख्या योजनांबद्दल आकर्षण आहे, असंही पार्थ MN सांगतात. "गावागावात फिरताना जाणवतं की लोकांना या योजनांचा लाभ हवा आहे. सगळ्यांनाच याचा फायदा मिळाला नसेल पण भाजपने या योजनांचं मार्केटिंग चांगलं केलेलं आहे. त्यामुळे लोक म्हणतात आज ना उद्या आम्हाला फायदा मिळेल. म्हणूनच भाजपला मतदान झालेलं आहे."

पण गठबंधनचं कुठे चुकलं?

महागठबंधनचे जे कोअर मतदार होते, म्हणजे मुस्लीम, जातव आणि यादव यांच्या पलीकडे महागठबंधन जाऊ शकलं नाही, असं पार्थ MN सांगतात.

"या तिघांचा मिळून 40-42 टक्के व्होट शेअर आहे. पण जे बिगर जाटव दलित आणि ओबीसी आहेत ते सगळे भाजपच्या बाजूने आहेत. भाजपने जातीपातीची समीकरणंही व्यवस्थित जमवली होती. मायावतींच्या पक्षांत असलेले ओबीसी नेते आपल्याकडे खेचून आपली व्होट बँक पक्की केली होती. या सगळ्याचा फायदा भाजपला झाला," असंही ते सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)