लोकसभा निकाल : राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या पराभवाची कारणं काय?

17 व्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणित युपीएला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे पक्षाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही पराभव पत्करावा लागला आहे. पंजाब वगळता संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतात काँग्रेसची धुळधाण झाली आहे.

2014 च्या निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस अजूनही सावरलेली दिसत नाही असंच चित्र आजच्या निकालाने स्पष्ट झालं आहे. काँग्रेसच्या पराभवाची कारणं जाणून घेण्यासाठी आम्ही विविध तज्ज्ञांशी संवाद साधला.

Image copyright Getty Images

ज्येष्ठ पत्रकार जयदीप हर्डीकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "पंजाब, केरळ, ही राज्यं वगळली तर काँग्रेस ही संस्थाच नेस्तनाबूत झाली आहे असं मला वाटतं. मी मराठवाड्यात फिरत होतो. मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे. तिथे सर्व पक्षांचे कार्यकर्ते होते. मात्र काँग्रेसचा एकही कार्यकर्ता दिसला नाही. आपण राजकारण करत असलो तरी ते नक्की कुणासाठी करतो आहे हे त्यांना अजिबात कळलं नाही. राहुल गांधींमध्ये वैयक्तिक सुधारणा बऱ्यापैकी आहे. ते एकटे जाऊन लढले. काँग्रेस ही एक अजस्त्र संघटना आहे. ती चालवायला लाखो लोकांची गरज असते. उदा. नागपूर शहर काँग्रेस कितीतरी काळापासून कामच करत नाहीये. महाराष्ट्राचीही तीच स्थिती आहे. मग लोक पक्षाकडे येतील कसे? कोण येणार त्यांच्याकडे? केंद्रीय पातळीवरही विरोधक म्हणून ते अतिशय दुबळे ठरले. त्यांनी जनतेसमोर एक विशिष्ट कार्यक्रम ठेवला नाही."

काँग्रेस नेते हुसैन दलवाई म्हणतात, "काँग्रेसपक्षात मधल्या काळात संस्थात्मक पातळीवर दिरंगाई निर्माण झाली होती. तीच तीच घराणी लोकांना आवडत नाहीत. काँग्रेसला जर बळकटी हवी असेल तर राहुल आणि प्रियंका गांधीच ते करू शकतील. अमित शहांनी अनेक जाती पातीच्या लोकांना एकत्र केलं. त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळे त्यांना या गोष्टी आणखी सोप्या झाल्या."

जातीपातीची समीकरणं जुळवण्यात काँग्रेस अपयशी ठरलं हा मुद्दा जयदीप हर्डीकर यांनीही अधोरेखित केला. सर्वदूर फक्त मराठा आणि कुणबी समाजाला प्रतिनिधित्व दिल्यामुळे काँग्रेसचं मोठं नुकसान झाल्याचं हर्डीकर सांगतात.

मोदींचा प्रचार आणि राहुलचा नेतृत्वाचा अभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच काँग्रेसवर हल्ला चढवला होता. एकदा निवडणुका जाहीर झाल्यावर हा प्रचार आणखी धारदार झाला. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार हे समीकरण सातत्याने मोदी मतदारांसमोर मांडत होते. त्यालाही प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस अयशस्वी ठरलं, असं मत ज्येष्ठ पत्रकार सुरेखा टाकसाळ यांनी व्यक्त केलं.

Image copyright PTI

काँग्रेसमध्ये संघटनात्मक अभाव हे काँग्रेसच्या पराभवाचं आणखी एक महत्त्वाचं कारण असल्याचं टाकसाळ नमूद करतात.

राहुल गांधींनी प्रचार खूप केला. मात्र ते मुद्दे मतदारांपर्यंत ते पोहोचवू शकले नाहीत. काँग्रेस आणि राहुलचा प्रचार मोदी आणि रफाल यांच्यापर्यंतच सिमित राहिला. त्यातच ते अडकून पडले. मात्र या मुद्द्यावर काँग्रेसला योग्य पुरावे मांडता आले नाहीत. तसंच सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह निर्माण करणंही काँग्रेसला महागात पडलं, असंही टाकसाळ यांना वाटतं.

अंतर्गत गटबाजी आणि प्रियंका गांधीचा प्रभावहीन प्रचार हेही काँग्रेसच्या पराभवाची इतर महत्त्वाची कारणं असल्याचं सुरेखा टांकसाळ सांगतात.

प्रियंका गांधी यांना उशीरा पक्षकार्यात आणलं. एक ते दीड वर्षापूर्वी काँग्रेसने प्रियंका गांधींना आणायला हवं होतं. त्यामुळे एकूणच पक्षबांधणी करण्याची मोठी गरज असल्याचंही त्या नमूद करतात.

राहुल गांधी काय शिकले?

ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा सांगतात, "काँग्रेस हा आजच्या घडीला सगळ्यांत विस्कळीत पक्ष आहे. काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी राहुल गांधी वगळता कोणीही गंभीर नव्हतं. महाराष्ट्रात शरद पवार प्रचार करत होते. मात्र काँग्रेसचे नेते मला कुठेही फिरताना दिसले नाहीत. जिथं राष्ट्रवादीचे उमेदवार होते तिथं काँग्रेस कार्यकर्ते फारसे फिरकले नाहीत. एखादी व्यक्ती विजय मिळवून देण्यासाठी लढत असते तेव्हा आपल्यात जिंकण्याची काहीतरी जिद्द असायला हवी."

Image copyright Getty Images

"राहुल गांधींना काम करण्यासाठी पंधरा वर्षं मिळाली. त्यातून ते काय शिकले असा प्रश्न निर्माण होतो. काँग्रेसचा जाहीरनामा अत्यंत उत्कृष्ट होता. त्याबदद्ल खरंतर काँग्रेसचं कौतुक करायला हवं, मात्र तो सामान्य लोकांपर्यंत पोचवण्यात अयशस्वी ठरले" भटेवरा पुढे सांगतात.

एखाद्या फलंदाजाने शतकी खेळी करायला जावं आणि गोलंदाजानेही ती खेळी करण्याची पुरेपूर संधी द्यावी, असं भाजपच्या विजयाचं वर्णन जयदीप हर्डीकर करतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)