लोकसभा निकालः वंचित बहुजन आघाडीमुळे या 7 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव?

  • अमृता कदम
  • बीबीसी मराठी

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कामगिरीमध्ये सुधारणा होईल, असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त केला जात होता. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसची अवघी एक जागा निवडून आली. काँग्रेसच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना पराभव पत्करावा लागला.

राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरीही फारशी समाधानकारक झाली नाही. महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा प्रामुख्यानं समोर आला तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीमुळं काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं घटली का?

प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीनं 48 उमेदवारांची यादी जाहीर केल्यापासूनच ही आघाडी म्हणजे भाजपची 'बी' टीम आहे का? वंचित बहुजन आघाडीमुळं मतांची विभागणी होणार का? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. निकालानंतर समोर आलेल्या आकडेवारीतून वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसला का, याचं चित्र स्पष्ट झालं. कदाचित त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीनं 'सेक्युलर' मतं कापली, असा आरोप काँग्रेसनं केला.

राज्यातील 10 ते 12 मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांनी 50 हजारांहून अधिक मतं घेतली आहेत. अकोला मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांनाही अडीच लाखांहून अधिक मतं मिळाली. उस्मानाबाद, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, गडचिरोली या मतदारसंघातही वंचित बहुजन आघाडीची कामगिरी चांगली होती.

औरंगाबादमध्ये AIMIM चे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा अत्यंत अटीतटीच्या लढतीत पराभव केला. इम्तियाज यांनी वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवली नव्हती. पण AIMIM वंचित बहुजन आघाडीचाच घटक असल्यानं इम्तियाज यांचा विजय आघाडीच्या खात्यातच जमा झाला.

काँग्रेसच्या परंपरागत मतांमध्ये शिरकाव

वंचित बहुजन आघाडीच्या या कामगिरीबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना पत्रकार जयदीप हर्डीकर यांनी सांगितलं, "काँग्रेसची गेल्या 30 वर्षांतील स्थिती पाहता त्यांचा 'व्होट शेअर' सातत्यानं कमी होताना दिसत आहे. वेगवेगळ्या राज्यांत, वेगवेगळे पक्ष त्या मतांमध्ये शिरकाव करत आहेत. कारण त्यांचं प्रतिनिधित्व काँग्रेसमध्ये दिसत नव्हतं. आता वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलायचं झाल्यास 10 ते 15 मतदारसंघात त्यांच्यामुळे निश्चितपणे काँग्रेसला फटका बसला आहे. उदाहरणार्थ, अशोक चव्हाण जेवढ्या मतांनी पराभूत झाले, त्यापेक्षा तिप्पट मतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं घेतली. ती मुख्यतः काँग्रेसचीच मतं होती."

प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आल्याचं मतही जयदीप हर्डीकर यांनी नोंदवलं. "महाराष्ट्रात बहुजन समाज पार्टीचं अस्तित्त्वच संपुष्टात आल्यानंतर विदर्भात त्यांचे मतदार काँग्रेसकडे वळले किंवा मराठवाडा-मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीकडे. ही स्थिती पूर्वी रिपब्लिकन पक्षाची होती. आता रिपब्लिकन पक्षच उरला नाही. पण आंबेडकरांचा जुना सोशल इंजीनिअरिंगचा फॉर्म्युला वंचितनं पुन्हा वापरला. ज्यामध्ये दलितच नाही तर इतर जातींनाही सामावून घेतलं गेलं," असं जयदीप हर्डीकर यांनी म्हटलं.

वंचित बहुजन आघाडीच्या या कामगिरीचा आगामी विधानसभा निवडणुकांवर काय परिणाम होईल, याबद्दल बोलताना जयदीप हर्डीकर यांनी म्हटलं, की "लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपला मतदार कुठेकुठे आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांनी त्यांना कौल दिला असेल तर विधानसभेत त्यांच्या मतांची टक्केवारी वाढेल. विधानसभा मतदारसंघ निहाय त्यांची आकडेवारी पाहावी लागेल, पण काँग्रेस-राष्ट्रवादीला त्यांचं अस्तित्व आता नाकारता येणार नाही."

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये जर नेतृत्व बदल झाला तर काँग्रेसला एक असा सर्वसमावेशक नेता लागेल जो मृदुभाषी असेल, प्रकाश आंबेडकरांसारख्या नेत्यांशी बोलणी करून आपला आणि त्यांचाही फायदा कसा होईल हे पाहणारा असेल.

'वंचितनं पक्का केला भाजपचा विजय'

"भीमा कोरेगावच्या प्रकारानंतर प्रकाश आंबेडकर यांचं नेतृत्व खऱ्या अर्थाने समोर आलं. प्रकाश आंबेडकर आणि MIM चे असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जिंकून आले नाहीत. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपारिक मतं फोडण्यात वंचित आघाडीने यश मिळवलं. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचा पराभव होण्यात वंचित बहुजन आघाडीची भूमिका कळीची ठरली. एकाप्रकारे भाजपने महाराष्ट्रात मिळवलेल्या विजयात वंचित बहुजन आघाडीची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. तांत्रिकदृष्ट्या सर्वस्वी भिन्न विचारसरणी असलेल्या वंचित आघाडीने भाजपचा विजय पक्का केला," असं विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी आपल्या कार्यक्रमादरम्यान केलं.

वंचित बहुजन आघाडी ही भाजपची 'बी टीम'?

वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्रात सर्वच जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीनं वारंवार हा आक्षेप घेतला होता. वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या दिशा शेख यांनी मात्र हा आक्षेप फेटाळून लावला. बीबीसी मराठीशी बोलताना दिशा यांनी म्हटलं, "काँग्रेसच्या राज्यात फक्त दोन जागा आहेत. त्यांच्याबरोबर जाऊन काय मिळणार होतं?

आम्ही 48 जागा लढवून वंचित आणि बहुजनांना राजकीय प्रवाहात सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसशी युती न करण्याचा अजिबात पश्चाताप नाही. ते कामाचेही नाहीत. त्यांची भाजपसह छुपी युती आहे. आमच्यामुळे भाजपला मदत झालेली नाही. अन्य राज्यात काँग्रेस लढत नाहीये का? उत्तर प्रदेश, दिल्लीमध्ये स्थानिक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते. तिथे कोण 'बी टीम'आहे? गुजरातमध्ये काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी लढत होती. तेव्हा मतांचं विभाजन नाही झालं का? आमच्यावरच आरोप का?"

राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनीही असाच मुद्दा मांडला. "महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीमुळं काही मतदारसंघात काँग्रेसला नुकसान झालं हे खरंच. पण देशभरात काँग्रेसला जो फटका बसला आहे, त्याचं खापर काँग्रेस कोणावर फोडलं. राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता होती. पण तरीही तिथं त्यांचा दारूण पराभव झाला. याचं स्पष्टीकरण काँग्रेस कसं करणार?" असं अभय देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.

सात मतदारसंघात दुसऱ्या नंबरवर

नांदेड, सांगली, सोलापूर, परभणी, गडचिरोली-चिमूर, बुलडाणा, हातकणंगले या आठ मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहून पराभूत झाले आहेत. या मतदारसंघांमध्ये आघाडीचा उमेदवार जितक्या मतांनी पराभूत झाली त्याहून अधिक मतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)