एव्हरेस्ट शिखर उतरताना 3 भारतीयांचा मृत्यू, महाराष्ट्रातल्या दोघांचा समावेश

निहाल बागवान Image copyright BBC/HalimaKureshi
प्रतिमा मथळा निहाल बागवान

निहाल बागवान, अंजली कुलकर्णी, कल्पना दास या गिर्यारोहकांचा एवरेस्ट शिखर चढाई पूर्ण करून परतताना मृत्य झालाय. ट्रॅफिक जॅममुळे प्रचंड थकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं पीक प्रमोशन कंपनीने सांगितलं आहे.

निहाल बागवान अकलूज तर अंजली कुलकर्णी मुंबईच्या आहेत. कल्पना दास ओडिशाच असल्याचं कळतंय.

निहाल बागवान 12 तासांपेक्षा जास्त वेळ ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याचं एएफपी वृत्तसंस्थेला स्थानिक ऑपरेटर केशव पौडेल यांनी सांगितलं आहे.

"गुरुवारी रात्री अकरा वाजता निहालचा मृत्यू झाला. खाली येताना तो पूर्ण डीहायड्रेट झाला होता. पुढचे दोन दिवस हातात आहेत. निहालच्या शेरपाने त्याला शेवटपर्यंत साथ दिली," असं गिरिप्रेमी संस्थेचे उमेश झिरपे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. उमेश झिरपे सध्या नेपाळमध्ये आहेत.

स्वागताची तयारी सुरू होती पण...

निहालने एवरेस्ट शिखर सर केल्याचं कळलं तेव्हापासून त्याच्या स्वागताची तयारी अकलुजमध्ये सुरू झाली होती. पण आता सगळं वातावरण सुन्न आहे. निहालच्या आईवडिलांना अजूनही विश्वास आहे की तो परत येईल.

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, " निहाल 2017मध्ये एव्हरेस्ट शिखर चढाईला गेला होता. तिबेटकडून चढाई करत असताना अवघ्या 400मीटर अंतरावरून खराब हवामानामुळे त्याला परत परतावं लागलं होत, यावेळेस त्याने त्याचं स्वप्न पूर्ण केलं. मात्र आता तो परत येणार नाही याचं अतिशय दुखः आहे."

प्रतिमा मथळा अंजली कुलकर्णी आणि शरद कुलकर्णी

"निहाल बागवानचं एवरेस्ट शिखर पादाक्रांत करण्याचं सप्न होतं, 23 तारखेला त्याचं स्वप्न पूर्ण झालं, परतत असताना मात्र ट्रॅफिक जॅम या ह्यूमन एररमुळे प्रचंड दमल्याने त्याचा मृत्यू झाला," आनंद बनसोडे यांनी सांगितलं.

निहाल अतिशय गरीब परिस्थितीत एवरेस्ट शिखर चढाईचं स्वप्न बाळगून त्यासाठी प्रचंड मेहनत करत होता. त्याच्या वडिलांचं पानाचं दुकान आहे. निहालला एक भाऊ आणि आई वडिल आहेत. 16 लाख कर्ज काढून तो मोहिमेला गेल्याचं बनसोडे यांनी सांगितलं.

निहाल बागवानने अकलूज मधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होत. आता तो फिजिकल सायन्समध्ये मास्टर्स करत होता.

ट्रॅफिक जॅम म्हणजे काय?

एवरेस्ट शिखराची चढाई पूर्ण केल्यानंतर परतताना असलेला मार्ग अतिशय चिंचोळा असून एकावेळी एकजण वर किंवा खाली जाऊ शकतो.

यावर्षी 21 मे ते 24 मे हा एवरेस्ट शिखर चढाईसाठी ओपन विंडो म्हणजेच उत्तम वातावरण असलेला कालावधी होता.

या काळात शिखर चढाईसाठी नेपाळ सरकारने तब्बल 387 जणांना लायसन्स दिले होते. प्रत्येक व्यक्ती बरोबर एक शेर्पा असतो म्हणजेच दुप्पट लोक शिखरावर जातात.

एका दिवसात 200 जण चढाई करतात. त्यामुळे चिंचोळ्या रस्त्यावर चढाई करणाऱ्यांची आणि उतरणाऱ्यांची गर्दी होते. वरचा खाली येईपर्यंत आणि खालचा वरच्या दिशेला जाईपर्यंत वाट पहावी लागते.

यामुळे दमछाक होऊन अनेक गिर्यारोहकांना प्राण गमवावे लागतात. कारण थोडस अंतर तरी चुकलं तरी खोल दऱ्या असल्याचं आनंद बनसोडे यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीत सांगितलं.

त्यामुळे प्रचंड दमछाक होते. त्यादिवशी 200जणांची चढाई असल्याने निहालला 12 तास थांबावं लागलं. पण कॅम्प 4मध्ये पोहोचल्यानंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मुळात त्या भागात ऑक्सिजनची कमतरता असते. त्यात एकाच वेळी जास्त लोक आल्यानं ती कमतरता जास्त जाणवते, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

एव्हरेस्ट चढण्याच्या एका परवानगीसाठी किंवा लायसन्ससाठी सुमारे 11 हजार डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 7 लाख 66 हजार नेपाळ सरकारला मिळतात.

अतिशय कमी कालावधी मध्ये गिर्यारोहकांची संख्या जास्त असल्याने शिखराच्या जवळ प्रचंड गर्दी होऊन मृत्यू होत आहेत.

निहाल बागवानचे काका अमीन बागवान यांनी सांगितलं, " गेल्या शुक्रवारी बोलणं झालं होतं समीटला निघालो असल्याचं त्यान कळवलं होत. त्याच स्वप्न होतं नावासमोर एवरेस्टवीर लावण्याचं आणि भारताचा तिरंगा एवरेस्ट शिखरावर फडकवण्याचं. त्याने त्याचं स्वप्न पूर्ण केलं." हे सांगताना त्यांचा आवाज कातरला जात होता.

निहालबरोबरच अंजली कुलकर्णी आणि कल्पना दास यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. या तिघांचं पार्थिव 27 तारखेला काठमांडू आणि तिथून भारतात आणलं जाणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)