मराठा आरक्षण कायदा करा नाहीतर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर जाणार - हर्षवर्धन जाधव #5मोठ्याबातम्या

Image copyright Getty Images

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत:

1) ...तर मराठा समाज वंचित आघाडीसोबत जाणार: हर्षवर्धन जाधव

मराठा आरक्षणाचा कायदा केंद्रात पास केला नाहीतर मराठा समाज विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी सोबत जाईल, असं मत औरंगाबाद लोकसभेतील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केलं आहे.

ABP माझाशी बोलताना त्यांनी ही बातमी दिली आहे.

"मराठा आरक्षणावरून वंचित आघाडी सोबत जावं, ही मागणी मला तळागाळातून येत आहे. यासाठी भाजप-शिवसेना सरकारने जर एका महिन्यात यावर ठोस निर्णय घेतला नाही तर लवकरच प्रकाश आंबेडकर यांना भेटणार आहे. मला औरंगाबाद लोकसभेत दोन लाख 83 हजार मतं ही मराठा समाजातील मिळाली आहेत," असंही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या आमदार हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी अपक्ष निवडणूक लढवत खैरेंना थेट आव्हान दिलं. 'ट्रॅक्टर' ही निशाणी घेऊन मैदानात उतरलेल्या जाधव यांनी 2 लाख 83 हजारांपेक्षा जास्त मतं घेतली. चंद्रकांत खैरेंना याचाच फटका बसला आणि त्यांचा पराभव झाला, असं सांगितलं जात आहे.

2) राज्यात फक्त 14 टक्के पाणीसाठा

राज्यातल्या अनेक जिल्ह्यांत गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निम्माच पाणीसाठा असल्याची माहिती राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

राज्यातल्या विहीरी आणि धरणांत मागील वर्षी मे महिन्यात 24.80 टक्के पाणीसाठा होता, तर यावर्षी फक्त 13.76 टक्के पाणीसाठा उरला आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रतिकात्मक

यंदा कोकण विभागात 34.53 टक्के, अमरावतीत 20.90 टक्के, औरंगाबादमध्ये 2.93 टक्के, नागपूरमध्ये 8.93 टक्के, नाशिकमध्ये 13.49 टक्के आणि पुणे विभागात 13.80 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचं राज्य सराकारनं उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

सध्या राज्यात 5,000 हून अधिक टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

3) बिहारमध्ये सगळ्यात जास्त 'नोटा'चा वापर

17व्या लोकसभा निवडणुकित बिहारमधल्या लोकांनी सगळ्यात जास्त नोटा' बटणाचा वापर केला आहे. या राज्यात 8 लाख 17 हजार मतदारांनी नोटाचं बटण दाबलं आहे. हिंदुस्ताननं ही बातमी दिली आहे.

महाराष्टातल्या 48 मतदारसंघात 5 लाख लोकांनी नोटाचा पर्याय निवडला आहे. राजस्थानमध्ये 3.27 लाख लोकांनी नोटाचं बटण दाबलं. राजस्थानमध्ये कम्युनिस्ट पक्ष आणि बसपच्या उमेदवारांना मिळालेल्या उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा नोटाला अधिक मतदान आहे.

या राज्यात 25 मतदारसंघात पडलेल्या मतांपैकी नोटाला मिळालेल्या मतांचं प्रमाण 1.01 टक्के आहे.

राजधानीत 45 हजार लोकांनी नोटा बटण दाबलं आहे. तर 2014मध्ये 6,200 हजार लोकांनी नोटाचा वापरलं आहे.

4) लोकसभेतल्या परावभवानंतर काँग्रेसची आज दिल्लीत बैठक

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसनं आज विचारमंथनासाठी बैठक बोलावली आहे. लोकसत्तानंही बातमी दिली आहे.

राहुल गांधी यांनी वायनाडमधून दणदणीत विजय मिळवला असला तरी परंपरागत अमेठी मतदारसंघ त्यांना राखता आला नाही. या वेळी लोकसभा निवडणुकीत 19 राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या पक्षसंघटनेची वाताहत झालेली आहे. सहा महिन्यांपूर्वी छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकारे स्थापन झाली असली तरी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पक्षाला काठावर बहुमत मिळालेले आहे.

Image copyright CONGRESS/TWITTER

2017मध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पराभव पत्करावा लागला होता. पक्षाध्यक्ष या नात्याने राहुल यांचे नेतृत्व सातत्याने अपयशी ठरत असल्याने पक्षासमोर संघटनात्मक पेच निर्माण झाला आहे.

उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राजबब्बर, अमेठीचे जिल्हाप्रमुख तसेच कर्नाटक प्रचार व्यवस्थापक, ओडिशाचे प्रदेशाध्यक्ष यांनी राजीनामे दिले आहेत.

या सर्व मुद्द्यांवर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाऊ शकते, असंही या बातमीत म्हटलं आहे.

5) पेट्रोलचे दर वाढू लागले

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. चार महानगरांसह अन्य शहरांत शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलीटर अनुक्रमे 14 आणि 17 पैशांनी वाढले.

यामुळे मुंबईत पेट्रोल 77 रुपये लिटर झाले आहेत तर एक लिटर डिझेलसाठी आता 69.63 रुपये द्यावे लागणार आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

नवी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 71.39 रुपये तर डिझेलचा दर 66.45 रुपये नोंदवण्यात आला.

Image copyright Getty Images

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी इंधन कंपन्यांनी इंधन दरवाढ टाळली होती. उलटपक्षी, गेल्या 10 मेनंतर पेट्रोलचे दर 1.80 रुपयांनी तर डिझेलचे दर 63 पैशांनी कमी झाले होते.

या दरांनी आता विरुद्ध दिशेने प्रवास सुरू केल्याचे दिसत आहे. निवडणुकीचा अखेरचा टप्पा संपल्यानंतर पेट्रोलच्या दरात एकूण 22 तर डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ झाली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)