राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीने फेटाळला

राहुल गांधी Image copyright Getty Images

2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात राहुल गांधींनी राजीनाम्याची तयारी दर्शविली. मात्र कार्यकारिणीच्या सदस्यांनी एकमुखाने या प्रस्तावाला नकार दिल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी दिल्लीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देणार अशी चर्चा सुरू होती. मात्र कार्यकारिणीने सध्याच्या कठीण काळात त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचं सांगून राहुल गांधींच्या राजीनाम्याचा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला.

"देशाच्या जनतने दिलेला निकाल काँग्रेस स्वीकारत आहे. सतराव्या लोकसभेत काँग्रेस एका महत्त्वाच्या विरोधी पक्षाचील भूमिका निभावेल आणि सरकारला वेळोवेळी प्रश्न विचारेल." असं ते पुढे म्हणाले.

काँग्रेसच्या कार्यकारिणीने सर्व उमेदवारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानणारा प्रस्ताव मंजूर केला. अत्यंत आव्हानात्मक स्थितीत कार्यकर्त्यांनी प्रचार केला त्याबद्दल सुरजेवाला यांनी त्यांचे आणि मित्रपक्षांचे आभार मानले. येत्या काळात पुढे जाऊन लढण्याचा आग्रह कार्यकारिणीने धरला.

प्रचारात झालेल्या चुका आम्ही स्वीकारत आहोत. तसंच पक्षसंघटनेत आमुलाग्र बदल करण्याची गरज आहे असा उल्लेख कार्यकारिणीने संमत केलेल्या प्रस्तावात असल्याचं सुरजेवाला यांनी सांगितला.

सामूहिक राजीनामे द्यावेत

दरम्यान देशातील सर्व काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत असं मत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं.

Image copyright Getty Images

काँग्रेसच्या पराभवाला फक्त राहुल गांधी जबाबदार नाहीत. निवडणुका हे टीमवर्क आहे. त्यात एखाद्याने काम केलं नाही तर त्याचा परिणाम होतोच. त्यामुळे आता पक्षात बदल करण्याची मोकळीक पक्षाध्याक्षांना द्यावी असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं. राजीनाम्याची सुरुवात माझ्याकडून करायला हरकत नाही असंही ते पुढे म्हणाले.

आम्ही कालही राहुल गांधींचे अनुयायी होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू असं विधान अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेला संबोधताना केलं.

इराणवर निर्बंध घातल्यानंतर तेलाच्या वाढत्या किंमती, वाढत्या महागाईचा उल्लेखही त्यांनी केला. सुरजेवाला म्हणाले, "बँकांची स्थिती गंभीर आहे. NPA चा आकडा अनियंत्रित पद्धतीने वाढून 12 लाख कोटी झाला आहे. त्यामुळे बँकांची स्थिती धोक्यात आहे. रोजगाराची समस्या सुटत नाहीये. त्यामुळे युवकांची स्थिती गंभीर आहे."

सामाजिक सद्भाव आणि बंधुभावावर आक्रमण झाल्याचं त्यांनी सांगितलं. भाजप सरकारने या समस्यांवर तात्काळ तोडगा काढायला हवा असं ते म्हणाले. 

या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस सकारात्मक भूमिका निभावेल असं ते म्हणाले. भाजप या समस्यांना प्राधान्य देईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.  

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)