नरेंद्र मोदी राष्ट्रपतींना भेटले, सत्तास्थापनेचा दावा

मोदी आणि कोविंद Image copyright Twitter

संसदीय दलाचे नेते नरेंद्र मोदी हे एनडीएच्या शिष्टमंडळासोबत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. मोदींनी सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. त्यावेळी ते म्हणाले या निवडणुकीमध्ये प्रो-इंकंबन्सी वेव्हमुळे आम्ही पुन्हा निवडून आलो. आम्ही केलेलं काम हे लोकांच्या पसंतीस उतरलं त्यामुळे त्यांनी आम्हाला पुन्हा निवडून दिलं.

बऱ्याचदा सरकारविरोधात अॅंटी-इंकंबन्सी असते त्यामुळे ते निवडून येत नाहीत. पण आमचं काम लोकांना आवडलं आणि त्यांनी आम्हाला निवडून दिलं. आमच्याकडून काही चुका झाल्याही असतील पण आम्ही घेतलेले परिश्रम लोकांच्या पसंतीस उतरले. हा देश परिश्रमाची पूजा करतो. त्यांनी आमचे परिश्रम पाहिले. जनतेनं नीर-क्षीर विवेकाने आम्हाला निवडून दिलं.

सतराव्या लोकसभेत एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाली. संसद भवनात सुरू असलेल्या एनडीएच्या खासदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला होता. आज संध्याकाळी सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील.

या प्रस्तावाला एनडीच्या घटक पक्षांच्या अध्यक्षांनी अनुमोदन दिलं. तत्पूर्वी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मोदींच्या नेतेपदाचा प्रस्ताव मांडला. त्याला राजनाथ सिंह आणि गडकरी यांनी अनुमोदन दिलं.

मोदींची जादू

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा कसे पंतप्रधान बनले याविषयीचं बीबीसीचे प्रतिनिधी संजॉय मुजूमदार यांचं विश्लेषण

भाजपचा दणदणीत विजय हा फक्त आणि फक्त मोदींमुळे झाला. नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधींनंतरचे सगळ्यांत शक्तिशाली पंतप्रधान बनले आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

अनेक कमकुवत बाजू असताना, विशेषतः अनेक उमेदवारांनी मागच्या निवडणुकीत दिलेली वचनं पूर्ण केली नसताना, मोदी थेट मतदारांशी संवाद साधण्यात यशस्वी ठरले.

Image copyright Twitter

याचाच अर्थ असा की विरोधी पक्षांनी जात, धर्म, वर्ग, शहरी, ग्रामीण या मुद्द्यांवर विभागलेल्या जनतेला एकत्र करण्याचा प्रयत्न केला असला तरी मोदींच्या करिष्मापुढे तो फिका पडला.

नरेंद्र मोदींनी हे सिद्ध केलं की हिंदुत्वाचा मुद्दा राष्ट्रवादाच्या मुद्द्याला जोडला की रोजगार, आर्थिक प्रगती, शेतीसंकट असे महत्त्वाचे मुद्दे बाजूला सारता येतात.

विरोधी पक्षांचा धुव्वा

विरोधी पक्षांच्या सुमार कामगिरीला राहुल गांधीच जबाबदार आहेत असं चित्र रंगवलं जात आहे आणि काही अशी त्यात तथ्यही आहे.

नरेंद्र मोदींवर हल्ला करण्यासाठी त्यांनी दिलेली 'चौकीदार चोर है' ही घोषणा त्यांच्यावरच उलटली. प्रादेशिक पक्षांशी आघड्या न करण्याचं धोरण किंवा त्यात आलेलं अपयश, उमेदवारांची उशीराने केलेली निवड आणि प्रियंका गांधींना शेवटच्या मिनिटाला प्रचारात आणण्याचा निर्णय यामुळे त्यांच्या अपयशावर शिक्कामोर्तब झालं.

Image copyright Reuters

पण तरीही भाजपने फक्त राहुल गांधीचं नाही तर प्रत्येक मोठ्या विरोधी पक्षनेत्याला धोबीपछाड दिली हे सत्य नाकारून चालणार नाही.

अखिलेश यादव आणि मायावती यांनी एकत्र येत उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडी स्थापन केली. सुरुवातीला असं वाटलं होतं की महागठबंधन भाजपला चांगली लढत देईल, पण तसं काही होताना दिसलं नाही.

तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदींविरुद्ध युद्ध पुकारलं होतं, पण त्यांना त्यांच्याच अंगणात, पश्चिम बंगालमध्ये मात मिळाली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)