नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: सनातनशी संबंधित वकील संजीव पुनाळेकर यांना अटक

नरेंद्र दाभोलकर आणि संजीव पुनाळेकर

विवेकवादी कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांना अटक करण्यात आल्याची माहिती सीबीआयचे प्रवक्ते नितीन वाकनकर यांनी दिली आहे.

पुनाळेकर यांच्याबरोबरच विक्रम भावेंनाही अटक करण्यात आल्याचंही वाकनकर यांनी सांगितलं. पुनाळेकर यांच्यावर नेमके कोणते आरोप आहेत हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. "सध्या मी फक्त इतकंच कंफर्म करू शकतो की पुनाळेकर आणि भावे यांना अटक झाली आहे. त्या व्यतिरिक्त मी काही सांगू शकत नाही," असं वाकनकर यांनी सांगितलं.

पुनाळेकर आणि भावे यांच्या अटकेचा सनातन संस्थेनी निषेध केला आहे.

विक्रम विनय भावे हे गडकरी रंगायतन स्फोटातले दोषी आहेत. सध्या ते जामिनावर बाहेर होते. विक्रम भावे हे हिंजू विधिज्ञ परिषदेचं काम करतात. ते परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत अशी माहिती सनातनच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

कोण आहेत पुनाळेकर ?

संजीव पुनाळेकर हे हिंदू विधीज्ञ परिषदेचे सचिव आहेत. पुनाळेकर यांनी सनातन संस्थेसंदर्भातल्या अनेक खटल्यांमध्ये सनातनची बाजू कोर्टात मांडली आहे. पुनाळेकर नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे या हत्या प्रकरणातील आरोपींची बाजू कोर्टात मांडली आहे.

सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी या अटकेचा निषेध केला आहे. पुनाळेकर यांनी अनेक जनहितयाचिका दाखल केल्या. त्यांनी हिंदुत्वासाठी खूप कार्य केलं आहे. सनातन त्यांच्या पाठीशी उभं आहे, हिंदू समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे असं मत राजहंस यांनी व्यक्त केलं.

त्यांना झालेली अटक ही त्यांच्याविरुद्ध रचलं गेलेलं षड्यंत्र आहे असं राजहंस यांनी सांगितलं. 20 ऑगस्ट 2013 रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि विवेकवादी लेखक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

संजीव पुनाळेकर यांनी मालेगाव बाँबस्फोटातील आरोपी आणि भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची बाजू कोर्टात मांडली होती. पुनाळेकरांनी 'भगवा आतंकवाद' अशी कोणतीही गोष्ट नाही असं सिद्ध केलं होतं. भगव्या आतंकवादाचा खोटेपणा त्यांनी सिद्ध केला होता आज त्यांनाच अटक झाली हे धक्कादायक आहे असं राजहंस यांनी म्हटलं.

अवैध शस्त्रसाठा सापडल्या प्रकरणी नालासोपारा येथून सनातनशी संबंधित कार्यकर्ता वैभव राऊत यांना अटक झाली होती. त्यांची बाजूही पुनाळेकर यांनी मांडली होती.

दाभोलकर हत्या प्रकरणाचा आजवरचा तपास

डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर जेव्हा या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस आणि महाराष्ट्र ATS मिळून करत होते. पण त्यात फार काही निष्पन्न होताना दिसलं नाही आणि मे 2014 मध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्यात आला. एका याचिकेद्वारे उच्च न्यायालय या तपासावर लक्ष ठेवून आहे.

Image copyright facebook

CBIनं त्यांच्या तपासाअंतर्गत सनातन संस्थेशी संबंधित वीरेंद्र तावडे याला अटक केली होती. सोबतच सारंग अकोलकर आणि विनय पवार यांचाही संशयित मारेकरी म्हणून शोध सुरू होताच.

दरम्यान, 'सनातन संस्थे'ने CBI च्या या तपासावर याआधी आक्षेप नोंदवला आहे.

"हा संपूर्ण तपास भरकटलेला आहे. CBI कडे कोणतेही पुरावे नाहीत. खरे मारेकरी पकडले जात नाहीत म्हणून 'सनातन'ला लक्ष्य केलं जात आहे. खटला वेगानं चालू दिला जात नाही आणि दिवस काढले जात आहेत," असे 'सनातन संस्थे'चे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी बीबीसीला यापूर्वी सांगितलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)