लोकसभा निवडणूक 2019: महिलांना तिकीट दिल्याने राजकीय पक्षांना फायदा होतो का?

महिला खासदार Image copyright Getty Images

लोकसभा निवडणुकीचे निकाल आता जाहीर झाले आहेत. महिलांना तिकीट दिल्यामुळे राजकीय पक्षांना फायदा होत असल्याचं या निकालातून दिसून आलं आहे.

याचं मुख्य कारण म्हणजे ज्या दोन पक्षांनी एक तृतीयांशपेक्षा जास्त तिकिटं महिलांना दिली आहेत त्यांना मोठे यश मिळाले आहे.

ममता बॅनर्जी यांनी यावेळेस एकूण तिकिटांपैकी 41 टक्के तिकिटे महिलांना दिली होती. तृणमूलच्या तिकिटावर 17 पैकी 9 महिलांना यश मिळाले आहे.

तर नवीन पटनाईक यांच्या बीजू जनता दलाने 7 महिला उमेदवारांना तिकीट दिले होते. त्यातील 71 टक्के म्हणजे 5 महिला उमेदावाराचं विजय झाला आहे.

बिजू जनता दल 7 पुरुष आणि 5 महिला खासदार संसदेत पाठवत आहे. कदाचित असं संतुलन इतर कोणत्याच पक्षात दिसून आलेलं नाही.

राजकारणात महिलांना अधिकाधिक स्थान मिळावे यासाठी काम करणाऱ्या शक्ती संस्थेशी संबंधित निशा अग्रवाल यांच्या मते, "या निवडणुकीत महिलांचा झालेला विजय अनेक धारणांना छेद देईल. महिला कमकुवत उमेदवार असतात अशी सामान्य धारणा असते. त्याला यामुळे तडा जाईल."

निशा म्हणतात, "महिला जिंकून येत नाहीत, त्यांना तिकीट देण्यात जोखीम आहे या भ्रामक कल्पनेला निवडणुकीमुळे आव्हान मिळेल. पण त्यासाठी ममता बॅनर्जी आणि नवीन पटनाईक यांच्यासारख्या नेत्यांची गरज आहे."

Image copyright Getty Images

या निवडणुकीत निवडून येऊन संसदेत पोहोचणाऱ्या बिजू जनता दलाच्या महिला खासदारांमध्ये प्रमिला बिसोईसुद्धा आहेत. गेली 20 वर्षे स्वयंरोजगाराचा गट बनवून महिलांसाठी त्या काम करत आहेत.

त्याशिवाय त्यांच्यामध्ये एक डॉक्टर, एक सनदी नोकरशाह आणि एक वैज्ञानिक संशोधकही आहे.

ममता बॅनर्जी यांच्या महिला उमेदवारांनध्ये नुसरत जहाँ, मिमी चक्रवर्तीसारख्या तरूण अभिनेत्री होत्या. त्याबरोबरच शताब्दी रॉय सारख्या तीनवेळा निवडून येणाऱ्या अभिनेत्रीचाही समावेश आहे.

काकोली घोष आणि माला रॉय यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांसह महुआ मोइत्रासारख्या तरूण महिला आहेत. काँग्रेसमधून तृणमूलमध्ये गेल्यावर त्या आमदार झाल्या. आता त्या प्रथमच खासदार होत आहेत.

ममता बॅनर्जी यांच्या आयुष्यावर 'दीदी: द अनटोल्ड ममता बॅनर्जी' हे पुस्तक लिहिणाऱ्या शुतपा पॉल म्हणतात, "महिलांनी राजकारणात यावे यासाठी ममता निश्चित प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या महिलांना तिकीटही देत आहेत. यावेळेस त्यांना माला रॉय आणि माजी बँकर महुआ मोईत्रा सारख्या महिलांनाही तिकीट दिले आहे."

इतर पक्षांचे स्थान

देशातील सर्वांत मोठ्या दोन राष्ट्रीय पक्षांनी म्हणजे भाजपा आणि राष्ट्रवादीने 50 हून अधिक महिला उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र पुरुष उमेदवारांच्या तुलनेत ही संख्या फारच कमी होती.

भाजपने 12 टक्के तिकिटं महिलांना आणि काँग्रेसनं 13 टक्के तिकिटं महिलांना दिली होती.

भाजपच्या एकूण 55 महिला उमेदवारांपैकी 41 उमेदवारांचा विजय झाला. म्हणजे त्याचे प्रमाण 74 टक्के इतके होते. तर काँग्रेसने 52 महिलांना तिकिटं दिली त्यातील 6 उमेदवारांना यश आले. काँग्रेसच्या महिला उमेदवारांचं विजयी होण्याचं प्रमाण 11 टक्के इतकं आहे.

दिग्गज महिला नेत्यांमध्ये सोनिया गांधी, कॅप्टन अमरिंदर सिंह यांची पत्नी परिणित कौर, झारखंडच्या माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या पत्नी गीता कोडा यांचा विजय झाला.

Image copyright Getty Images

रम्या हरिदास या खासदारांच्या आई शिवणकाम करतात तर वडील हमाल आहेत. डाव्या पक्षाच्या प्रसिद्ध नेत्याला हरवून त्या केरळमधून जिंकल्या आहेत.

त्याचप्रमाणे एस जोतिमणी यांचे वडील शेतकरी आहेत. त्या वयाच्या 22 व्या वर्षी युवक काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या होत्या.

महाराष्ट्रातून विजयी झालेल्या महिला उमेदवार राजकीय घराण्यांशी संबंधित आहेत. प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम, एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे, गोपीनाथ मुंडे यांची मुलगी प्रीतम मुंडे यांचा विजय झाला आहे.

भाजपाने सिने अभिनेत्री हेमा मालिनी, किरण खेर, लॉकेट चॅटर्जी यांच्यासारख्या उमेदवारांना तिकीट दिले. याशिवाय प्रज्ञा ठाकूर आणि निरंजन ज्योती यांनाही तिकीट भाजपनं तिकीट दिले.

भाजपाच्या स्टार उमेदवार स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात अमेठीत पराभूत केले. आपण राजकारणाच्या पटावरील एक महत्वाच्या खेळाडू आहोत हे त्यांनी दाखवून दिले.

घराणेशाहीचे राजकारण

सुतपा पॉल म्हणतात, "उमेदवारी मिळणं हे चांगलं असलं तरी भारतात उमेदवारी मिळणं राजकारणात थोडं अवघड आहे. हीच गोष्ट महिला उमेदवारांनाही लागू होते."

त्या सांगतात, "घराणेशाहीचे राजकारण राष्ट्रीय असो वा प्रादेशिक सर्व पक्षांमध्ये पसरले आहे. आम आदमी पार्टीच्या अतिशी जिंकू शकल्या नाहीत कारण विजयी होण्यासाठी इतरही घटक कारणीभूत ठरतात."

तामिळनाडूच्या द्रमुक पक्षाने दोन महिलांना तिकीट दिले आणि त्या दोघींचाही विजय झाला. या दोन्ही महिला द्रमुकच्या दोन नेत्यांच्या मुली आहेत. कनिमोळी करुणानिधी यांची कन्या असून सुमती या द्रमुकच्या आणखी एका नेत्याच्या कन्या आहेत.

Image copyright Getty Images

आणखी उदाहरणं सांगायची झाल्यास बिहारमधून निवडून आलेल्या लोक जनशक्ती पार्टीच्या वीणा देवी, जदयूचे आमदार दिनेश सिंह यांच्या पत्नी, जदयूच्या माजी आमदार जगमातो देवी यांच्या स्नुषा कविता, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्या पत्नी हरसिम्रत कौर, पीए संगमा यांची मुलगी अगाथा संगमा यांचं देता येतील.

या महिलांना आपल्या राजकीय प्रवासात त्यांच्या प्रभावशाली कुटुंबांचा फायदा झाला आहे.

परंतु काही महिला स्वबळावरही यशस्वी होतात.

आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसने चार महिला उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि त्यांना यश मिळाले. त्यातील एक उमेदवार गोड्डीटी माधवी यांचे वडील राजकीय नेता आहेत.

इतर उमेदवारांमध्ये एक ज्येष्ठ राजकीय नेत्या, आणि माजी राज्यसभा सदस्य वंगा गीता यांचा समावेश आहे. त्याबरोबर पेशाने डॉक्टर असणाऱ्या अनकपल्ली सत्यवतीही आहेत.

Image copyright NARINDER NANU

महाराष्ट्रात निवडून गेलेल्या अपक्ष उमेदवार नवनीत कौर मूळच्या पंजाबच्या आहेत.

महिलांच्या बाबतीत जगभरात भारताची स्थिती काय आहे?

पीआरएस इंडियाच्या अहवालानुसार आताच्या लोकसभेत महिलांची संख्या 78 आहे. आतापर्यंतची ही सर्वांत जास्त संख्या आहे. महिला खासदारांच्या संख्येत वाढ झाली आहे हे निश्चित मात्र ही संख्या अत्यंत हळूहळू वाढत आहे.

पहिल्या लोकसभेत 24 महिला होत्या. एकूण उमेदवारांपैकी ते प्रमाण 5 टक्के होते. 16 व्या लोकसभेत 66 महिला खासदार होत्या. त्यावेळेस महिला खासदारांचे प्रमाण 12 टक्के होते. आता येणाऱ्या लोकसभेत हे प्रमाण 14 टक्के झाले आहे.

Image copyright Getty Images

मात्र काही देशांच्या तुलनेत हे प्रमाण अद्यापही कमी आहे. रवांडामध्ये ही संख्या 62 टक्के आहे, दक्षिण आफ्रिकेत हे प्रमाण 43 टक्के, यूकेमध्ये 32 टक्के, अमेरिकेत 24 टक्के, बांगलादेशात 21 टक्के आहे.

एकट्या भाजपला 303 जागा मिळाल्या आहेत तर एनडीएला 350 जागा मिळाल्या आहेत. निशा सांगतात, "महिलांचे प्रश्नांवर राजकीय पक्ष कटिबद्ध दिसून येत नाहीत. आता या मोठ्या जनादेशानंतर भाजप महिला आरक्षण विधेयक आणेल का हे पाहायला हवे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)