नरेंद्र मोदी: अल्पसंख्याकांचा विश्वास संपादन करणं आमच्या सरकारचं लक्ष्य #5मोठ्याबातम्या

मोदी लोकसभेत बोलताना Image copyright Twitter / @NarendraModi

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :

1) मुस्लिमांचा विश्वास संपादन करणं आमचं लक्ष्य - नरेंद्र मोदी

"गरीबांप्रमाणेच अल्पसंख्यांकाचाही छळ झाला आहे. एक काल्पनिक भय निर्माण करून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. मतपेटीच्या राजकारणासाठी त्यांचा वापर झाला. अल्पसंख्यांकांचा विश्वास संपादन करणं, हेच आता लक्ष्य आहे," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये म्हणाले.

लोकसत्तासह इतर वृत्तसंस्थांनी ही बातमी दिली आहे.

"अल्पसंख्याकांच्या मतांपेक्षा त्यांच्या शिक्षणाची, जीवनमान सुधारण्याची चिंता केली गेली असती तर त्यांचं भलं झालं असतं. आपल्याला हा छळ संपवायचा आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

सुराज्य आणि गरीबी मुक्तीसाठी लढायचं आहे. मत देणारे आणि विरोध करणारेही आपलेच आहेत. विकास यात्रेत कुणीही मागे सुटणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असं मोदी म्हणाले.

"2014 ते 2019 दरम्यान आम्ही गरीबांसाठी सरकार चालवलं. 2019 मध्ये या देशातील गरीब जनतेनेच हे सरकार बनवलं," असा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी मत व्यक्त केलं.

2) VVPAT आणि EVMची आकडेवारी झाली मॅच

EVMमध्ये नोंदवण्यात आलेली मतं आणि त्यांच्या VVPATमधून निघालेल्या पावत्या, यांच्यात काहीही फरक नसल्याचं निवडणूक आयोगाच्या माहितीतून दिसून आलं आहे.

निवडणूक आयोगानं 2019च्या लोकसभा निवडणुकीत 2.3 लाख EVM, 16.3 लाख कंट्रोल युनिट तर 17.3 लाख VVPATचा वापर केला आहे.

Image copyright Getty Images

दरम्यान 20,625 विनाबॅलेटच्या सिस्टीमची मोजणी अजुन करायची आहे. प्रत्येक मतदारसंघात कोणत्याही 5 VVPATची मोजणी करावी, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता.

राज्यातल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार EVM आणि VVPATची आकडेवारी सारखी असल्याचा अहवाल सादर केला आहे.

3) राहुल राजीनामा देऊन भाजपच्या जाळ्यात अडकतील - प्रियंका गांधी

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर ते भाजपच्या जाळ्यात अडकतील, असं मत त्यांची बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी व्यक्त केलं आहे.

शनिवारी दिल्लीत काँग्रेस पक्षाची कार्यकारणी बैठक झाली, त्यावेळी प्रियंका हे म्हणाल्याचं टाइम्स ऑफ इंडियानं एका बातमीत म्हटलंय.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. पण ती भूमिका बजावण्यासाठी पक्षात कुणीच तयार नसल्याचं पक्षांच्या ज्येष्ठांनी म्हटलं आहे. राहुल यांनी असं केलं तर पक्षाचे कार्यकर्ते आत्महत्या करतील, असं पी. चिंदबरम म्हणाले.

Image copyright Getty Images

तर याच बैठकीत राहुल गांधी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावरही टीका केली. या लोकांनी पक्षाचं हित बाजूला ठेवून फक्त स्वतःच्या मुलांसाठी काम केलं, असं गांधी यांनी म्हटल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या आणखी एका बातमीत म्हटलं आहे.

4) सर्व प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत - अशोक चव्हाण

लोकसभेतल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये सध्या राजीनामा सत्र सुरू झालं आहे. माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

"काँग्रेसला या घडीला संघटनात्मक बदलाची गरज आहे. देशात जिथं-जिथं काँग्रेसला अपयश आलंय, तेथील सर्व प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत," असं चव्हाण शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images

काँग्रेसला महाराष्ट्रात चंद्रपूरमधली एक जागा मिळाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे.

अशोक चव्हाण यांनाही नांदेड लोकसभा मतदारसंघात पराभव पत्कारावा लागला आहे. भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांनी त्यांचा 40 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

5) जेटचे चेअरमन नरेश गोयल यांना परदेशात जाण्यापासून रोखलं

आर्थिक संकटामुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परदेशात जाण्यापासून रोखलं. हे दोघंजण मुंबई एअरपोर्टवर आले तेव्हा त्यांच्यावर ही कारवाई झाली असल्याची बातमी News18 लोकमतने दिली आहे.

नरेश गोयल आणि त्यांची पत्नी एका एमिराइट्स विमानाने दुबईसाठी निघाले होते, तेव्हा त्यांना प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात आली.

Image copyright Reuters

त्यांचं चेक-इन केलेलं सामानही विमानातून उतरवण्यात आलं. त्यांचं हे विमान मुंबईहून साडेतीन वाजताच्या सुमाराला टेक-ऑफ घेणार होतं.

आर्थिक संकटामुळे बंद कराव्या लागलेल्या जेट एअरवेजची सक्तवसुली संचलनालय चौकशी करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडेही त्यांच्या चौकशीची सूत्रं देण्यात आली आहेत.

हेही वाचलंत का?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)