अमेठी: स्मृती इराणी यांचे सहकारी आणि भाजप कार्यकर्ते सुरेंद्र सिंह यांची हत्या

सुरेंद्र सिंह Image copyright ANI
प्रतिमा मथळा सुरेंद्र सिंह

अमेठीच्या नवनिर्वाचित खासदार स्मृती इराणी यांच्या सहकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर परिसरात तणाव निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही राजकीय हत्या आहे, याचा पोलिसांनी इनकार केलेला नसल्याचं PTI वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.

अमेठीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दया राम यांनी पीटीआयला सांगितलं, "बरौलिया गावचे माजी सरपंच सुरेंद्र सिंह (50) यांच्यावर शनिवारी 11.30 वाजता गोळी झाडण्यात आली. त्यानंतर त्यांना लखनौला नेण्यात आलं, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला."

पोलिसांनी दोन लोकांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. नवनिर्वाचित खासदार स्मृति इराणी याही अमेठीला पोहोचल्या आहेत. त्यांनी सिंह यांच्या कुटुंबाची भेट घेतली.

माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या "मारेकरी जिथे असेल तिथून त्याला शोधून काढलं जाईल याबाबत भाजपचा कार्यकर्ता आजच्या घडीला आश्वस्त आहे. ज्याने गोळी चालवली आणि ज्याने गोळी चालवण्याचा आदेश दिला त्या दोघांना मृत्यूदंड देण्यसाठी अगदी सुप्रीम कोर्टात जाण्याचीही माझी तयारी आहे. कार्यकर्त्यांनी संयम बाळगण्याचं आवाहन मी करते."

"माझी प्रसारमाध्यमांना विनंती आहे की ज्या कार्यकर्त्याची हत्या झाली आहे त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी त्रास देऊ नये," असं नवनिर्वाचित खासदार स्मृती इराणी म्हणाल्या.  

प्रियंका गांधींनी दत्तक घेतलेलं गाव

निवडणुकीच्या काळात बरौलिया गावाचं नाव चर्चेत आलं होतं. राहुल गांधी यांना अपमानित करण्यासाठी स्मृती इराणी यांनी लोकांमध्ये चपला वाटल्या, असा आरोप प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केला होता.

सुरेंद्र सिंह आणि पक्षातील इतर नेत्यांनी गावात चपला वाटल्या होत्या, असं भाजपचे स्थानिक नेते राजेश अग्निहोत्री यांनी PTIशी बोलताना सांगितलं. काँग्रेस अमेठीमध्ये आपल्या अध्यक्षाचा पराभव झाल्यामुळे निराश झाली आहे. त्यामुळे या हत्येची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, असं अग्निहोत्री यांनी सांगितलं.

सुरेंद्र सिंह यांच्या मुलाने ANI शी बोलताना सांगितलं की त्याचे वडील दिवसरात्र पक्षाच्या आणि इराणी यांच्या निवडणूक मोहिमेत काम करत होते. "इराणी यांचा विजय झाल्यानंतर विजय यात्रा काढण्यात आली होती. मला वाटतं काही काँग्रेस कार्यकर्त्यांना ते आवडलं नाही. मला काही लोकांवर शंका आहे," असं त्यांच्या मुलाने सांगितलं.

Image copyright ANI

या हत्येमागे राजकीय हेतू असण्याची शक्यता अमेठीचे पोलीस अधीक्षक राजेश कुमार यांनी फेटाळून लावलेली नाही. PTIशी बोलताना ते म्हणाले, "या घटनेला राजकीय हत्या म्हणणं नाकारता येणार नाही. सर्व शक्यतांची चौकशी केली जात आहे. यामागे एखाद्या जुनं वैमनस्यही असू शकतं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)