पायल तडवी: जातीवरून केलेल्या छळामुळं मेडिकल विद्यार्थिनीची आत्महत्या

पायल तडवी Image copyright Facebook/Payal Tadvi

"आम्ही अगदी छोटंसं योगदान दिलं, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता…"

आपल्या पहिल्याच स्टायपेंडमधून कुष्ठरोगग्रस्तांना मदत केल्यावर डॉ. पायल तडवीनं आपल्या भावना अशा व्यक्त केल्या होत्या. डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचं तिचं स्वप्न होतं.

मूळच्या जळगावच्या पायलनं दुर्गम भागातल्या आदिवासींची वैद्यकीय सुविधांसाठी होणारी परवड पाहिली होती. म्हणूनच तिनं स्त्रीरोगतज्ज्ञ व्हायचं ठरवलं होतं. त्यासाठीच ती मुंबईच्या बीएल नायर हॉस्पिटलशी संलग्न टोपीवाला मेडिकल कॉलेजमध्ये पुढचं शिक्षण घेत होती.

पण 22 मे 2019 रोजी हॉस्टेल रूममध्येच तिनं स्वतःचं आयुष्य संपवून टाकलं. आपल्या तीन सीनियर्सच्या जाचाला कंटाळून तिनं हे पाऊल उचलल्याची तक्रार पायलच्या नातेवाईकांनी केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या तिघी आरोपी पायलला जातीवाचक टोचून बोलत असल्याचा आरोप असून या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

सहायक पोलीस आयुक्त दीपक कुंडाल यांनी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही आरोपींवर भारतीय दंडविधानाचे कलम 306/34 तसंच रॅगिंगविरोधी कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अजून प्राथमिक स्वरूपात असून सर्वांचे जबाब नोंदवल्यावर तपासाची पुढची दिशा निश्चित होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

नेमकं काय घडलं?

डॉ. पायलनं मिरज-सांगली इथून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं होतं. तिला गेल्या वर्षी टोपीवाला महाविद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला प्रवेश मिळाला होता.

पायलनं मागासवर्गीयांसाठी आरक्षित प्रवर्गातून टोपीवाला महाविद्यालयात प्रवेश मिळवला होता. यावरूनच तीन सीनियर्स तिला टोचून बोलत असत आणि याच जाचाला कंटाळून अखेर तिनं आत्महत्या केली असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

पायलची आई आबेदा तडवी यांनी 10 मे रोजी नायर हॉस्पिटलच्या अधिष्ठातांकडे पत्राद्वारे लेखी तक्रारही केली होती. कॅन्सरवरील उपचारासाठी नायर हॉस्पिटललाच आलो असताना पायलला जे सहन करावं लागत होतं, त्याचा अनुभव आपण घेतला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

"त्यावेळीच मी तिची व्यथा आपल्यासमोर मांडणार होते. पण तिने मला गप्प बसण्यास सांगितले. तक्रार केल्यावर मला त्या मुली जास्त त्रास देतील असं तिनं सांगितल्यामुळे मी आपल्याकडे तक्रार केली नाही," असं आबेदा या लेखी तक्रारीत म्हणतात. आदिवासी समाजातून आणि बेताच्या आर्थिक परिस्थितीतून आलेली असतानाही आपली मुलगी डॉक्टर झाल्याचा अभिमान वाटत असल्याचं त्या तक्रारीत म्हणतात.

पण त्याचवेळी जातिवाचक टोमणे, रुग्णांसमोर अपमान, प्रॅक्टिस करू देणार नाही अशी धमकी देणं असा पायलचा मानसिक छळ सुरू असल्याचा दावा त्यांनी या तक्रारीत केला होता. तसंच प्रचंड मानसिक त्रासामुळे माझ्या मुलीची मानसिक स्थिती खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तिचे काही बरेवाईट झाल्यास त्या तिन्ही डॉक्टर जबाबदार राहतील असेही त्यांनी या पत्रात म्हटले होते. तसंच पायलचं युनिट बदलावं अशी मागणी केली होती.

त्यानंतर 22 मे रोजी पायलनं तिचं आयुष्य गळफास लावून संपवलं.

वरिष्ठांवर कारवाईची मागणी

महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स) अर्थात Central MARDनं तातडीनं पावलं उचलत तिन्ही आरोपी डॉक्टरांना निलंबित केलं आहे. तसंच पायलच्या कुटुंबीयांनी तक्रार केल्यावरही कोणतीही कारवाई न केल्याबद्ददल विभागप्रमुखांचंही (Head of Unit) निलंबन व्हावं अशी मागणी केली आहे.

MARDच्या प्रतिनिधींनी आणि पायलच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी नायर हॉस्पिटलच्या परिसरात तिला श्रद्धांजलीही वाहिली. "आमच्या भावना आम्ही शब्दांत मांडू शकत नाही. या कठीण समयी आम्ही तिच्या कुटुंबीयांसोबत आहोत. तिला न्याय मिळत नाही, तोवर तिच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. आम्ही तिच्यासाठी प्रार्थना करतो आहोत," असं MARDनं जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

पायलच्या सहकाऱ्यांनीही या प्रकरणी कारवाईची मागणी सोशल मीडियावर केली आहे.

समुपदेशनाची गरज

एका तरूण डॉक्टरच्या अशा मृत्यूनं अनेकांना धक्का बसला आहे. तसंच या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रातील भेदभाव आणि त्यामुळं निर्माण होणाऱ्या मानसिक ताणाचा प्रश्नही उजेडात आणला आहे. याविषयी आम्ही डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. रेवत कानिंदे यांच्याशी बातचीत केली. ते सध्या मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.

Image copyright Central MARD

"एक पोस्ट ग्रॅज्युएशन करणारी मुलगी, जर आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत असेल तर तिला किती मानसिक छळवणूक सहन करावी लागली असेल याचा केवळ अंदाज येऊ शकतो."

भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी काय करायला हवं, याविषयी डॉ. कानिंदे सांगतात, "युजीसीच्या गाईडलाईन्स आहेत, की सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये 'इक्वल अपॉर्च्युनिटी सेल' असावा. पण महाराष्ट्रातल्या कुठल्याच वैद्यकीय महाविद्यालयात- सरकारी असो वा खासगी - असा सेल अस्तित्वात नाही. वैद्यकीय शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी तरूण वयात आपल्या घरापासून दूर राहात असतात. त्यांचं समुपदेशन होणं गरजेचं आहे, तिथे SC-ST ऑफिसर नेमणं गरजेचं आहे, जेणेकरून असा भेदभाव होत असेल तर त्यावर तत्काळ पावलं उचलली जाऊ शकतात."

दर सहा महिन्यांनी फक्त मागासवर्गीय प्रवर्गातीलच नाही तर 'ओपन' प्रवर्गातील मुला-मुलींचं सोबत बसून एकत्रितपणे समुपदेशन व्हायला हवं असं डॉ. कानिंदे सांगतात.

(आम्ही यासंदर्भात नायर हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाशी तसंच डीन डॉ. रमेश भार्मल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रतिक्रिया अजून मिळालेली नाही. ती मिळताच ही बातमी अपडेट करण्यात येईल.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)