नरेंद्र मोदी घेणार 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा दिवस निश्चित झाला असून गुरूवारी 30 मे रोजी संध्याकाळी सात वाजता मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी ट्वीट करून ही माहिती दिली.

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड एनडीएच्या संसदीय नेतेपदी करण्यात आली. त्यानंतर नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना 353 खासदारांचं समर्थन असलेलं पत्र सादर केलं.

नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. 2014 साली नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळानं राष्ट्रपती भवनातच शपथ घेतली होती.

मंत्रिमंडळात कोणत्या नवीन चेहऱ्यांचा समावेश होणार, हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. त्याचप्रमाणे जुन्या मंत्रिमंडळातील कोणत्या मंत्र्यांची खाती कायम राहणार यावरही तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवून बहुमतानं जिंकलेल्या अमित शाह यांना मंत्रिमंडळात जागा मिळणार की ते पक्षाचंच काम सांभाळणार याबद्दल राजकीय विश्लेषक अंदाज लावत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना अमेठीमध्ये पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी यांना महत्त्वाचं मंत्रिपद मिळणार का, याचीही उत्सुकता आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)